खरी कुजबुज: भाजपाला उशिरा आलेली जाग!

Khari Kujbuj Political Satire: जो जनतेशी कनेक्ट राहतो, त्यालाच जनतेची सहानुभूती प्राप्त होते. कुंकळळी मतदारसंघात आपले बस्तान मजबूत करण्याची स्थानिक भाजपा मंडळाला मोठी संधी होती.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपाला उशिरा आलेली जाग!

जो जनतेशी कनेक्ट राहतो, त्यालाच जनतेची सहानुभूती प्राप्त होते. कुंकळळी मतदारसंघात आपले बस्तान मजबूत करण्याची स्थानिक भाजपा मंडळाला मोठी संधी होती. राज्यात व केंद्रात असलेल्या सत्तेच्या बळावर कुंकळळी मतदारसंघ भाजपामय करण्याची सुवर्णसंधी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी गमावली, असे आम्ही नव्हे, भाजपाचे कार्यकर्तेच म्हणायला लागले आहेत. निवडणूक जवळ आल्यावर भाजपावाले आता जागे झाले आहेत. कोणी झाडे वाटायला लागले, तर कोणी समाजमाध्यमावर व्हिडिओ व्हायरल करून आपले अस्तित्व दाखवायला लागला आहे. तर भाजपाचे काही स्थानिक नेते छत्र्या वाटायला लागले, तर काही नेते पार्ट्या द्यायला लागले आहेत. मात्र, भाजपाच्या हायकमांडला स्थानिक नेत्यांचे मर्यादित बळ माहीत झाल्यामुळे आता मतदारसंघाबाहेरील सक्षम उमेदवार आयात करण्याची तयारी भाजपाने केली असल्याची चर्चा आहे. आता पाहूया, युरी आलेमाव यांना शह देण्यासाठी भाजपाचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो?

अजब कारभार

सासष्टीतील कोलवा पोलिस ठाण्यात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. शुक्रवारी या ठाण्याचे ‘पीआय’ विदेश शिरोडकर यांना तातडीने दक्षिण गोवा ‘एसपी’ राखीव दलात पाठवून देण्यात आले व त्यांच्या जागी राघोबा कामत यांना पाठवून देण्यात आले आहे. या राघोबादादांची मोले चेकपोस्टवरील एका प्रकरणामुळे ‘एसपी’ राखीव दलात रवानगी करण्यात आली होती. शिरोडकर यांच्या बदलीच्या मागे कोलवा येथे ऑनलाईन जुगार छाप्यात झालेले अर्थकारण जबाबदार आहे, अशी आतील खबर आहे. खरे-खोटे ‘एसपी’ टिकमसिंग वर्मासरच जाणे. तेही या बदलीमागील नेमके कारण उघडपणे सांगत नाहीत म्हणा. विशेष म्हणजे कोलवा येथे टाकलेल्या या छापा प्रकरणातील ‘पीएसआय’लाही यापूर्वी एका गौडबंगालप्रकरणी अशीच शिक्षा करून त्याची दक्षिण गोवा ‘एसपी’ राखीव दलात रवानगी केली होती. आता खरी गंमत म्हणजे या ठाण्यात पूर्वी ‘पीआय’पदी काम केलेले काही साहेब लोक आपली पुन्हा कोलव्यात वर्णी लागेल का? याची चाचपणी करू लागले आहेत. याचा अर्थ असा होतो की, या ठाण्यात वरची कमाई बरीच आहे.

बंदर कप्तानचा लिपिक...

