लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष (Congress) गलितगात्र होईल, अशा प्रतिक्रिया राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केल्या. सध्या गोव्यातील (Goa) ख्रिस्ती मतदारांमध्येही काँग्रेसविरोधात वैफल्याची भावना आहे. काँग्रेसचे आमदार जिंकून येऊन भाजपात सामील होतात. त्यामुळे हा पक्ष भगव्या विचारसरणीच्या विरोधात प्रखर झुंज देण्यास निकामी ठरला आहे अशी सासष्टीतही सार्वत्रिक भावना आहे.
ज्येष्ठ नेते गोव्यात
काल रात्री तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नते गोव्यात दाखल झाले असून देशातील प्रमुख राजनितीतज्ज्ञ आणि ‘आय पॅक’चे प्रमुख प्रशांत किशोर यांचाही त्यात समावेश आहे. त्यांनी यापूर्वीच सोमवारी आपण गोव्यात धमाका करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, फालेरो यांनी आज तृणमूल काँग्रेस पक्षात जण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना त्याबदल्यात राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात येणार आहे.
अभिषेक बॅनर्जी करणार घोषणा
तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव व ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे येत्या दहा दिवसांत गोव्यात येणार आहेत. प्रशांत किशोर उद्या गोव्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांत आम्ही गोव्यातील अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे. आम्ही हा अहवाल अभिषेक बॅनर्जी यांच्यासमोर ठेवणार असून तेच गोव्यातील युती व इतर गोष्टींबाबत घोषणा करणार आहेत, अशी माहिती तृणमूलचे खासदार प्रसून बॅनर्जी यांनी दिली.
‘नवे पक्ष मतात फूट घालणारे’
कॉंग्रेस पक्षाने गोव्याची अस्मिता नेहमीच जपली आहे. गोमंतकीयांच्या संवेदना जाणणारा व भावनांचा आदर करणारा पक्ष म्हणून गोमंतकीयांनी नेहमीच कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवला आहे. आता नव्याने गोव्यात राजकारण करू पाहणारे पक्ष केवळ धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट घालणार आहेत. गोमंतकीय जनता राजकीय जुगार व करामतींना बळी पडणार नसून कॉंग्रेसलाच विजयी करणार आहेत, असा दावा गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांनी केला.
गोवेकरांसाठी खंबीर नेतृत्व हवे
गोव्याची जनता यातना भोगत आहे. कुणी तरी गोवेकरांसाठी खंबीर उभं रहायला हवं. मी अत्यंत खोल ध्यान अवस्थेत आहे. मी सगळं वाचतोय, माझी प्रतिक्रिया योग्यवेळी देईन, असे लुईझिन फालेरो यांनी सध्या त्यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याबद्दलच्या चर्चेविषयी विचारले असता सांगितले.
तृणमूल कॉंग्रेसकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या आगमनाचा कोणताही परिणाम ‘आप’वर होणार नाही. कारण राज्यातील लोकांना प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या पक्षाची गरज आहे. ‘आप’च्या कार्यातून ती अधोरेखीत झाली आहे. त्यामुळे हे नेते आले तरी त्याची दखल घेण्यासारखी वाटत नाही.
- राहुल म्हांबरे, आप, गोवा राज्य संयोजक
लोकशाहीत प्रत्येक पक्षाला कोठेही निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या भेटीमुळे गोवा फॉरवर्ड पक्षावर काही परिणाम होणार नाही. गोमंतकीयांना भाजप सरकार हटवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित व्हावे, असे वाटते. विरोधक एकजूट होणे ही काळाची गरज आहे.
- दुर्गादास कामत, गोवा फॉरवर्ड, संघटनमंत्री
तृणमूल काँग्रेस गोव्यात आली व त्यांनी विरोधकांशी चर्चा केली तरी त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर किंचितही होणार नाही. त्यांना गोव्यात यावे तसेच प्रयत्नही करावेत. लोकशाहीत प्रत्येकला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. असे पक्ष निवडणूक जवळ आली की राज्यांना भेटी देतात.
- ॲड. नरेंद्र सावईकर, भाजप, सरचिटणीस
तणमूल काँग्रेसचे खासदार प्रशांत किशोर हे गोव्यात आज संध्याकाळी येणार होते. मात्र, काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. अजूनही या पक्षाच्या नेत्यांशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा झालेली नाही. लोकांना भाजप सत्तेवर आलेले नको आहे. त्यामुळे सर्व विरोधक एकत्रित आले तर मोठा फरक पडू शकतो.
- सुदिन ढवळीकर, आमदार, मगो नेते
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.