Surel Tilve: राज्यातील विजेची समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही. दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. असे असताना सरकार स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्याच्या तयारीत आहे. स्मार्ट मीटर आणायचेच होते तर डिजिटल मीटरचा घाट सरकारने का घातला होता, असा सवाल करीत आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुरेल तिळवे यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली.
पक्षाच्या कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुनील सिंगणापुरकर उपस्थित होते. गोमंतकीय माणूस अगोदरच विजेच्या वाढीव बिलांमुळे त्रासात पडलेला आहे. ही बिले वेळेत येत नसल्यामुळेही जनता मन:स्ताप सहन करीत आहे. आता तर सरकार पदपथांवरील दिव्यांचा खर्चही सामान्य लोकांच्या खिशातून वसूल करणार आहे.
प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे भूत सरकार लोकांच्या माथी मारणार आहे. त्या मीटरसाठीची 7 हजार रुपयांची रक्कम लोकांच्या बिलामधून वसूल केली जाणार आहे. राज्यात 6.5 लाख डिजिटल मीटरचे ग्राहक आहेत.
जर स्मार्ट मीटरच बसवायचे होते, तर डिजिटल मीटर कशासाठी बसविले, असा सवाल तिळवे यांनी उपस्थित केला. डिजिटल मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवायचे झाल्यास 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च सामान्यांच्या खिशातून काढला जाणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
राज्य सरकारने वीज वाहने खरेदी करण्यासाठी सवलत योजना आणली होती. त्यानुसार राज्यात हजारो वाहने लोकांनी खरेदी केली. परंतु अद्याप एकाही वाहनधारकाला ही सवलत मिळालेली नाही, याकडे सिंगणापुरकर यांनी लक्ष वेधले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे प्रीपेड मंत्री आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांना रिचार्ज केले की ते एक बोलताना आणि निवडणुकीनंतर रिचार्ज संपले की दुसरेच काही तरी बरळतात. आता स्मार्ट मीटरचे नवे भूत गोमंतकीय जनतेच्या माथी मारण्याचा त्यांचा तसेच सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यास प्राणपणाने विरोध केला जाईल.
- सुरेल तिळवे, ‘आप’चे प्रदेश उपाध्यक्ष
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.