बंदर कप्तान खात्याचे कार्यालय नव्या टर्मिनलमध्ये स्थलांतरित झाले. त्या टर्मिनलचे नामकरणही झाले आणि आता नव्या टर्मिनलमधून कामकाजही सुरू झाले. पण, अजूनही काही कर्मचारी जुन्या ठिकाणी काम करतात. त्यांची बैठकव्यवस्था नव्या इमारतीत झालेली नाही. ती व्यवस्था करण्याचे काम सध्या केले जात आहे. परंतु, यात सर्वच निर्णय म्हणे बंदर कप्तान खात्याचे कॅप्टन घेत नाहीत, तर वरिष्ठ लिपिक घेतो. तो सांगेल ती पूर्व, असा सध्या येथे कारभार चालल्याची चर्चा आहे. शिवाय, याच लिपिकाने आता खात्याची जुनी इमारत म्हणे धोकादायक झाली आहे, असे सांगून तेथील कर्मचाऱ्यांना नव्या इमारतीत आणण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. पण, आत्तापर्यंत कधीच जुनी इमारत कोणालाही धोकादायक वाटली नाही. ती लिपिकाला कशी वाटली, याची चर्चा म्हणे वास्कोपर्यंत पोहोचली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

‘सोंगा’मागील कारणे कळतातच!

पाटो–पणजी जुन्या पुलावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या परिसरातील रात्रीच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरातील पब, बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचा रात्रीच्या वेळी तेथे गोंधळ सुरू असतो. त्यात अनेकजण आपल्या कार पुलाच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर पार्क करतात. परिणामी वाहतुकीलाही अडथळे निर्माण होतात. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून पहारा सुरू केला जातो. फुटपाथवर कार पार्क होऊ नयेत यासाठी बॅरिकेड्सही लावले जातात. मात्र, हा सारा ‘बंदोबस्त’ केवळ तीन-चार दिवसांपुरताच असतो. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या वेळी तेथे एकही पोलिस दिसत नाही. वाहतूक पोलिसांच्या या ‘सोंगा’मागील नेमकी कारणे काय आहेत, हे जनतेला मात्र आता आपोआपच कळून येत आहे.

मुख्यमंत्री, दामूंशी वाढवला संपर्क

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दोन दिवस दिल्लीत तळ ठोकत भाजपाध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता भाजप भवनाच्या उद्घाटनासाठी ६ सप्टेंबरला गोव्यात येणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंत्री, आमदार आणि कोअर समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेली साडेचार वर्षे भाजप आमदार म्हणून आपल्या पदाला अपेक्षित न्याय न दिलेल्या मंत्री आणि आमदारांची धाकधूक वाढली. उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याने धास्तावलेल्या मंत्री-आमदारांनी दोघांशीही संपर्क वाढवल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.

राजेश वेरेकर-विरियातोंची ‘दोस्ती’

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस व काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख राजेश वेरेकर यांची ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ प्रकारची दोस्ती तशी सर्वश्रुतच. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजेशनी कॅप्टनसाठी अक्षरशः जीव तोडून काम केले होते. आणि त्यामुळे असेल पण, कॅप्टनना फोंड्यात दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत राजेशना मिळालेल्या मतांपेक्षा दोन हजार अधिक मते प्राप्त झाली होती. त्यानंतरही हे दोघे अनेक कार्यक्रमांत, आंदोलनांत बरोबर दिसले आहेत आणि दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून असेल; पण शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त फोंड्याला आलेल्या कॅप्टननी राजेश हे काँग्रेसचे एक प्रामाणिक कार्यकर्ते असून पक्षाने त्यांनाच उमेदवारी द्यायला हवी, असे मत व्यक्त केले. कॅप्टनसाहेब, तिकिटाचे ठीक आहे; पण खरी लढाई तर पुढेच आहे. त्यावेळी तुमची दोस्ती किती कामाला येते, हे बघावे लागेल. हे आम्ही नाही बोलत, तर फोंड्याचे लोकच बोलत आहेत.

शिरोडकरांचा दांडगा अनुभव...

