

पणजी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत आणि पोलिसांची तपासणी टाळण्यासाठी काही पर्यटक अजब क्लृप्त्या लढवत असल्याचे समोर आले आहे. गोव्यातील पर्वरी पोलिसांनी एका खाजगी कारवर 'पोलीस' (Police) अशी बनावट पाटी लावून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या एका गटावर मोठी कारवाई केली आहे.
पर्वरी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात नियमित गस्त घालत असताना त्यांना महाराष्ट्र पासिंगची एक खाजगी आलिशान कार संशयास्पद रितीने फिरताना आढळली. या कारच्या दर्शनी भागावर 'पोलीस' असे लिहिलेली पाटी लावण्यात आली होती.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ही कार थांबवून चौकशी केली. तेव्हा कारमधील एकाही व्यक्तीचा पोलीस दलाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे उघड झाले. केवळ पोलीस नाक्यांवर तपासणी होऊ नये आणि वाहतूक कोंडीत विशेष सवलत मिळावी, या उद्देशाने या पर्यटकांनी ही बनावट पाटी लावली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNSS) कलम ३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या पर्यटकांना म्हापसा येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर (SDM) हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असली, तरी त्यांना भारी दंड आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी संबंधित खाजगी वाहन आणि ती बनावट पाटी जप्त केली आहे.
या कारवाईनंतर गोवा पोलिसांनी पर्यटकांना कडक इशारा दिला आहे. "पोलीस दलाच्या नावाचा किंवा चिन्हाचा गैरवापर करणे हा एक गंभीर दखलपात्र गुन्हेगारी स्वरूपाचा अपराध आहे. असे करून कायद्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही," असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.