

क्राईम ब्रँचमध्ये ‘सरकारी जावई’
ज्या क्राईम ब्रँचकडून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखविण्याची अपेक्षा असते, त्याच विभागातील एका निरीक्षकाला अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून पोलिस कोठडीची हवा खावी लागते. या प्रकरणामुळे आधीच विभागाची प्रतिमा डागाळली असताना, आता आणखी एका वेगळ्याच प्रकाराची चर्चा रंगू लागली आहे. क्राईम ब्रँचमधील काही कॉन्स्टेबलांच्या बदल्यांचे आदेश निघून कित्येक महिने उलटले, तरी त्यांचा पाय मात्र जागेवरून हलायला तयार नाही. बदलीच्या ठिकाणी जाण्याऐवजी हे महाशय क्राईम ब्रँचमध्येच ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याशिवाय एवढे धाडस येणार तरी कुठून? या सरकारी जावयांना नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत? बदलीचे आदेश केवळ कागदावर काढायचे आणि संबंधितांनी मात्र खुर्ची सोडायचीच नाही, असा नवा नियम क्राईम ब्रांचमध्ये तयार झाला आहे की काय? विभागाला आणखी बदनामीचे डाग लागण्यापूर्वी या ‘विशेष पाहुणचार’ घेणाऱ्यांची व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचा सूर आता विभागातूनच उमटत आहे.
दिवाळीचे बॉम्ब फुटले अन् पोलिस पळाले!
दिवाळी जवळ आल्याने बाजारात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे. पण मडगाव पोलिसांना दिवाळीआधीच फटाक्यांचा असा काही अनुभव आला की, त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पॉवरहाऊस जंक्शनवर रात्रीच्या गस्तीवर असताना पोलिसांना तरुणांचा एक घोळका संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्यांना हटकताच या तरुणांनी चक्क सुतळी बॉम्ब पोलिसांच्या दिशेने फेकले. अंधारात अचानक झालेला स्फोट आणि कानठळ्या बसवणारा आवाज यामुळे नेमके काय घडले, हे पोलिसांनाही समजेना. अखेर संशयितांना पकडण्याऐवजी गस्तीवरील पोलिसांनीच तेथून धूम ठोकली! हा प्रकार बड्या सायबांच्या कानावर जाताच त्यांनी संबंधित पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. आता प्रश्न एवढाच की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी असलेले पोलिस सुतळी बॉम्बच्या आवाजाने पळ काढणार असतील, सर्वसामान्यांनी काय करावे?
दिवाळीची ‘अपूर्व’ भेट
सणासुदीचा काळ असला की राजकारण्यांकडून मतदारांना भेटवस्तू देण्याचे प्रकार सुरू होतात. बहुतांशवेळा या भेटवस्तू चतुर्थीच्या काळात दिल्या जातात. फोंड्याचे नगरसेवक अपूर्व दळवी यांनी चतुर्थीला २० किलो वजन भरेल अशा वस्तूंच्या बॅगा लोकांच्या घरी पोहोचवल्या होत्या. आता दिवाळीलाही भेटवस्तू देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यात पणत्यांसह उटणे, माेती साबण, पोहे, गूळ, तेल, वातीची जोडवी वगैरे वगैरे. अपूर्वची ही भेट बॅग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुरुवातीला पाच हजार घरांना अशा भेटी देण्याचे ठरवून दळवी यांनी म्हणे, आपली छायाचित्रे असलेल्या पाच हजार पिशव्या तयार करून घेतल्या. मात्र आता त्यासुद्धा कमी पडल्याने त्यांनी म्हणे बाजारातून अतिरिक्त पिशव्या विकत घेत त्यावर आपला स्टिकर लावून लोकांच्या घरी या भेटी पोहोचविल्या आहेत. अपूर्वच्या या भेट वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी बागायतदारमध्ये काही माणसांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.
कामतबाबची फटकेबाजी
निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत; मात्र मडगावात आत्तापासूनच राजकीय आखाडा तापू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्याही वाढली आहे. भाजपकडून दिगंबर कामत, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सावियो कुतिन्हो, प्रभव नायक आणि चिराग नायक प्रयत्नशील आहेत. सावियो आणि प्रभव यांनी यापूर्वीच कामत यांना लक्ष्य केले होते. आता चिराग यांनी कथित जॉब घोटाळ्याचा आरोप करून त्यात भर घातली आहे. यावर दिगंबरबाबही चांगलेच आक्रमक झाले. यापूर्वी प्रभव आणि चिराग यांच्यावर थेट भाष्य टाळणाऱ्या कामत यांनी आता दोघांनाही लक्ष्य केले. ‘फ्रेश फेस’ किंवा ‘न्यू फेस'' म्हणून लोक मते देत नसतात, असा टोला त्यांनी लगावला. काहींच्या मानगुटीवर निवडणुकीचा ज्वर चढला असून, तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत त्यांनी प्रभव यांनाही चिमटा काढला. आपणही निवडणुकीच्या मूडमध्ये असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे मडगावच्या राजकीय आखाड्यात सध्या आरोपांचे फटाके फुटत आहेत. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच एवढा धुरळा उडत असेल, तर प्रत्यक्ष रणधुमाळीत काय काय पाहायला मिळेल, याचीच चर्चा रंगू लागली आहे!
