खरी कुजबुज: सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

Khari Kujbuj Political Satire: भाजपचे सांगे मतदारसंघाचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांचा कुंकळळी मतदारसंघात वावर वाढला असल्याने आता त्याची चर्चा जोरात सुरू आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

भाजपचे सांगे मतदारसंघाचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांचा कुंकळळी मतदारसंघात वावर वाढला असल्याने आता त्याची चर्चा जोरात सुरू आहे. रविवारी एका फुटबॉलच्या अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष फळदेसाई उपस्थित राहणार आहेत. गांधी जयंतीला एका शिक्षण संस्थेच्या स्थापना दिवसालाही त्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे काहींनी सांगितले. एवढेच नव्हे, तर फळदेसाई रविवारी श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थानात रंगपूजा बांधणार आहेत. सुभाष हे हळूहळू कुंकळळीत पाय पसरायला लागले आहेत. त्यांनी कुंकळळीतून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविल्यास येणारी निवडणूक रंगतदार होणार, यात शंका नाही.

‘कुंकळ्ळीकरां’ची युती तुटली?

‘ग्रॅण्ड ओपोजिशन अलायन्स’ म्हणून विरोधकांनी हातात हात धरून युतीची घोषणा केली आणि युती अकालीच संपली. त्यानंतर आणखी एक सर्वपक्षीय युतीचा प्रयत्नही अपयशी ठरला. आता ‘आप’ व ‘गोवा फॉरवर्ड’ यांच्यात युती जाहीर झाली. ती टिकणार की नाही, हे माहीत नाही. या सगळ्यात वेगळी कुंकळळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांत युती झाली होती. क्लाफास डायस, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, एल्विस गोम्स, सॅमी तवारीस, टोनी फर्नांडिस व प्रशांत नाईक यांनी एकत्र येऊन ‘स्वाभिमानी कुंकळळीकर’ नावाची घोषणा करून एकच संयुक्त उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निवडणुकीपूर्वीच या संयुक्त उमेदवारांची युती तुटली, हेच खरे दुर्दैव. आता गोम्स एकटेच ‘स्वाभिमानी कुंकळळीकर’चा झेंडा घेऊन फिरतात. इतरांनी आपली वाट बदलली.

तमिळ-तेलगू गाण्यांचा आधार!

गोव्यात काँग्रेस पक्षाची ‘गोवा रक्षण यात्रा’ सुरू आहे. गोव्यातील जमिनी बाहेरच्यांना दिल्याचा गंभीर आरोप भाजप सरकारवर करून काँग्रेसने ही यात्रा सुरू केली. गोव्याची अस्मिता राखण्याच्या घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या यात्रेत मात्र झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक राज्यातील लोकांचा सहभाग, तोही ‘दिसवडा’ देऊन त्यांना यात्रेत सहभागी करून घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि स्थानिक नेत्यांची बरीच फजिती झाली. आता तर यात्रेच्या रिलवर तामिळ व तेलगू गाणी टाकून काँग्रेसच्या मीडिया टीमने सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. तमिळनाडू-पुडुचेरीत काँग्रेसच्या प्रचारात ही गाणी जोरात वाजत होती. आता ही गाणी गोवा रक्षण यात्रेत कोणी टाकली, कोणास ठाऊक. पण हळदोणा मतदारसंघात ती वाजल्याची कुजबुज ऐकायला मिळाली. खरे-खोटे तो कार्य सिद्धीस नेणाऱ्यास माहीत!

Khari Kujbuj Political Satire
Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

कुडचडेत नवा चेहरा?

कुडचडे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर दावा सांगणाऱ्यांना बाजूला ठेवून भाजप वेगळाच चेहरा मतदारांपुढे आणणार असल्याची चर्चा होत आहे. आमदार निलेश काब्राल व रोहन देसाई दोघेही भाजपच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार असले, तरी भाजपने म्हणे कुडचडे मतदारसंघ राखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांना मैदानात उतरविण्याचा विचार चालविल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ यांना या मतदारसंघात मोठा जनाधार असून, अजातशत्रू असलेल्या सिद्धार्थ गावस देसाई यांना ‘अक्रॉस द पार्टी’ समर्थन असल्याचा दावा करण्यात येतो. आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे सिद्धार्थ आणि भाजपच जाणो!

