

राज्यात नुकत्याच घडलेल्या भीषण अग्निकांडात २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व नाइटक्लब्स, रेस्टॉरंट्स, बार्स, तसेच मोठ्या कार्यक्रमस्थळांसाठी SDMA कडून महत्त्वपूर्ण सल्लागार सूचना जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण सुरक्षित ठेवणे हा आहे.
SDMA ने स्पष्ट केले आहे की सर्व आस्थापनांनी अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. अग्निशमन विभागाचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) असणे आवश्यक असून, त्यातील अटींचे पूर्ण पालन करावे लागणार आहे.
आसन क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली असून, स्मोक व हीट डिटेक्टर्स, अलार्म सिस्टम, स्प्रिंकलर्स आणि इतर अग्निशमन उपकरणे कार्यरत स्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी सर्व आस्थापनांनी आपत्कालीन निकास मार्ग पूर्णपणे मोकळे ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रकाशित एक्झिट चिन्हे, स्थलांतर नकाशे आणि आपत्कालीन दिवे बसवणे बंधनकारक आहे.
यासोबतच प्रत्येक शिफ्टसाठी अग्निसुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक आणि कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नियोजित काळात स्थलांतर सराव घेऊन त्याचे दस्तऐवजीकरण करणेही आवश्यक ठरणार आहे.
या सूचना जारी झाल्यानंतर सर्व आस्थापनांना पुढील ७ दिवसांच्या आत त्यांचे अंतर्गत सुरक्षा लेखापरीक्षण (Internal Safety Audit) करणे बंधनकारक आहे. या लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा प्रशासन, अग्निशमन सेवा किंवा SDMA-प्राधिकृत पथकांनी तपासणीसाठी मागितल्यास उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. या तपासणीत आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटींवर कारवाई केली जाणार असल्याचे SDMA ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाईचे संकेत SDMA ने दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांची आस्थापने तात्काळ बंद करणे, परवाने निलंबित किंवा रद्द करणे, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व व्यावसायिक आस्थापनांमध्ये खळबळ उडाली असून, सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.