
दामू बाबूंशी काय बोलले?
माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व आमदार प्रवीण आर्लेकर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तंबी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आक्रमकपणे बोलणाऱ्या बाबू यांना कोणत्या शब्दांत समज दिली असेल, याचे कुतुहल खुद्द भाजपमध्ये आहे. बाबू वारंवार येऊन पेडण्यातून पुढील निवडणूक आपणच लढवणार, असे सांगत असतात. त्यामुळे आर्लेकरांना राग येणे साहजिक आहे. मागील निवडणुकीत बाबू यांना भाजपने मडगावला पाठवल्याने ‘दिल्या घरी तु सुखी रहा’, असे आर्लेकर समर्थकांना वाटते. मात्र पेडण्यातील बाबू यांचे समर्थक त्यांना पाचारण करत असतात. बाबू स्वभावानुसार आमदारांवर शाब्दिक हल्ला चढवतात आणि पुढचे सारे घडते. असे असले तरी बाबू यांना शांत करण्यासाठी कोणत्या शब्दांचा वापर दामू यांना करावा लागला असेल, याची कल्पना सध्या अनेकजण करत आहेत. ∙∙∙
तवडकरांची पंढरपूरवारी
सभापती रमेश तवडकर सध्या भक्तीमार्गाला लागलेले दिसतात. मुर्डेश्वर, त्यापाठोपाठ कोल्हापूरची अंबाबाई आणि पंढरीच्या पाडुरंगाचे दर्शन त्यांनी या आठवडाभरात घेतले. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, हे मुख्यमंत्री व त्यानाच माहित. मध्यंतरी गोव्याबाहेर जास्त लांब जाऊ नका अशी त्यांना सूचना होती. आताचा दौरा त्यांनी मुख्यमंत्र्यांना कल्पना देऊनच केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. बुधवारी ते पंढरपुरात होते. त्यामुळे सभापतीपदाचा ते राजीनामा देऊन गुरुवारी शपथविधी होणार या चर्चेची हवा ते पंढरपूरहून बुधवारी रात्री येणार नसल्याच्या माहितीनेच निघून गेली. मध्यंतरी आपल्याला मंत्रिपद नको म्हणणारे तवडकर आता तरी मंत्रिपदासाठी इच्छूक आहे का याचे उत्तर मात्र त्यांनी सोयीस्करपणे दिलेले नाही.∙∙∙
आततायीपणा कशासाठी?
म्हापसा पालिका मंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत ‘पीपीपी’ तत्वावर म्हापसा पालिकेच्या मालकीच्या जमिनीचा वापर हा बस टर्मिनलच्या पुनर्विकासाठी देण्याकरिता, वाहतूक संचालनालयकडून पालिकेला प्रस्ताव आलेला. मात्र, या जागेचा नेमका आराखडा नव्हता. त्यामुळे याठिकाणी नक्की काय येणार आहे, याची कल्पना नाही. त्यामुळे आराखडा दाखवून नंतर परवानगी द्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी लावून धरली. नगरसेवकांचा वाढता विरोध लक्षात घेता, यावर मतदान घेतले. परिणामी, तात्पुरती परवानगी देण्याच्या बाजूने मतदान झाले. परंतु, आराखडा नसताना, तात्पुरती परवानगी देण्याची घाई हा आततायीपणाच झाला! हा संपूर्ण प्रकार म्हणजे, ‘शिता पयली मीठ’ खाल्ल्यासारखे नाही का? ∙∙∙
नावेलीची लॉटरी पुन्हा उल्हासलाच?
एकेकाळी नावेली हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात उमेदवारांची एवढी गर्दी झाली की, भाजप विराेधी मतांत मोठ्या प्रमाणावर विभागणी झाल्याने भाजपचे उल्हास तुयेकर हे निवडून आले. वास्तविक हा विजय म्हणजे, तुयेकर यांना फुटलेली लॉटरी अशा प्रतिक्रिया त्यावेळी ऐकू येत होत्या. आता या घटनेला साडेतीन वर्षे उलटून गेली. पण मागच्या विधानसभेच्या निकालाने अजून विरोधकांना जाग आलेली आहे, असे वाटत नाही. कारण मिळत असलेल्या संकेताप्रमाणे, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही नावेलीत उमेदवारांची भाऊगर्दी वाढणार. काँग्रेस पक्ष यावेळी नावेलीतून सिप्रूला उभे करण्याच्या तयारीत असतानाच गोवा फाॅरवर्डने अँथनी कुलासो यांना उमेदवार म्हणून नावेलीतून पुढे आणण्याचे ठरविल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतील या आशेलाच सुरुंग लावण्याचे हे काम नव्हे का? ∙∙∙
आता रस्त्यावर टाईल्स बसवा!
