काणकोण : गुरूप्रिय स्वामी विद्याधिराज तीर्थ स्वामीजींचे महानिर्वाण होऊन आज बारा दिवस झाले, तरी त्यांच्या त्यागी व शिष्याप्रती असलेले प्रेमाचे (Love) वलय मठ परिसरात सदैव आहे. त्यांचे आशीर्वाद (Blessing) मठाच्या शिष्य, परिवारांवर सदैव राहणार असल्याचा विश्वास पिठारोहणावर बसलेले २४ वे स्वामीजी श्री विद्याधीश स्वामींनी (VIdhyadhish Swami) आशीर्वचनपर भाषणात सांगितले.
पीठारोहणासाठी दीडशे ब्राह्मण
शुक्रवारी सकाळपासून विद्याधीश स्वामींच्या पिठारोहणाचा धार्मिक विधी चालू होता. या धार्मिक विधीसाठी सुमारे दीडशे ब्राह्मण कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गोवा या राज्यांतून आले होते. त्यांना स्वामीजींनी ब्राह्मण दक्षिणा दिली. केंद्रीय मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पिठारोहण सोहळ्यात ब्राह्मणांना दान करण्याची परंपरा आहे. सकाळच्या धार्मिक विधीत ब्राह्मणांना रुपयांची नाणी, भेटवस्तू स्वामीजींनी प्रदान केल्या. सायंकाळी ब्राह्मणांना पैशांच्या रूपाने दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतले.
राज्यपालांकडून संदेश
पिठारोहण सोहळा चालू राज्यपाल श्रीधरन पिल्लाई यांनी खास दूताकरवी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले. गुरू स्वामी विद्याधिराज तीर्थ स्वामीजींनी तेवढाच बुद्धिमान व तेजस्वी उत्तराधिकारी मठाला दिला असल्याचे सांगितले.
गर्दी टाळण्यासाठी पडद्यावर प्रक्षेपण
पिठारोहण सोहळ्याला पांडुरंग उर्फ भाई नायक मठ समितीचे अन्य पदाधिकारी, मंगळुरुचे आमदार वेदव्यास कामत, तसेच शेकडो मठानुयायी उपस्थित होते. यावेळी पुत्तू पै, मुकुंद भट यांची भाषणे झाली. कोरोना महामारी असल्याने गर्दी टाळण्यासाठी गौड सारस्वत समाजच्या युवा शाखेने पिठारोहण सोहळ्याचे मठ आवारात दोन ठिकाणी पडदे (स्क्रीन) लावून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन मठ समितीचे सचिव अनिल पै यांनी केले. यावेळी मठ समितीतर्फे अध्यक्ष यांच्याहस्ते स्वामींना सन्मानपत्र देण्यात आले.
गुरुंचा संकल्प पूर्णत्त्वास नेणार
गुरूंचे गुणगान केल्यानेच मनाची शुद्धी होत असते. आकाशात सूर्य नसल्यास जसा काळोख होतो, तसेच सूर्यासारख्या तेजस्वी गुरूस्वामींचे महानिर्वाण झाल्याने झाले आहे. गुरूस्वामींनी प्रकृती स्वास्थ्य योग्य नसताना खडतर अशा गंडकी , बद्रीनाथ, काशी, प्रयाग यात्रा केल्या. वाराणासी येथे ४० दिवसांचे व्रताचरण करण्याचा त्याचा संकल्प अपुरा राहिला, तो पूर्ण करण्यात येणार आहे. त्याशिवाय मंगळुरु अनंतनगर येथे मुलींचे वसतीगृह गुरूस्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली बांधून पूर्ण झाले आहे. मे महिन्यात त्या वसतिगृहाचे उद्घाटन स्वामींच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, ‘कोविड’मुळे ते पुढे ढकलण्यात आले, असे विद्याधीश स्वामींनी सांगितले.
श्रद्धेने, निष्ठेने काम केल्यास यशप्राप्ती
कोणतेही काम निष्ठेने, श्रद्धेने व भक्तीने केल्यास यश प्राप्त होते, हे गुरू स्वामीजी नेहमीच सांगत. त्यांना पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने त्यांच्या पिठारोहणाच्या दिवशीच त्यांना शिष्य स्वीकार करण्याचा सल्ला शिष्यवर्गाने दिला होता. स्वामी जीवोत्तम श्रीपाद वडेर स्वामी यांना ८० वर्षाचे आयुष्यमान लाभले. त्यांच्यानंतर सर्वांत जास्त आयुष्यमान विद्याधिराज तीर्थ स्वामींना लाभले आहे. ते सदैव शिष्य, मठ व समाजाचाच विचार करायचे. त्यासाठी मठाचा सर्व इतिहासाचे पुनर्लेखन त्यांनी करून घेऊन पुढच्या पिढीसाठी दस्तावेज तयार केला आहे. तो माझ्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विद्याधीश स्वामींनी सांगितले. सात वर्षे गुरू स्वामींच्या छत्राखाली राहून खूप काही शिकता आले. त्या शिदोरीवर व गुरू स्वामीजींच्या आशीर्वादाने मठाचा कारभार चालविण्यासाठी बळ मिळणार आहे.
‘३०’चा योगायोग!
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात विद्याधीश स्वामींनी ३० तारखेला पहिले पाऊल ठेवले होते. पिठारोहण सोहळाही ३० तारखेलाच संपन्न झाला. माझा जन्म कृष्ण सप्तमीला झाला व आजही कृष्ण सप्तमीचा दिवस आहे. गुरु स्वामींना ज्योतिष्यशास्त्राचे अफाट ज्ञान होते. महानिर्वाणाच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी पंचाग पाहून तिथी व अन्य गोष्टी समजून घेतल्या होत्या.
गुरुस्वामी आणि आंबे!
गुरूस्वामीजींचे विद्याधीश स्वामींवर निस्सीम प्रेम होते. विद्याधीश स्वामींच्या सात वर्षांच्या सहवासात त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येकक्षणी ते काळजी घेत होते. गुरुस्वामी हे सकाळी पहिल्यांदा स्नान व पूजा आटोपून फराळासाठी जात होते. आंब्याच्या मोसमात ते आपला फराळ झाल्यानंतर माझ्यासाठी आंब्याच्या साली काढून मुद्दामहून ठेवायचे. यामागील त्यांचा उद्देश एकच होता की, आपल्या शिष्याला आंबे खाताना व आंब्याच्या साली काढताना चाकूची कोणतीही इजा पोहोचू नये, यासाठी गुरुस्वामीजी स्वत: आंब्याच्या साली काढून आंबे खायला देत. एवढे ते जपत होते, याची आठवण विद्याधीश स्वामींनी सोहळ्यात सांगितली. त्यामुळे आताही आंबे दिसले की, गुरूस्वामींची प्रकर्षाने आठवण येत राहते. त्याचसाठी आज पीठारोहण सोहळ्याला उपस्थित शिष्य वर्गाला आंबा प्रसाद म्हणून देण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.