Goa Politics: खरी कुजबुज, कोण जाणार? कोण येणार?

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री एकाचेवळी दिल्लीत असणे हा निश्चितपणे योगायोग नाही हे कोणीही सांगू शकेल.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political Satire्ोगलगक ुदसोलूोक
Published on
Updated on

कोण जाणार? कोण येणार?

‘ज्याचे त्याचे नशीब’, असे म्हणतात खरे. सगळेच नशिबावर सोडले तर कसे होणार. मुख्यमंत्री दिल्लीतून बंद लिफाफा घेऊन येणार व लिफाफा उघडल्यावर कोण राहणार कोण जाणार, याचा उलगडा होणार. शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्रिमंडळ बदल व विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जातेय.मंत्रिमंडळात एक जागा खाली आहे, ती तवडकरांना मिळणार असा अंदाज आहे. नीळकंठ हळर्णकर व पर्यावरण मंत्र्यांची विकेट जाण्याची शक्यता आहे. सुभाष फळदेसाई यांचीही जागा असुरक्षित असल्याचे बोलले जातेय. दिगंबर कामत सभापती होणार., सुभाष फळ देसाईंना मंत्रिमंडळात प्रमोशन मिळणार व जनतेला दिलासा मिळणार ? सुभाष सभापती व कामत मंत्री बनणार ? मायकल व दिलायला यांच्या पैकी एकाला मंत्रिपद मिळणार का? असे तर्क वितर्क लढविले जाताहेत.

पूर्वनियोजित दौऱ्याचे कवित्व

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री एकाचेवळी दिल्लीत असणे हा निश्चितपणे योगायोग नाही हे कोणीही सांगू शकेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या म्हणण्यानुसार त्‍या दोघांचे दौरे पूर्वनियोजित आणि सरकारी कामासाठी आहेत. मुख्यमंत्री मात्र पक्षाच्या नेत्यांची भेट घेतील. दामू यांनी पूर्वनियोजित दौरा असे सांगून राजकीय चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी अलीकडे सुरू असलेली राजकीय चर्चेची वावटळ तशी शांत होण्याचे नाव घेणार नाही. मंत्रिमंडळातील रिक्त जागी कोण नव्हे, तर आणखीन कोणाला मंत्रिपदाची संधी इथपर्यंत चर्चेने गती घेतली आहे. त्यामुळे दामूंचा प्रयत्न तोकडा पडणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

तवडकरांचे वाहतूक खाते

अद्याप मंत्रिमंडळात बदल व्हायचा आहे. नव्या मंत्र्यांनी शपथ घ्यायची आहे. त्यानंतर खाते वाटपही होईल. सध्या विधानसभेच्या सभापतिपदी असलेल्या रमेश तवडकर यांनी ट्रान्स्पोर्ट ॲग्रीगेटर विषयावर बोलताना पुढेमागे वाहतूक खात्याची जबाबदारी आली, तर त्यावर भाष्य करेन असे सोमवारी सांगून राजकीय तरंग उठवले आहेत. टॅक्सी व्यावसायिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. सर्वच आमदारांना अलीकडे ते भेटू लागले आहेत. त्याविषयावर मुख्यमंत्री किंवा वाहतूकमंत्री अधिक भाष्य करतील इथपर्यंत तवडकर यांचे म्हणणे ठीक होते, पण जाता जाता ते पुढे मागे वाहतूक खाते मिळाले, तर मत व्यक्त करू म्हणाले आणि तेच विधान चर्चेचे ठरले. ∙∙∙

बेताळभाटीत व्हेंझींचे काय काम?

सध्‍या नुवेचे आमदार आलेक्‍स सिक्‍वेरा हे आजारी असल्‍याने नुवेकडे लक्ष देण्‍यासाठी कुठलाही आमदार नाही. या पार्श्वभूमीवर नुवे मतदारसंघात येणाऱ्या बेताळभाटी गावात एक समस्‍या निर्माण झाल्‍यानंतर जवळच्‍या बाणावली मतदारसंघाचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी बेताळभाटीच्‍या लोकांना गरज पडल्‍यास त्‍यांनी आपल्‍याकडे कामे घेऊन यावीत मी ती सरकार दरबारी मांडू शकतो असे सांगितले होते. याला आता नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्‍हणतात, बेताळभाटीतील समस्‍या सोडविण्‍यास आम्‍ही समर्थ आहोत. व्हेंझींना तिथे नाक खुपसण्याची गरजच काय, असा सवाल मिकी पाशेको यांनी केला आहे. मिकी म्‍हणतात, बाणावलीतच एवढ्या समस्‍या आहेत, त्‍याच वेंझींना सोडविता आल्‍या नाहीत. अशा परिस्‍थितीत नुवेतील समस्‍या सोडविण्‍यास व्हेंझींना वेळ तरी आहे का? ∙∙∙

