
पणजी: विधानसभेत बोलताना सभ्यतेचे पालन करणे अपेक्षित असते. त्यामुळेच प्रत्येकाचा ‘माननीय’ असा उल्लेख करण्यात येतो. असे असले तरी चर्चेच्या ओघात भाषा बदलते आणि अपेक्षित नसलेले शब्दही तोंडावाटे बाहेर पडतात. बुधवारी पर्यटन खात्यावर विचारलेल्या प्रश्नासंदर्भात विश्लेषण करताना सांत-आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना उद्देशून ते चारशेवीसगिरी करत असल्याचा आरोप केला. खंवटे यांनी त्यास आक्षेप घेतला, मात्र बोरकर बोलतच राहिले.
दुसरा प्रसंग हा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासंदर्भातील आहे. त्यांनी शून्य काळात विषय मांडण्यासाठी सूचना दिली होती. शून्य काळात मांडावयाच्या विषयात त्यांच्या विषयाचा समावेश नसल्याने त्यांनी त्याचा जाब विचारण्याचे ठरवले.
सरकार असे काय ‘चोरत’ आहे म्हणून ‘लपवत’ आहे असा शब्दप्रयोग त्यांनी केला. त्यावर बसल्या जागीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘येथे कोणी काही चोरायला बसलेले नाही, चोर कोणाला म्हणता?’ अशी विचारणा केली.
यानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘भ्रष्टाचारी’ आणि ‘चारशेवीस’ हे शब्द कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे केली. त्यास आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘भ्रष्टाचारी’ हा शब्द असंसदीय नसल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडणे सुरू केले. विधानसभेतील चर्चेची पातळी मोजण्यासाठी ही उदाहरणे पुरेशी ठरावीत.
काल मंगळवारी विधानसभेत ‘अक्षयपात्र’च्या विषयावर लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा करावी या मागणीसाठी विरोधी आमदारांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली होती. त्यावेळी आमदार वीरेश बोरकर हे विरोधात असूनही आपल्याच जागी बसून राहिले होते. बुधवारी पर्यटनविषयक प्रश्नावर नेमके उत्तर मिळावे यासाठी ते वाद घालू लागले आणि अखेरीस त्यांनी सभापतींसमोरील हौद्यात धाव घेतली.
त्यावेळी इतर विरोधी आमदारांनी त्यांना साथ दिली नाही. ते आपल्याच जागी बसून राहिले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तर त्या विषयावर पुरवणी प्रश्न विचारणे सुरू केले. सभापतींनी दुसरा प्रश्न पुकारेपर्यंत बोरकर तेथेच उभे राहिले. अधूनमधून ते बोलत होते. त्यावेळी दोनवेळा सभापतींनी त्यांना ‘सभागृहाबाहेर काढावे लागेल’ अशी तंबी दिली.
विधानसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाले तेव्हा प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याचा मुद्दा गाजला. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रश्नांची उत्तरे अकरा वाजता अपलोड केल्याचे नमूद केले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी केलेल्या आरोपांचा संदर्भ त्यांनी यासाठी दिला. त्यावर आलेमाव यांनी आपण रात्री एक वाजेपर्यंत कार्यालयात होतो तोवर उत्तर मिळाले नसल्याचे नमूद केले.
केप्याचे आमदार एल्टन डिकॉस्टा आणि आलेमाव यांचा प्रश्न जोडला गेल्याने त्याचे उत्तर एल्टन यांच्या नावावर दिसेल असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यावर आलेमाव यांनी आपण एल्टन यांच्या नावावर आपल्या प्रश्नाचे उत्तर का शोधू? अशी विचारणा केली.
यावेळी उद्वेगाने त्यांनी सभापतींच्या मागे बसवण्यात आलेला नवा डिजिटल फलक व्हायरसमुळे बंद पडला असे नमूद केले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे जगभरात पर्यटन खाते ‘रोड शो’ आयोजित करत असल्याचे सांगून त्याचे समर्थन करत होते. यावेळी ‘जंगल में मोर नाचा, किसने देखा’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर ‘तात्काळ मोर नाचवू नका, नेमकेपणाने उत्तर द्या’ अशी टिप्पणी ऐकायला मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.