

पणजी: गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कचाट्यात आता राज्यभरातील चिकन, मटण विकणारी दुकाने सापडली आहेत. या दुकानांचा समावेश ‘प्रदूषणकारी उद्योग’ या वर्गवारीत मंडळाने केल्याने आता त्यांना प्रदूषणमुक्त व्यवसायासाठी अशक्य कोटीतील गोष्टी कराव्या लागणार आहेत.
त्या करणे छोट्या व्यावसायिकांना शक्य नसल्याने यापुढे अशी दुकाने केवळ मंडळाच्या मेहेरबानीवर किंवा मंडळाचे अधिकारी करत असलेल्या काणाडोळ्यावरच अवलंबून असतील. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिकन व मटण दुकाने ‘रेड कॅटेगरी इंडस्ट्री’ म्हणून वर्गीकृत केल्याने या दुकानांना आता एकूणच कठोर पर्यावरणीय निकष पाळावे लागणार आहेत.
हा निर्णय लागू झाल्यानंतर केवळ परवाना घेऊन दुकान चालविणे पुरेसे राहणार नाही, तर प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिकांकडून नियमित तपासणी आणि अहवाल सादर करणे बंधनकारक होईल. दुकानातील मजला, भिंती, मांस चिरण्याचे फळे व साधने दररोज निर्जंतुक करणे बंधनकारक असेल.
रक्त व चरबीमुळे परिसरात दुर्गंधी पसरू नये म्हणून एक्झॉस्ट फॅन, गंधनियंत्रक आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा लागेल. सर्व व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. हातमोजे, गमबूट, ॲप्रन यांचा वापर अनिवार्य ठरेल. तसेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी प्रमाणपत्र दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.
प्रत्येक चिकन आणि मटण विक्री दुकानदाराने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी करून ‘दुकान स्थापण्याचा परवाना’ आणि ‘व्यवसाय सुरू करण्याचा परवाना’ या दोन परवान्यांची पूर्तता करावी लागेल. या प्रक्रियेसाठी परिसराचा आराखडा, पाण्याचा वापर, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाची योजना सादर करावी लागेल.
प्रदूषणकारी उद्योग वर्गवारीच्या नियमांनुसार, प्राण्यांच्या अवशेषांचे संकलन व विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. रक्त, हाडे, पिसे किंवा अवयव नाल्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकणे दंडनीय ठरेल. अशा कचऱ्याचे संकलन थंड साठवण किंवा जैवकचरा व्यवस्थापन यंत्रणेद्वारे करावे लागेल. तसेच सांडपाणी शुद्ध करण्यासाठी सेप्टिक टँक किंवा मिनी ट्रिटमेंट प्लांट आवश्यक ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.