Ram Mandir Ayodhya: गेल्या कित्येक वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीबाबत आणि राम मंदिरातील श्रींच्या प्राणप्रतिष्ठेबाबत देशवासियांना उत्सुकता लागली होती.
अखेर रामभक्तासाठी मंगलमय आणि अभिमानाचा असा क्षण आला असून अवघ्या काही तासांतच अयोध्येत श्रींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.
या निमित्ताने सध्या देशभरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक राज्यात या सोहळ्याचा आनंदोत्सव सुरु असलेला पाहायला मिळतेय.
सध्या गोव्यातही या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र साफसफाई, सजावट, सुशोभीकरण सुरु असून राजधानी पणजीत सर्वत्र भगवे ध्वज तसेच श्रीरामाच्या प्रतिकृती, मंदिरांचे कटआऊट उभारलेले दिसत आहेत.
भाजपच्या वतीने मागील काही दिवस राज्यात साफसफाई, सजावटीचे कार्यक्रम सुरु असून भाजपच्यावतीने देशभरात मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले गेले होते. खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथील दत्तमंदिर तसेच राधाकृष्ण मंदिरात साफसफाई केली होती.
तसेच 1992 मध्ये गोव्यातून अयोध्येला जे कार सेवक गेले होते त्यांचा सत्कार मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दिगंबर कामात यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
उद्या 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, बँका यांना सुट्टी देण्यात आली असून गोव्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने गावात मद्य, मांस विक्रीवर निर्बंध घातले आहेत.
एरव्ही पर्यटन, पब, डिस्को, कॅसिनो हीच ओळख बनलेल्या गोव्याचे रूप पालटले असून कॅसिनोसारख्या आस्थापनेवर देखील कालपासून जय श्रीराम लिहिलेले भगवे ध्वज फडकताना दिसत आहेत. थोडक्यात गोमंतकभूमी राममय झाल्याची चित्र सध्या पाहायला मिळतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.