Kala Academy: फेरबदलासाठी दबाव; कला अकादमी प्रकरण मुख्यमंत्री सावंत यांच्या ठरले अडचणीचे!

Goa Politics: गोविंद गावडे यांचे कला अकादमी प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अडचणीचे ठरले आहे. गावडे यांच्यावर कारवाईसाठी भाजप पक्ष संघटनेतून मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव आहे.
minister govind gaude  and cm pramod sawant
minister govind gaude and cm pramod sawant

Goa Politics: उच्च माध्यमिक विद्यालयातील वर्गमित्र आणि आता मंत्रिमंडळातील सहकारी गोविंद गावडे यांचे कला अकादमी प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अडचणीचे ठरले आहे. गावडे यांच्यावर कारवाईसाठी भाजप पक्ष संघटनेतून मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव आहे. भाजपचे मधल्या फळीतील नेते हे प्रकरण सरकारवर शेकू शकते, असे खासगीत इशारे देऊ लागले आहेत.

‘शहाजहॉंन यांनी कुठे ताजमहाल बांधण्याची निविदा मागवली होती’, असे वक्तव्य केल्यानंतर गावडेंवर या कला अकादमी प्रकरणात टीका होण्यास सुरवात झाली होती. त्यावेळीही भाजप पक्ष संघटनेने मुख्यमंत्र्यांना गावडे यांना आवरा, अशी सूचना करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांच्या मौनाचा अर्थ काय?

राज्यभरातील कलाकारांनी पणजीत जाहीर सभा घेऊन १५ दिवसांत कला अकादमी पूर्णपणे खुली करा, अन्यथा पायउतार व्हा, असा इशारा मंत्री गोविंद गावडे यांना दिला आहे. विशेष म्हणजे, त्या सभेला गावडे स्वत: उपस्थित होते. त्यांनी या विषयावर जाहीर भाष्य करणे टाळले आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर मौन बाळगणे पसंत केल्याने कुठेतरी पाणी मुरते आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाचा विचार बळावला

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात (South Goa) पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर भाजप पक्ष संघटनेत आता मंत्रिमंडळ फेरबदल केला पाहिजे, असा विचार बळावला आहे. खासगीत अनेक नेते मंत्रिमंडळ बदल व्हायला हवा, असे मत व्यक्त करू लागले आहेत. काही आमदारांचे समर्थक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ लागलेत. आमदार गणेश गावकर यांच्या समर्थक पंच-सरपंचांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

अन् मुख्यमंत्र्यांनी परिषदच गुंडाळली

पर्वरी येथे मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कला अकादमीच्या निकृष्ट कामाविषयी थेट प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ‘यावर पुन्हा कधीतरी बोलू’ असे मोघम उत्तर दिले. याविषयी पुन्हा विचारणा केल्यावर त्यांनी थेट पत्रकार परिषदच गुंडाळली.

मुख्यमंत्र्यांनी रेटले प्रकरण

जनमानसात या प्रकरणामुळे सरकारविषयी (Government) निर्माण झालेल्या वाईट छबीविषयी खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे गावडेंवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव असला तरी मुख्यमंत्र्यांनी जेवढे दिवस हे प्रकरण पुढे रेटता येईल तेवढे रेटायचे, असे धोरण अवलंबले आहे.

‘पुन्हा कधीतरी या विषयावर बोलू’

कला अकादमीच्या चिघळलेल्या विषयावरून समाज माध्यमांवर व राज्यभरातील संवेदनशील नागरिकांचा वाढता क्षोभ पाहून मुख्यमंत्र्यांनी हा विषय फार वाढवायचा नाही, असे ठरविल्याचे दिसते. त्यामुळे या विषयावर पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यावर हसून ‘पुन्हा कधीतरी या विषयावर बोलू’ असे म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com