मंत्री म्हणून सुभाष शिरोडकर यांना आतापर्यंत चार वर्षांत २०८ सोमवार मिळाले. त्यातील १९० सोमवार त्यांनी जलस्रोत खात्याचे अभियंते व कर्मचाऱ्यांबरोबर घालवले. त्यांच्या समवेत राहिल्याने गोव्याला पुढील १५ वर्षांत पाण्याची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेतली. सहकार खात्याचे मंत्री या नात्याने त्यांनी एनपीए पुष्कळ कमी केला. जेव्हा त्यांनी खात्याची जबाबदारी घेतली, तेव्हा १२ हजार कर्जखाती होती. २०२५ नंतर आजपर्यंत सहकारी बँकांमध्ये २३ हजार जणांना कर्ज देण्यात आले. पण, केवळ २०८ खातीच एनपीए निघाली. हे मंत्री शिरोडकर यांनी स्वतः आज मडगावात सांगितले. एवढेच नव्हे, तर ज्याप्रमाणे बँक व्यवस्थापक कर्ज देतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर कर्जाचे हप्ते आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यामुळे एनपीए खात्यांची संख्या कमी झाली. त्यांना राजकारणात ४२ वर्षे झाली. त्यात त्यांनी वेगवेगळी खाती, संस्था हाताळल्या. राजकारणातील व वेगवेगळ्या क्षेत्रांतील त्यांचा दांडगा अनुभव कामाला आला, असेच म्हणावे लागेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

आवेर्तान नावेलीत सक्रिय खरे, मात्र...

नावेलीचे माजी आमदार आवेर्तान फुर्तादो पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी गेल्या आठवड्यात कार्यक्रम आयोजित करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सत्कार केला. वरकरणी हे सामाजिक कार्य दिसत असले, तरी त्यामागे ‘निवडणूक’ आहे, हे निश्चित. २०१२ साली फुर्तादो हे नावेली मतदारसंघात ‘जायंट किलर’ ठरले होते. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्यांनी बलाढ्य चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला होता. नंतर भाजपला पाठिंबा देऊन ते क्रीडामंत्रीही बनले होते. त्यानंतर ते यथावकाश काँग्रेस पक्षात दाखल झाले. मात्र, २०२२च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नावेलीत काँग्रेसच्या उमेदवारीवर पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. आता ते पुन्हा नावेलीतून निवडणूक लढविण्याची तयारी करू लागले आहेत. मात्र, या खेपेला कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तूर्तास, वेट अँड वॉच.

नावेलीत इच्छुकांची गर्दी

विधानसभा निवडणुकीसाठी नावेली मतदारसंघात अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपचे विद्यमान आमदार उल्हासबाब तुयेकर आहेतच. शिवाय सिद्धेश भगत, प्रतिमा कुतिन्हो, वालंका आलेमाव, माजी आमदार व मंत्री आवेर्तान फुर्तादो, सिप्रू हेही इच्छुकांच्या गर्दीत आहेत. आता ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जेर्सन गोम्स यांनीसुद्धा नावेलीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका बाजूने भाजपला पराभूत करण्याच्या हाणाभाका घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने प्रत्येकाने उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करायचे. त्यामुळे भाजप पराभूत होईल काय? जेवढे उमेदवार वाढतील, तेवढेच उल्हासबाब मनातल्या मनात उल्हासित होतील. गत निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात उतरले होते आणि उल्हासबाब पाच हजार मतांनी निवडून आले होते. त्याचीच पुनरावृत्ती तर होणार नाही ना! म्हणूनच की काय, उल्हासबाब आपणच जिंकणार, हे अगदी छातीठोकपणे सांगत सुटले आहेत.

कॅप्टनचे ‘प्रॉम्प्ट’ काम!

लोकांची कामे तात्काळ व्हावीत, यासाठी सरकारी योजना आणि उपक्रमांना आवश्यक असलेले खासदाराचे स्टँप गाडीसोबतच घेऊन फिरणारे खासदार म्हणजे कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस. बरेच राजकारणी आपले स्टँप आणि इतर साहित्य लोकांसाठी संपर्क कार्यालयात ठेवतात; मात्र कॅप्टनबाब स्वतःसोबत हे साहित्य घेऊनच फिरतात. फोंड्यातील कित्येक नागरिकांनी आपल्या कामांसाठी खासदारांच्या सहीचा वापर करून कामे करून घेतली आहेत. शनिवारी फोंड्यातील एका दिव्यांग तरुणाला खासदार निधीतून दुचाकी देण्याच्या कार्यक्रमासाठी खासदार व्हिरियातो फोंड्यात आले असता, दोन महिलांना ही बातमी कळताच त्यांनी खासदारांना गाठले आणि सही व स्टँपची मागणी केली. त्यावर खासदारांनी लगेच सही आणि स्टँप उपलब्ध करून दिला. यालाच म्हणतात ‘प्रॉम्प्ट’ काम...!