चतुर्थी, दसरा, दिवाळी
गोव्यातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत खरेच युती होणार की नाही, हे कळत नाही. यापूर्वी विजय सरदेसाई यांनी चतुर्थीनंतर सगळे काही निश्चित होईल असे म्हटले होते. त्यानंतर ही डेडलाईन दसऱ्यापर्यंत ताणली गेली. आता दिवाळी जवळ पोहोचली, पण या युतीचा निर्णय ‘आज जातोलो, फाल्या जातोलो’ या मोडमध्ये अडकला आहे. याला काँग्रेसचा खमकेपणा की गोवा फॉरवर्डची हतबलता म्हणायचे? वास्तविक असे वाटते की दाेन्ही पक्षांना एकमेकांची साथ नको आहे, पण लोकदबावापुढे दोघेही तसे जाहीरपणे कबुल करायला तयार नाहीत. त्यामुळे युतीचा देखावा सुरू आहे, एवढाच काय तो अर्थ आजच्या घडीला काढला जाऊ शकतो!
आलेमाव एकत्र की एकमेकांच्या विरोधात?
गोव्यात राजकीय घराण्यांची कमी नाही. एकाच घरात वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा मानणारी मंडळीही आहेत. राणे कुटुंबापासून सुरू झालेली ही परंपरा आता आलेमाव कुटुंबातही दिसते. चर्चिल आलेमाव यांनी बंधू ज्योकिम यांच्यासह कन्या वालंका, पुतणे युरी यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. चर्चिल हे आपले पुतणे वॉरन यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याची चर्चा आहे. दुसरे पुतणे युरी यांनाही त्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आलेमाव कुटुंबात निवडणुकीच्या मैदानात कोण कोणाच्या बाजूने उतरणार, हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे फॅमिलीराजचा डंका आणि दुसरीकडे घरातच राजकीय मतभेद! आता आलेमाव कुटुंब आधी घरातील एकजूट साधणार की मतदारांसमोरच एकमेकांना आव्हान देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शेवटी घरातच एकमत नसेल, तर जनतेने कोणता सूर धरायचा?
मैत्रीचा गोल
फातोर्ड्याच्या मैदानावर गुरुवारी चर्चिल आलेमाव आणि अभिनेता जॉन अब्राहम यांची भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन केले. गप्पाही रंगल्या. राजकीय मैदानावर चर्चिल यांची धावपळ काहीशी मंदावली असली तरी फुटबॉलमध्ये मात्र त्यांची इनिंग सुरूच आहे. सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेत त्यांनी आपले स्थान टिकवले आहे. त्यात कन्या वालंका फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी! त्यामुळे राजकीय गोल होवोत अथवा नकोत. फुटबॉलच्या मैदानावर आलेमाव कुटुंबाचा दबदबा कायम दिसतो. जॉनची भेट म्हणजे या खेळातील आणखी एक मैत्रीपूर्ण पास म्हणायचा.
हातात हात की पुन्हा ताटातूट?
राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. वेळ निघून गेल्यावर दाखवलेली धमक उपयोगाची ठरत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची एकजूट होणार का, याबाबत सध्या संभ्रम आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस हे दोघेही समान राजकीय शत्रू असल्याचे जाहीर केल्याने आम आदमी पक्षाच्या युतीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’ एकत्र येण्याची चर्चा आहे. मात्र या युतीचा मुहूर्त काही केल्या लागत नाही. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा १६ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या वर्षी याच दिवशी विरोधकांनी हातात हात घालून ग्रँड अपोझिशन अलायन्सची घोषणा केली होती. त्यामुळे यंदाही वाढदिवसाच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार, अशी चर्चा रंगलीय. ∙∙∙
हातात हात की पुन्हा ताटातूट?
राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. वेळ निघून गेल्यावर दाखवलेली धमक उपयोगाची ठरत नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची एकजूट होणार का, याबाबत सध्या संभ्रम आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस हे दोघेही समान राजकीय शत्रू असल्याचे जाहीर केल्याने आम आदमी पक्षाच्या युतीतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’ एकत्र येण्याची चर्चा आहे. मात्र या युतीचा मुहूर्त काही केल्या लागत नाही. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा १६ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. गेल्या वर्षी याच दिवशी विरोधकांनी हातात हात घालून ग्रँड अपोझिशन अलायन्सची घोषणा केली होती. त्यामुळे यंदाही वाढदिवसाच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार, अशी चर्चा रंगलीय.
