IFFI 2022 Opening Ceremony In Goa: इफ्फीला वेगळेपण देण्याचा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा (एनएफडीसी) हा पहिलाच प्रयोग आहे. महोत्सवाच्या आयोजनात विविधता आणताना त्यातील चित्रपट हा भाग वेगळा आणि मनोरंजनाचा भाग वेगळा असल्याचे पहिल्याच दिवशी दाखवून दिले.
चित्रपट महोत्सव संचालयनालय (डीएफएफ) यापूर्वी गोवा राज्य मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन करीत होते. परंतु यावर्षी एनएफडीसीकडे सर्व सूत्रे केंद्रीय प्रसारण खात्याने सोपविली.
त्यात एनएफडीसीने वैविध्य आणताना जागतिक स्तरावरील चित्रपट महोत्सवाप्रमाणे या महोत्सवातील प्रारंभीचा चित्रपट दुपारी दाखविण्यात आला. खरे म्हणजे या महोत्सवाचा शुभारंभच चित्रपटाने झाले असे म्हटले, तर त्यात वावगे ठरू नये.
महोत्सवाचे उद्घाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संध्याकाळी 5 वाजता झाले. त्यानंतर हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले. हे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक उशिरापर्यंत स्टेडियमकडे येत होते. महोत्सव उद्घाटनाचे अप्रुप नसले तरी मनोरंजनपर सादर होणाऱ्या विविध रंगारंग कार्यक्रमाचे आकर्षण प्रेक्षकांमध्ये असल्याचे दिसत होते.
"यापूर्वी इफ्फीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर शुभारंभीचा चित्रपट दाखविला जायचा. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी पोहोचणे अनेकांना अवघड होत होते. ज्या अर्थी महोत्सव चित्रपटासाठी आयोजित होतो, त्याअर्थी शुभारंभीचा चित्रपट दुपारी दाखविल्यानंतर महोत्सवाचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. "
- राजेश शिगरगावकर, करंझाळे (पणजी)
"यंदा उद्घटनाचा चित्रपट दुपारीच दाखविल्यामुळे आमच्यासारख्या प्रतिनिधींची होणारी तारांबळ उडाली नाही. उद्घाटनाचा सोहळा रटाळ असतो आणि तो लांबतो. निम्मे लक्ष अगोदरच उद्घटनाच्या चित्रपटाकडे लागलेले असते. त्यातच उद्घघाटन लांबले की जेवणही करता येत नाही. कारण चित्रपट महत्त्वाचा असतो. एनएफडीसीने केलेले बदल उत्तम आहेत."
- दिनेश गडकरी, प्रतिनिधी (पुणे)
"इफ्फीची सुरवात सिनेमा दाखवून झाली, ही फार चांगली गोष्ट आहे. कारण समारंभ वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्या उत्सवी स्वरुपासाठी ठीक आहेत. परंतु एका सिनेमहोत्सवाची सुरवात आणि समारोह सिनेमाने होणे हेच उचित असते. ही नवीन परंपरा पुढील इफ्फीत सुरू रहावी. कारण उद्घाटन सोहळ्यानंतर महनीय व्यक्तींना सिनेगृहात येण्यासाठी जो वेळ लागायचा, त्यामुळे होणारा गोंधळ यावेळी टळला."
- लेस मिनिझिस, चित्रपट रसिक (पणजी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.