वादग्रस्त जसपाल सिंग यांची दिल्लीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलोककुमार यांची गोव्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आलोककुमार रविवारी गोव्यात दाखल झाले. आज (सोमवार, दि.१५ जुलै) त्यांनी महासंचालक पदाचा ताबा घेतला आहे.
नव्या पोलिस महासंचालकांसमोर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
रविवारी (दि.१४ जुलै) दुपारी आलोककुमार गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर मुख्य सचिव पुनित गोयल, दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुरगावचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख, वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक उपस्थित होते.
आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात महासंचालक जसपाल सिंग यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप झाला. या प्रकरणात सिंग यांनी संशयितांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच राज्य सरकारकडून त्यांना मिळालेल्या अभयावरूनही विरोधकांसह सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती.
जसपाल सिंग यांना हटविण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेला दिल्ली दौराही अनेकांच्या चर्चेत राहिला. अखेर सिंग यांना हटविण्याचा निर्णय झाला. आलोककुमार यांना त्यांच्या जागी नियुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्याने घेतला आहे.
राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे. चोऱ्यांचे वाढते प्रमाण, जमिनीशी संबंधित घोटाळे, अपघात, गुन्हेगारी, अमली पदार्थांचे खुलेआम व्यवहार, तसे इतर काही प्रकरणांमधून होणारे कायद्याचे उल्लंघन पाहता राज्यात पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.