राज्यातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवर आता चक्क सिमेंटचा मुलामा लावला जात असल्याने सिमेंटवर आता टाईल्स बसवा, असे टोमणे लोक मारू लागलेत. खड्डे बुजविण्यासाठी आता चक्क ‘खडी आणि डांबराऐवजी सिमेंट वापरत असाल, तर त्यावर टाईल्स कधी बसवणार?’, असा उपरोधिक सवालही नेटिझन्स सोशल मीडियात फोटो पोस्ट करून करू लागले आहेत. या प्रकारामुळे रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याच्या सरकारच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. आता सरकार काही आम्हाला हॉटमिक्स रस्ते देईल, असे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया देऊन काहींनी अपेक्षाभंग झाल्याचे दुःखही मांडलेय. ∙∙
सभापतिपद मला कसे?
सहकारमंत्री सुभाष शिरोडकर हे केंद्रीय सहकारमंत्री या नात्याने अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार मायकल लोबो हे शहा यांना राजकीय कारणास्तव भेटले. त्यामुळे शिरोडकर यांना सभापतिपद देण्यात येणार, अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू झालीच कशी, हा प्रश्न शिरोडकर यांना पडलेला आहे. त्यांच्याशी कुणी याबाबत चर्चा केली नाही, की त्यांच्या खात्यांचे कामही मागे पडलेले नाही. त्या दिवसाचे काम त्याच दिवशी मार्गी लावणे आपण सुरू ठेवले असताना सभापतिपदाची चर्चा सुरू झाली तरी कशी. सध्या शिरोडकर खासगीत हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित करत आहेत. ∙∙∙
फोंड्यातील ‘सुपर नगराध्यक्ष’?
फोंड्यातील एक नगरसेवक सध्या आपणच नगराध्यक्ष असल्यासारखा वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या तालावर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांना नाचावे लागत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रमुख अभियंत्यांनाही त्याच्या इशाऱ्यावर काम करावे लागत आहे. नाही ऐकले की, त्यांची बदली झालीच म्हणून समजावे. एका मुख्याधिकाऱ्यांना त्याने याचा प्रत्यय आणून दिला आहे. अर्थात त्याच्यामागे त्याचा ‘गॉड फादर’ ठामपणे उभा असल्यामुळे तो हे करू शकतो हे उघडच आहे. नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसून तो सूत्रे हलवताना दिसतो. आता एवढे तर नगराध्यक्ष झाला तर काय, अशी चर्चा यामुळेच नगरपालिका कर्मचाऱ्यांत सुरू झाली आहे. काही का असेना, हा ‘सुपर नगराध्यक्ष’सध्या फोंडा शहरात चर्चेचा विषय बनलाय. ∙∙∙
शिक्षकांना नकोय जास्त बोजा!
‘रेड्याक केवणा सवंय’, अशी कोकणीत एक म्हण आहे. म्हणजे जो रेडा नांगरणीला बांधला जातो, त्याला जर जखम झाली तर तो खुश होतो. कारण काम करण्यापासून उसंत मिळते. आपल्या राज्यातील काही प्राथमिक शाळांतील शिक्षकांची वृत्ती अशीच झाली आहे. विशेष करून सरकारी प्राथमिक शाळेत शिकविणारे शिक्षक व मुख्याध्यापक त्यांच्याकडे शंभर कारणे असतात. याचा अनुभव राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञांनी परवा घेतला. ‘एनईपी’ची तिसऱ्या इयत्तेत कशी अंमलबजावणी करावी, यासाठी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळा दुपारी असल्यामुळे काही जणांनी चक्क झोपा काढल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण काय, याची माहिती नसलेल्या काही मुख्याध्यापकांनी नको असलेले प्रश्न करून आपले अज्ञान प्रकट केले अन् स्वतःचे हसे करून घेतले. म्हणतात ना .... शेपूट वाकडे ते वाकडेच!
फोंड्यातील ‘सुपर नगराध्यक्ष’?
फोंड्यातील एक नगरसेवक सध्या आपणच नगराध्यक्ष असल्यासारखा वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या तालावर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांना नाचावे लागत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रमुख अभियंत्यांनाही त्याच्या इशाऱ्यावर काम करावे लागत आहे. नाही ऐकले की, त्यांची बदली झालीच म्हणून समजावे. एका मुख्याधिकाऱ्यांना त्याने याचा प्रत्यय आणून दिला आहे. अर्थात त्याच्यामागे त्याचा ‘गॉड फादर’ ठामपणे उभा असल्यामुळे तो हे करू शकतो हे उघडच आहे. नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसून तो सूत्रे हलवताना दिसतो. आता एवढे तर नगराध्यक्ष झाला तर काय, अशी चर्चा यामुळेच नगरपालिका कर्मचाऱ्यांत सुरू झाली आहे. काही का असेना, हा ‘सुपर नगराध्यक्ष’सध्या फोंडा शहरात चर्चेचा विषय बनलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.