डिचोली : डिचोली तालुक्यातील एक मोठी असलेल्या आणि गत पंचायत मंडळाच्या कारकिर्दीत संगीतखुर्चीचा खेळ अनुभवलेल्या मये-वायंगिणी पंचायतीत सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
या पंचायतीच्या ओबीसीसाठी राखीव असलेल्या प्रभाग 11 मधून सुवर्णा चोडणकर या बिनविरोध निवडून आल्याने यावेळी दहा प्रभागांतून निवडणूक होणार आहे. मावळत्या पंचायत मंडळातील सात पंचसदस्य यावेळी निवडणूक लढवत नसल्याने या पंचायतीत यावेळी नवीन चेहऱ्यांना चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यातच स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
पाच माजी सरपंच रिंगणात
मावळत्या पंचायत मंडळातील सीमा आरोंदेकर, कुंदा मांद्रेकर आणि विश्वास चोडणकर यांच्यासह अंकिता नाईक आणि सुभाष किनळकर हे पाच माजी सरपंच यावेळी आपले भवितव्य अजमावत आहेत.
तर, मावळत्या पंचायत मंडळातील पंचसदस्य प्रेमेंद्र शेट यांची आमदारपदी निवड झाल्याने त्यांच्यासह विजय पोळे, तुळशीदास चोडणकर, नमिता तारी, ऊर्वी मसुरकर, विनिता गावकर आणि कृष्णा परब हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. तसेच मावळत्या पंचायत मंडळातील संतोष गडेकर यांच्यासह कृष्णा चोडणकर, काशिनाथ मयेकर, नारायण तारी आणि दिलीप शेट हे माजी पंच यावेळी भवितव्य अजमावत आहेत.
स्थलांतरीत मालमत्ता प्रश्न
स्थलांतरीत मालमत्तेच्या प्रश्नावरून मये गाव सदैव चर्चेत राहिलेला आहे. पर्यटनस्थळ असलेल्या मये गावचे नाव जागतिक स्तरावर पोचले असले तरी मयेवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला स्थलांतरीत मालमत्तेचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.
खाणपट्टा भागात येणाऱ्या मये गावात बहुतेक साधनसुविधा उपलब्ध असल्या तरी पंचायत इमारत प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. निवडणुकीत हे मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
15 महिला अजमावताहेत नशीब
मये-वायंगिणी पंचायतीच्या दहा प्रभागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात 15 महिला उमेदवारांचा समावेश आहे. राखीव असलेल्या प्रभाग-9 मधून सात महिला आमनेसामने आहेत. तर प्रभाग-3 आणि 10 मधून प्रत्येकी दोन महिला भवितव्य अजमावत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.