मडगावात शकुनी मामांचा सुळसुळाट

पूर्वीच्या काळात शकुनी मामा, कळी नारद म्हणून पात्रे होती. त्यांचे काम केवळ या कानाची गोष्ट त्या कानाला सांगणे, लोकांमध्ये संघर्ष, लढाई लावून देणे अशी असायची. आत्ताच्या जमान्यातही शकुनी मामा, कळी नारद ही पात्रे मानवी रूपाने अस्तित्वात आहेत. निवडणुका जवळ पोहोचल्या की त्यांचा वावर सुरू होतो. मडगावातही या पात्रांचा सुळसुळाट वाढलेला आहे. मडगावात सध्या तीन नेत्यांमध्ये निवडणुकीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यातील दोघे तरुण मंडळी व एक ज्येष्ठ. पण या तिघांच्याही कळपात आता शकुनी मामा, कळी नारद रिघायला सुरू झाले आहेत. ते स्वतः ज्या कळपात आहेत त्या नेत्याकडे प्रामाणिक असे भासवतात. पण हळूच एका नेत्याच्या हालचाली दुसऱ्या नेत्याला सांगण्याचे काम चोखपणे करून दुसऱ्याला सावध करतात. हातात मोबाईल असतोच, त्यामुळे काम सोपे झाले आहे. एक नेत्याने योग शिबिर म्हणा, वैद्यकीय शिबिर म्हणा, आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम म्हणा आयोजन केले की लगेच त्याच जागी दुसरा नेता असे कार्यक्रम करतो. हे शकुनी मामा किंवा कळीचे नारद एकाच्या कळपात फिरतात, तेव्हा ते हळूच फोन करून दुसऱ्या नेत्याला सांगतात. ‘हांव तुज्याच बरोबर, ताणे फोर्स केलो म्हणू गेलो’. यांना हसावे की रडावे हेच कळत नाही.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: चोरलेल्या गाड्या झाडीत लपवून ठेवायचा, सराईत दुचाकी चोरट्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी

पालिका निवडणुकीत संधी नाही?

नगरपालिका निवडणुका जवळ जवळ आठ ते नऊ महिने दूर असल्या, तरी मडगावात संभाव्य उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मडगावमधील काल परवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना राज्य कार्यकारी समितीत स्थान दिल्याने सध्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनासुद्धा समितीत स्थान देऊन संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक मात्र खरे, ज्यांना राज्य समितीत स्थान देण्यात आला आहे त्यांना मडगाव नगरपालिका निवडणुका लढण्यापासून दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. रुपेशबाबने यापूर्वीच आपण निवडणुकीत नाही हे स्पष्ट केले आहे, पण त्याचा १७ प्रभाग सिद्धांत गडेकरचा काटा काढण्यासाठी महिलांसाठी आरक्षित करण्याची शक्यता आहे, तसेच शैला पार्सेकरला राज्य समितीत घेतल्याने तिला संधी नाही. आके प्रभाग १९ मधून तनुजा पैंगीणकर यांना समितीत घेतल्याने त्यांच्या जागी पसंतीच्या महिलेला निवडणुकीत उतरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रश्न राहिला मनोजबाबचा. मनोजबाब निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे असे बोलले जाते. त्याचे व विद्यमान नगरसेविका यांच्यामध्ये मतभेद असल्याचेही बोलले जाते, पण मनोज यांना राज्य समितीत घेतल्याने त्यांना निवडणुकीची संधी नाही हे त्यांनी जाणले पाहिजे असे कार्यकर्तेच बोलत आहेत. ∙∙∙

आर्लेकरांचे अनुभवाचे बोल

गोवा विद्यापीठाचा ४१ वा स्थापनादिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना निमंत्रण देण्यात आले. त्यांनी ते स्वीकारले आणि त्यांना भाषणासाठी एक विषय देण्यात आला होता. विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रमुख व्यक्ती मात्र त्यांना सातत्याने तुम्हाला देण्यात आलेल्या विषयावर बोलायचे आहे याची वारंवार जाणीव करून देत होते. त्यामुळे राज्यपालांसारख्या सांविधानिक पदावरील व्यक्तीला असे उपदेश देणे खटकणारेच ठरते. त्यांनी आपल्या भाषणात या प्रकारचा उल्लेख करत शालजोड्यांतून योग्य तो समाचार घेतला आणि विद्यापीठ म्हणजे काय? कशाप्रकारचे त्यांचे कार्य असावे याचा अतिशय उत्तम धडा विद्यापीठातील प्रशासन आणि प्राध्यापकांना शिकविला... त्यांनी बिहार, हिमाचल आणि आता केरळसारख्या मोठ्या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांचे कुलपती म्हणून कामकाज जवळून पाहिल्याने अनुभवाचे खडे बोल सुनावण्याचा अधिकार त्यांना होताच. त्याचा आता कितपत लाभ गोवा विद्यापीठ करून घेत हे पाहावे लागेल अन्यथा... ये रे माझ्या मागल्या हीच स्थिती होईल.