पोलिसांचा ‘लपंडाव’
गोवा पोलिसांना आपल्या एका पोलिस निरीक्षकाला वाचवायचे आहे की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मुख्य दरवाजा बंद करून मागच्या दाराने त्याला बाहेर नेण्याची ही कसली शक्कल? सामान्य नागरिकांना कायद्याचे धडे देणारे पोलिस स्वतःच असे वेगळे मार्ग शोधू लागले, तर प्रश्न उपस्थित होणारच. मुख्य दरवाजा जनतेसाठी आणि मागचा दरवाजा अधिकाऱ्यांसाठी, असा काही नवा नियम पोलिसांनी तयार केला आहे की काय? मग पोलिसांच्या या दरवाजा पुराणाचे गुपित तरी काय? एखाद्याला वाचवण्यासाठी दरवाजे बदलता येतील; पण जनतेच्या मनातील संशयाचे दरवाजे बंद कसे करणार? शेवटी दरवाजा कोणताही असो, पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता हवी, अन्यथा त्यांना ते महाग पडू शकते.
काँग्रेसच्या रस्सीखेचीत उल्हासरावांची ‘दिवाळी’
नावेली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उल्हास तुयेकर यांनी या मतदारसंघात इतिहास घडवताना ‘कमळ’ फुलविले. विरोधी उमेदवारांच्या मतविभागणीमुळे ते जिंकून आले होते, ही बाबही खरी आहे. आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी पुन्हा एकदा इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. माजी ‘झेडपी’ सिप्रूने उमेदवारीवर दावा ठोकताना प्रचारही सुरू केला आहे. पक्षाने आपल्याला ग्रीन सिग्नल दिला असून, कामाला लागा असा संदेशही दिला असल्याचे ते सांगतात. दुसऱ्या बाजूने वालंका आलेमाव याही रेसमध्ये आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. प्रतिमा कुतिन्हो यांचाही उमेदवारीवर डोळा आहे. ही स्पर्धा पाहून, उल्हासरावांच्या मनात ‘लड्डू’ फुटू लागले तर नवल ते काय?
मनोज कधी परतणार?
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील (आरजी) अंतर्गत वादामुळे काही महिन्यांपूर्वी मनोज परब यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत, राजकीय संन्यासही जारी केला. त्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी पक्ष स्वत:च्या ताब्यात घेतल्यानंतर आरजीत परब आणि बोरकर असे दोन गट तयार झाले असून, या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार बोरकर आणि त्यांचे सहकारी पक्षाच्या धोरणांना तिलांजली देत असल्यामुळे मनोज परब यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न आपल्याकडून सुरू असल्याचे परब यांचे समर्थक अजय खोलकर वारंवार सांगत आहेत. परबही सोशल मीडियाद्वारे बोरकर यांच्यावर निशाणा साधत आरजी प्रवेशाचे संकेत देत आहेत. गणेश चतुर्थीपासून परब यांचा हा खेळ सुरू असल्याने ते पक्षात कधी प्रवेश करणार, याची प्रतीक्षा आरजीचे कार्यकर्ते करत आहेत.
आयनॉक्समध्ये ‘जॅम-शो’ हाऊसफुल्ल
पणजीतील आयनॉक्स परिसरात कारला टेम्पोची धडक बसली आणि संपूर्ण परिसरात वाहतुकीचा खेळखंडोबा उडाला. अपघात किरकोळ असो वा मोठा, गर्दी जमविण्यात मात्र पणजीकरांचा हात कोणी धरू शकत नाही, याचा पुन्हा प्रत्यय आला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या, प्रवासी कोंडीत अडकले आणि काहींना पुढे जाण्याऐवजी चकरा मारण्याची वेळ आली. आयनॉक्समध्ये एखाद्या चित्रपटाचा प्रीमियर सुरू असल्यासारखी गर्दी रस्त्यावर जमली. फरक एवढाच की, आत चित्रपटाचा शो सुरू होता आणि बाहेर वाहतुकीचा ‘जॅम-शो’ रंगला होता. एका छोट्याशा धडकेने शहरातील वाहतूक व्यवस्थेची कसरत पुन्हा चव्हाट्यावर आणली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा किती सज्ज आहे, याची परीक्षाच या निमित्ताने झाली. आता आयनॉक्समध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांनी तिकिटाबरोबर वाहतूक कोंडीत अडकण्यासाठीही वेळ राखून ठेवावा की काय?
गिरीशबाबची राहुल स्टाईल
नक्कल करणे हे विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर राजकारण्यांनाही शोभणारे नाही! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि राहुल गांधी यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. गिरीशबाब राहुलचे भक्त असल्याचीही चर्चा आहे. आता तर त्यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्याची स्टाईलही उचलल्याचे दिसते. राहुल गांधी पत्रकार परिषदेत मोठ्या स्क्रीनवर आकडेवारी, ग्राफ आणि फॅक्ट्स दाखवून सरकारला घेरतात. त्याच पद्धतीने गिरीशबाबही मोठ्या स्क्रीनवर भाजपवर आरोप करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा वापर पाहून राहुल स्टाईलची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शेवटी राजकारणात फक्त स्लाइड्स दाखवून गुण मिळत नसतात, हेही लक्षात असू द्या!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.