Goa Amona Bridge: फोंडा तालुक्यातील आमोणा-खांडोळा या पुलाची स्थिती दयनीय झाली असून लोखंडी सळ्यांना गंज चढलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीकडे कोणी ढुंकूनही पाहिलेले नाही. त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने ताबडतोब या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने सदर पुलाची पाहणी केली असता असे दिसून आले की, पुलासाठी वापरण्यात आलेले लोखंड पूर्णपणे गंजून गेले आहे. पुलाच्या पदपथावरून चालणेही कठीण झाले आहे. त्याचे रेलिंग पूर्णत: कमकुवत झालेले आहे.
त्यामुळे तेथून चालत जाताना कोणाला चक्कर आल्यास किंवा तोल गेल्यास तो माणूस रेलिंगसह पाण्यात पडण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे या पुलाची दुरुस्ती झालेली नाही व रंगकामही केलेले नाही. रंगकाम न केल्यामुळे लोखंड गंजत चाललेले आहे.
आमोणा-खांडोळा पूल तेथील लोकांना अनेक दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. साखळी-डिचोली हे अंतर या पुलामुळे खूपच कमी झालेले आहे. त्यामुळे डिचोली व साखळी तसेच या परिसरातील लोक सदर पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेसुद्धा याच पुलावरून ये-जा करीत असतात. तरीही संबंधित खाते पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भीषण व गंभीर अपघात होण्यापूर्वी संबंधित खात्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांबरोबरच समाजसेवक नारायण नाईक यांनी केली आहे.
संध्याकाळनंतर पुलावर काळोखाचे साम्राज्य: या पुलावरुन अनेक लोक सायंकाळच्या वेळी चालायला जातात. पण तेथील दिवे पेटत नसल्याने संध्याकाळनंतर तेथे काळोखाचे साम्राज्य असते. अलीकडे राज्यात सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या लोकांच्या विशेषत: महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पुलाखाली दारुड्यांचे आश्रयस्थान!
आमोणा-खांडोळा पुलाला अनेक वर्षे झालेली आहेत. डिचोली व साखळी परिसरातील लोकांसाठी हा पूल खूपच फायदेशीर ठरत आहे. पण आज या पुलाची दुर्दशा पाहिल्यास आम्ही गोवा राज्यात आहेत की अन्य कोठे, असा प्रश्न पडतो.
सदर पुलावरून दररोज ये-जा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नजरेसही हा प्रकार पडत नाही का?. त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करावी व लवकरात लवकर दुरुस्तीचा आदेश द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पुलाखाली जाऊन पाहणी केली असता दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच तेथे पडलेला दिसून आला. दुपारी व सायंकाळच्या वेळी अनेक परप्रांतीय युवक तेथे दारू ढोसत बसतात. कित्येकदा त्यांच्यात वाद निर्माण होतो. त्यामुळे खुनाचेही प्रकार घडू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.