Stray Cattle In Ponda
Stray Cattle In PondaDainik Gomantak

Stray Cattle In Ponda: फोंडावासियांच्या समस्या सुटणार कधी? खंडित विजेपाठोपाठ मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर

छोट्या-मोठ्या अपघातांचे पेव : फोंड्यातील नागरिकांकडून चिंता व्यक्त

Stray Cattle In Ponda सध्या फोंडा शहर व आसपासच्या परिसरात मोकाट गुरांनी थैमान घातले असल्याने वाहनचालकांसाठी ती एक डोकेदुखी ठरत आहे. वाहनचालकांबाबत दक्ष असणारे पोलिस मात्र या गुरांकडे कानाडोळा करताना दिसतात.

शहरातील मुख्य रस्त्यावर ही गुरे ठाण मांडून बसत असल्यामुळे ती शहरातील एक प्रमुख समस्या बनत आहे.

यामुळे दुचाकीवरून खाली पडून जायबंदी होणे किंवा कमरेला अथवा मणक्याला मार बसणे हे नित्याचेच प्रकार व्हायला लागले आहेत. कधी-कधी तर या गुरांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक खोळंबते.

काही दिवसांपूर्वी ‘पीपल फॉर ॲनिमल’ ही संस्था अशा बेवारस कुत्र्यांना नेऊन निर्बिज करणारे इंजेक्शन देऊन सोडत असे. पण सध्या ही मोहीम थंडावल्यासारखी झाल्यामुळे कुत्र्यांचा संचारही वाढायला लागला आहे.

फोंडा नगरपालिका निरंकाल-बेतोडा येथे ‘काऊ शेड’ बांधत असल्याचे सांगितले जात असले तरी तोवर ही समस्या सुटणे कठीणच दिसते आहे. त्यामुळे सध्या तरी फोंड्यातील नागरिकांना याबाबतीत कोणच वाली दिसत नसून जीव मुठीत धरून संचार करणे एवढेच त्यांच्या हाती राहिलेले दिसत आहे.

कोंडवाडा हाच पर्याय

या गुरांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कोंडवाडा हाच एक पर्याय ठरतो. मागे कुर्टी-खांडेपार पंचायतीने एका गोशाळेबरोबर करार केला होता. त्याप्रमाणे त्यांचे लोक मोकाट गुरांना नेत असत.

त्यांना पंचायतीने कळविले की ते या गुरांना घेऊन जात असत. पण गेल्या सहा महिन्यांत हा उपक्रम बंद पडल्यासारखा झाला आहे. हा उपक्रम परत सुरू करायला हवा, असे मत या पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भिका केरकर यांनी व्यक्त केले.

फोंडा नगरपालिका सध्या निरंकाल-बेतोडा येथे ‘काऊ शेड’ बांधत असून ही शेड झाल्यानंतर अशाप्रकारची नगरपालिका कक्षेत येणारी भटकी गुरे या शेडमध्ये नेण्यात येतील.

या समस्येची नगरपालिकेला जाण असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे पालिका लवकरात लवकर शेड बांधून ही समस्या तडीस नेण्याचा प्रयत्न करील.

- विश्‍वनाथ दळवी, नगरसेवक, फोंडा नगरपालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com