...मग आवेर्तान यांचे काय?

२०१२ मधील निवडणुकीत गोव्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली व अनेक नवे चेहरे विधानसभेत पोचले. त्यात बाणावलीतून कायतू, वेळ्ळीतून बेंजामिन तसेच नावेलीतून आवेर्तान यांचा समावेश होता. हे तिघेही तसे अपक्ष होते व त्यांना भाजपने पाठिंबा दिला व एका नव्या राजकीय हवेवर स्वार होऊन ते आमदार झाले. मात्र, ही हवा २०१७ पर्यंत टिकली नाही व ही मंडळी पुन्हा आमदार बनू शकली नाही. नावेलीतील आवेर्तान २०१७ नंतर काँग्रेसच्या वळचणीला गेले, पण त्यांना विजयाला काही गवसणी घालता आली नाही. त्यामागील कारणे वेगळी आहेत. अजून ते काँग्रेसचा चेहराच आहेत, पण सक्रिय नाहीत. असे असताना म्हणे झेडपी असलेल्या सिप्रुंसाठी काँग्रेस गळ घालत आहेत. तशातच माजी महिला काँग्रेस अध्यक्ष असलेल्या प्रतिमा मॅडमही काँग्रेससाठी आतून प्रयत्न करीत आहेत. तशातच सिप्रुंना काँग्रेसने ओढले, तर आवेर्तानचे कसे होणार? असा प्रश्न गेल्या दोन निवडणुकीत आवेर्तानसाठी झटलेले करत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: सुडाने पेटलेल्‍या पित्‍याचा ॲसिड हल्ला, मुलीच्‍या मृत्‍यूला जबाबदार धरून युवकाला केले जखमी, संशयिताला महाराष्ट्रातून अटक

नाही... नाही म्हणत किरण फॉरवर्डमध्ये!

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांची काही आठवड्यापासून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्याशी वाढलेल्या सलगीचे कारण सोमवारी दिसून आले. बार्देशमधील गोवा फॉरवर्डच्या जनता दरबारात कांदोळकर हे सरदेसाईंबरोबर व्यासपीठावर दिसल्याने अखेर कांदोळकर फॉरवर्डमध्ये जाणार असे स्पष्ट संकेतच मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभेत सरदेसाईंना भेटण्यासाठी गेलेल्या कांदोळकरांना पत्रकारांनी फॉरवर्डमध्ये जाणार का, अशी विचारणा केली असता ‘शीतापुढे मीठ कशाला खायचे’ असे म्हटले होते. कदाचित या वाक् प्रचाराचा अर्थ समजलेला असावा. त्यामुळेच त्यांनी फॉरवर्डच्या व्यासपीठावर जाण्याचा विचार केलेला दिसतो. अजून अधिकृतरित्या कांदोळकर फॉरवर्डमध्ये गेले नसले तरी त्यांची सरदेसाईंशी असलेली मैत्री पाहता ते थिवीतील ‘फॉरवर्ड’चे उमेदवार असतील, हे मात्र निश्चित.

मडगावातील चिमणीचे गौडबंगाल

गेले दोन दिवस मडगावात ज्याच्या त्याच्या तोंडी एका चिमणीची चर्चा चाललेली आहे. ही चिमणी म्हणजे पक्षी नाही की घरांत पेटवायची चिमणी नाही. कारण दिव्याची चिमणी दिसायलाही दुर्मीळ झालेली आहे. तर ही चिमणी म्हणजे धुराडे आहे. सिने विशांतजवळील एका बहुमजली इमारतीत कोणत्याही यंत्रणेचा परवाना न घेता तीन मजली इमारतीवर चढविल्या जाणाऱ्या धुराड्याला तेथील जागृत रहिवाशांनी आक्षेप घेतला व एका भयानक प्रकरणाचा पर्दाफाश झाला. मुद्दा तो नाही, तर कोणताही परवाना न घेता शनिवार - रविवार धरून कशी बेकायदेशीर कामे केली जातात व सर्व संबंधित कसे झोपेचे पांघरूण घेतात त्याचा हा ज्वलंत पुरावा आहे. तसे पाहिले तर मडगावातील हे केवळ हिमनगाचे टोक आहे. एकदा अशी कामे आटोपली की कोणाला हाताशी धरून त्यांना कायदेशीर रूप द्यावयाचे ते संबंधितांना चांगलेच माहीत आहे. विशालबाबांमुळे हा गैरप्रकार उघड झाला ते मात्र खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com