महिला सक्षमीकरणाचे धडे

डिचोली येथील वचनपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. ‘तुम्हाला योजनेचा लाभ झाला की नाही?’ असा थेट प्रश्न विचारत त्यांनी लाभार्थी महिलांकडून योजनांची माहिती जाणून घेतली. राज्य सरकार आणि केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असून, राज्यातील महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार प्राधान्याने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषणात महिला आणि त्यांच्यासाठीच्या योजनांवर विशेष भर दिसून आला. महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारकडून मिळणारे हे प्राधान्य राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जात असले, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिलांपर्यंत पोहोचणे हीच या योजनांची खरी फलश्रुती ठरेल, नाही का? असो..मुख्यमंत्र्यांनी शनिवारी महिलांसाठी असलेल्या योजनांचा वाचलेला पाढा मात्र चर्चेचा विषय ठरला.

विनयबाब पुन्हा सावर्डेत?

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार विनय तेंडुलकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. विनयबाब हे भाजपमधील वजनदार नेते असल्याने वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची गर्दी झाली होती. सावर्डेचे आमदार असताना मतदारसंघात केलेली विकासकामे आणि मंत्रीपदाच्या काळातील काही धोरणात्मक निर्णयांचीही यावेळी चर्चा रंगली. मात्र, वाढदिवसाच्या निमित्ताने ‘विनयबाब पुन्हा सावर्डेच्या मैदानात उतरणार की काय?’ अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. अर्थात, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसले, तरी वाढदिवसाच्या कार्यक्रमात रंगलेली ही चर्चा आता उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.

म्हापशात गुप्त खलबतं!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापसा भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत घडामोडी सुरू झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका खासगी बैठकीत स्थानिक उद्योजक विशांत पानकर यांचे नाव अचानक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शहरात हिंदू चेहऱ्याची वाढती मागणी आणि पानकरांची स्वच्छ प्रतिमा पाहता, वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावाला प्राथमिक पसंती मिळाल्याची चर्चा आहे. आता पानकर उमेदवारी स्वीकारतात की नाही, यावर पुढील राजकीय समीकरणे आकार घेतील. मात्र, या हालचालींमुळे माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, मयूर सावकार आणि गुरुप्रसाद पावसकर यांसारख्या इच्छुकांमध्ये नक्कीच अस्वस्थता पसरली असेल! दुसरीकडे, प्रलंबित विकासकामांमुळे विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्याविरोधात खदखदणारा असंतोष पाहता, डिसोझांचा बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप खरोखरच नवा चेहरा देणार की बंडखोरीच्या भीतीने निर्णय बदलणार, याकडे लक्ष लागले आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

परबची चाचपणी

रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब आपल्या फेसबुक पेजवर सक्रिय झाले आहेत. दररोज काही ना काही पोस्ट ते टाकत आहेत. परवा त्यांनी मडगावमधील बैठकीविषयी टाकलेल्या पोस्टवरून बरीच वावटळ उठून गेली. त्यानंतर आता त्यांनी, एकेकाळी ‘आरजीपी’च्या रॅलीमध्ये इतर पक्षांचे नेते सहभागी होत होते. आता ‘यलो-ब्लॅक’ टॅक्सी दुसऱ्यांची भाडी मारत आहेत. काय ही प्रगती आणि विकास, अशी पोस्ट करून आरजीपीच्या नेत्यांचा इतर पक्षांच्या रॅलींमध्ये झालेल्या सहभागावर टोला मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. परब सध्या फेसबुकवरील आपल्या पोस्टला किती प्रतिसाद मिळतो, हे तपासत असावेत. ते पुन्हा राजकारणात येतील किंवा नव्या पक्षाची स्थापना करतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागलेली आहे, हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोस्टला ‘लाईक’ करणाऱ्यांमध्ये त्यांच्या समर्थकांचाच अधिक भरणा असल्याचे दिसते.

सिद्धेशची तयारी

२०२२च्या विधानसभा निवडणुकीत कुंभारजुवेतून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार राजेश फळदेसाई यांनी इतर सात जणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचे केडर नेते तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांच्यासमोरील ‘राजकीय टेन्शन’ वाढले होते. पण, भाजप आमदार या नात्याने फळदेसाई यांच्या कामावर कुंभारजुवेतील मतदार नाराज आहेत. दुसरीकडे, सिद्धेश यांना यावेळी कुंभारजुवेतून भाजपची उमेदवारी हवी असल्याने त्यांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ही संधी साधण्यासाठी त्यांनी आमदार फळदेसाई यांच्यावर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. ‘कुंभारजुवेत खूप काही करता आले असते, पण तसे झाले नाही,’ अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यांचे हे म्हणणे भाजपच्या दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठांना कितपत मान्य आहे? हे आता काही महिन्यांत कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com