गर्दी बोरकरांकडे, चिंता लोबोंसह काँग्रेसकडे!

रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवोली मतदारसंघात आपल्‍या पक्षाची बैठक घेतली. त्‍याला ७००च्‍या वर लोक उपस्‍थित होते. कुठलाही गाजावाजा न करता झालेल्‍या या बैठकीची चर्चा लोबो दाम्‍पत्‍याच्‍या घरी गेले दोन दिवस चालली आहे. आमदार दिलायला लोबो या सुद्धा उपरोक्‍त बैठकीमुळे चक्रावून गेल्‍या. याचा अर्थ ‘आरजी’ पक्षाचे घरचे वासे फिरले असले तरी अजूनही त्‍यांचा जनाधार शाबूत तर नाही ना, असे वाटण्‍यासारखी ही परिस्‍थिती आहे. त्‍यामुळे वीरेश बोरकर हे काँग्रेस पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ८ ते १० जागांची मागणी करणार आहेत. या जागा पदरात पाडून घेतल्‍याशिवाय ते आघाडीवर मोहोर लगावणार नाहीत. काँग्रेस पक्षाची स्‍थिती त्‍यांचे इतर भागिदार कशी करून टाकतात, हे काही दिवसांत कळेलच म्‍हणा! ∙∙∙

एल्विस झाले खुश!

‘प्रयत्नांती वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात ते खरे. सेवानिवृत्त आयएएस सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी राजकारणात येण्यासाठी सरकारी नोकरीचा मोठा हुद्दा सोडून राजकारणात प्रवेश केला होता. प्रथम आम आदमी पक्षाचे एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असे जाहीरही केले होते; मात्र ‘आप’ व एल्विस गोम्स मोठ्या मतफरकाने पराभूत झाले. त्यानंतर एल्विसने काँग्रेसचा ‘हात’ हातात धरला. इथेही एल्विस विजयी होऊ शकले नाहीत. आता एल्विसने आपण ‘स्वाभिमानी कुंकळळीकरां’चा उमेदवार असल्याचे जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अखिल भारतीय ख्रिस्ती समाज संघटनेने एल्विस गोम्स यांना हल्लीच पुरस्कृत करून त्यांचा सन्मानही केला. याचा फायदा एल्विस गोम्स यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर एल्विसला ख्रिस्ती मतदारांनी साथ दिली, तर त्यांना आमदार बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

कोण पुढे, कोण मागे?

विधानसभा निवडणुकीसाठी फोंडा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि मगो पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. संपूर्ण राज्याचे या मतदारसंघाकडे खास लक्ष लागले आहे. त्यामुळे या तिन्ही राजकीय पक्षांकडून मतदारसंघातील मतदारांचा कल कुठे आहे, कोणते मतदार आपल्याला मते देऊ शकतात, याचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, आरजी आणि गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षांच्या पातळीवर सध्या तरी सामसूम दिसते. विरोधकांची आघाडीची मोट बांधण्याची तयारी सध्या तशी जोरात आहे; पण अधूनमधून खो घालण्याचे प्रकारही घडताना दिसत आहेत. मात्र, या अडचणी दूर करता करता निवडणूक जाहीर झाली, तर या स्थानिक पक्षांची मात्र धावपळ होईल, हे निश्चित. दुसरीकडे, भाजप, काँग्रेस आणि मगोवाले बरेच पुढे गेलेले असतील, असे फोंडावासीय म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com