Rashmi Lamba IFFI 2022: भारतीय सिनेजगतात अजूनही स्त्रियांना मानाचं स्थान नाही? रश्मी लांबा यांचं म्हणणं काय?

Rashmi Lamba: सिनेमातही महिला बेदखल : इफ्फीमधील परिसंवादात वक्त्यांनी मांडले परखड वास्तव
Rashmi Lamba |Goa News
Rashmi Lamba |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Rashmi Lamba IFFI 2022: गेल्या 75 वर्षांत देशात केवळ 4 महिलांनाच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. गेल्या 72 वर्षांत केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदाची संधीही केवळ चारच महिलांना मिळाली.

इतकंच नाही, तर गेली 13 वर्षे या मंडळातल्या सदस्यांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच असून, प्रत्यक्ष समाजात, सिनेमात तसेच सिनेक्षेत्रातही स्त्री-पुरुष समानता हे आजही मृगजळाप्रमाणेच आहे, असे प्रतिपादन या विषयाच्या अभ्यासिका प्रा. लक्ष्मी लिंगम यांनी केले.

‘रूपेरी पडद्याच्या चौकटी भेदणं :

लिंगभाव आणि हिंदी सिनेजगतातलं काम’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या. या मास्टर क्लासमध्ये टाटा समाजविज्ञान संस्थेच्या संशोधन पथकातील प्रा. लक्ष्मी लिंगम, प्रा. शिल्पा फडके आणि रश्मी लांबा, तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट समीक्षक मीनाक्षी शेड्डे आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते पुशन कृपलानी यांचा समावेश होता.

एका अभ्यासानुसार, पुरुष आणि महिलांचे व्यवसाय रूढी-परंपरांनुसारच असल्याचे आढळले. यासंदर्भातील संशोधन हाती घेण्यामागे चित्रपट उद्योग क्षेत्रासोबत संवाद साधणे हा उद्देश होता, असे प्रा. लिंगम म्हणाल्या. समानता प्रस्थापित करण्यासाठी खूप काम करावं लागेल.

अनेक चित्रपटांमधून प्रेम भावना व्यक्त करण्याचे पहिले पाऊल पुरुषांकडूनच टाकले जाते आणि त्यातही महिलांच्या संमतीची कल्पनाच गृहीत धरलेली नसते. स्रियांचा होकार मिळवण्यासाठी नायकाकडून अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबले जातात. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असे त्यांनी सांगितले.

‘निर्भया’ प्रकरणानंतर कायद्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. समाजव्यवस्थेच्या दृष्टीने हे मोठे बदल आहेत आणि सिने जगताने या बदलांची दखल घेणे आवश्यक आहे, असे मत लिंगम यांनी व्यक्त केले.

‘गोल्डफिश’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुशन कृपलानी यांनी त्यांच्या सेटवर महिलांची टक्केवारी सातत्याने वाढत असल्याचे सांगून, ही आनंददायी बाब असल्याचे नमूद केले. सेटवर महिलांची उपस्थिती वाढल्याने पुरुषांच्या वर्तनातही सकारात्मक बदल घडून आले. अभिनेत्री कल्की हिच्या मुलासाठी सेटवरच स्वतंत्र व्यवस्था केल्याचा अनुभवही कृपलानी यांनी मांडला.

‘व्हाय लॉईटर’ या पुस्तकाच्या सहलेखिका आणि ‘अंडर द ओपन स्काय’ या माहितीपटाच्या सह-दिग्दर्शिका प्रा. शिल्पा फडके म्हणाल्या, महिलांमधला साक्षरतेचा दर वाढता असूनही, चित्रपटविषयक कामांमध्ये त्यांचा सहभाग कमी होत चालला आहे.

सत्तेत असलेल्या महिला पुरुषांप्रमाणेच वागतात. मात्र, त्यांच्या तिथे असण्यानेही परिस्थितीत खूप फरक पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणीही महिला इतरांचे जगणे अधिक सुलभ करतात, असे त्यांनी सांगितले.

...तरीही महिलांची छळवणूक

अभिनेत्रींसोबत गैरवर्तणुकीच्या घटनेनंतर केरळमधल्या अनेक चित्रपटविषयक संस्था, संघटना तसेच केरळमधील चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहातल्या घटकांनी ‘वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ संस्थेच्या सदस्य महिलांची छळवणूक सुरू केली आहे. त्यांना काम देणे बंद करणे, एकटे पाडणे, सातत्याने टीका करणे आणि त्यांची बदनामी करणे यासारखे निंद्य प्रकार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Rashmi Lamba |Goa News
Rishab Shetty IFFI 2022: '...तरच कोकणी सिनेमाला येतील सुगीचे दिवस'

महिलांच्या प्रश्‍नांना वाचा

यावेळी टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेले दोन माहितीपट दाखवण्यात आले. या माहितीपटांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. यापैकी एका माहितीपटातून महिलांसाठी चित्रपटाच्या सेटवर स्नानगृह आणि वैयक्तिक स्वच्छताविषयक सुविधांचा अभाव असल्याचा विषय मांडला होता, तर दुसऱ्यात सिनेमांमधून रुळलेल्या सौंदर्याच्या परिभाषेवर टीका करणारा विषय मांडला होता.

  • या परिसंवादात हिंदी चित्रपटसृष्टीतील लिंगभावविषयक पडद्यावरील आणि पडद्यामागील कामांच्या बाबतीत सखोल संशोधनावर प्रकाश टाकण्यात आला.

  • या उपक्रमांतर्गत 35 चित्रपटांतील 1930 पात्रांचे पडद्यावरील लिंगभाव प्रतिनिधित्व, या अनुषंगाने साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे प्रकार, त्यांचे व्यवसाय तसेच इतर मापदंड यांचे विश्लेषण यावेळी केले.

  • या अभ्यासाअंतर्गत सिने पथकातील महिला सदस्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत प्राधान्याने ज्या विभागात काम दिले जात असे, त्या विभागातील कामाचा स्तर, तसेच चित्रपट पुरस्कार विजेत्यांमधले महिलांचे प्रमाण याबद्दलची अभ्यासपूर्ण मते आणि निरीक्षणेही यावेळी मांडली.

Rashmi Lamba |Goa News
Prasad Oak IFFI 2022: ‘आनंद दिघे’ साकारणे होते खूपच अवघड!

केरळमधील सिनेसंघटना महिलांच्या पाठीशी

मीनाक्षी शेड्डे यांनी केरळमधील अभिनेत्रींसोबत झालेल्या गैरवर्तणुकीच्या प्रकरणाकडे लक्ष वेधले. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या तिथल्या महिलांच्या मागे ‘वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ ही संघटना खंबीरपणे उभी राहाते. या प्रकरणातल्या पीडितेलाही त्यांनी पाठबळ दिले. सिने क्षेत्रात महिलांना सुरक्षित वातावरणात काम करण्याचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी लढाही उभारला आहे.

"अमेरिकेत केलेल्या संशोधनात, कौटुंबिक चित्रपटांमध्ये लिंगभाव तटस्थता साध्य करण्यात यश मिळाले. तिथले प्रेक्षक हे सिनेमातल्या प्रत्येक पात्राशी साधर्म्य साधतात. भारतात असे बदल घडवून आणण्यासाठीही हा अभ्यास कामी येईल. युवा वर्गाने या बाबींकडे विशेषतः लैंगिकतेच्या नजरेने वापरला जाणारा सिनेमाचा कॅमेरा आणि सिनेमातली तशा अर्थाची भाषा याकडेही लक्ष द्यायला हवे."

- रश्मी लांबा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com