

पणजी: ऑक्टोबर महिना सुरू होताच गोव्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, प्रत्यक्ष तापमान ३४ अंशांच्या आसपास असतानाही दमट हवेमुळे नागरिकांना सुमारे ४३ अंश सेल्सिअस (फील लाइक) तापमानाचा भास होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच उकाडा जाणवत असून दुपारी पडणाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
पणजीत आज (ता. ६) कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे ऑक्टोबरमधील सरासरीपेक्षा सुमारे २.४ अंशांनी अधिक होते. वाढलेली सापेक्ष आर्द्रता आणि तापमान यांमुळे शरीराला जाणवणारे तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा लक्षणीय अधिक असल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध हवामान नोंदीनुसार २ ऑक्टोबरला कमाल तापमान ३४.४ अंश, तर ३ ऑक्टोबरला ३४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने उन्हाळ्याची झळ जाणवू लागली आहे. पणजीचे ऑक्टोबरमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ३७.२ अंश सेल्सिअस असून ते १६ ऑक्टोबर २००८ रोजी नोंदले गेले होते.
उष्म्यामुळे नागरिक हैराण
यंदा पावसाच्या तुटवड्याची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात गोव्यात सरासरीपेक्षा सुमारे ३२ टक्के कमी पाऊस नोंदला गेला होता. त्यामुळे पावसाळा माघारी फिरताना ऑक्टोबरच्या सुरुवातीला वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या प्रत्यक्ष तापमान ३४-३५ अंशांच्या आसपास असले, तरी दमट हवेमुळे शरीराला जाणवणारे तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचत असल्याने गोव्यातील ऑक्टोबरचा उकाडा नागरिकांची चांगलीच परीक्षा घेत आहे.
हवामान कोरडे राहण्याचा अंदाज
हवामान विभागाने ६ ऑक्टोबरपर्यंत घाट भागात हलका ते अतिहलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान दोन्ही जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यात तातडीने मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.