Goa Monsoon Treks: मान्सूनमध्ये पश्चिम घाट जिवंत होतो, गोवा हिरव्यागार सौंदर्याने नटतो; अनोळखी वाटा साद देऊ लागतात..
Goa Monsoon : गोव्याच्या विविध भागांत आणि विविध विषयांना वाहिलेल्या भ्रमंती (tails) आयोजित करणाऱ्या ट्रेल ऑपरेटर्सची संख्या गोव्यात अमाप झाली आहे. सोप्या शहरी भ्रमंतीपासून कठीण दूधसागर धबधबा भ्रमंतीपर्यंत वेगवेगळ्या भ्रमंती त्यांच्याकडून आयोजित होत असतात.
वैयक्तिक आवडीप्रमाणेदेखील स्वतःची भ्रमंती ठरवण्याची मुभाही यापैकी अनेक ट्रेल ऑपरेटर्स देतात. संधी मिळाल्यास आपली दैनंदिन वाट टाळून अनोळखी वाटांवरून नवीन जागा धुंडाळत फिरणे कुणाला आवडणार नाही?
भ्रमंतीतले थरारक साहस, अप्रतिम वन्यजीवन आणि अस्सल स्थानिक अनुभव यांचा जर आपल्याला भाग बनायचे असेल तर अशा भ्रमंतीत आपण वाटा घ्यायलाच हवा. जीवनाचे तसेच स्वतःचे देखील नवीन पैलू अशा उपक्रमातच आपल्याला उलगडतात.
अशाच एका टूर ऑपरेटर्स आस्थापनाचा भाग असलेला कीथ सांगतो, 'सुरुवातीला मी माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना निसर्गाच्या कुशीत घेऊन जायचो. निसर्ग, वन्यजीवन, साहस हे साऱ्यांनाच आवडते त्यामुळे हळूहळू माझा हा व्याप वाढत गेला आणि मी या क्षेत्रातील पूर्ण व्यावसायिक बनलो.'
पश्चिमेला असलेले समुद्र किनारे आणि पूर्वेला असलेला पश्चिम घाट यामुळे छोटासा गोवा निसर्ग आणि वन्यजीवांच्या बाबतीत आपला ठसा उमटवतो. मान्सूनच्या काळात पश्चिम घाट खरोखरच जिवंत होतो. जंगलांमध्ये भ्रमंती करायला आवडणाऱ्या अनेकांचा तो वर्षातील सर्वात आवडता काळ असतो.
भ्रमंती आपण कुठे आणि कशी करू शकतो? निसर्ग भ्रमंती, धबधबे भ्रमंती, खारफुटीतील कयाकिंग, सायकलिंग यातून आपण निसर्ग सुंदर गोव्याचा अनुभव घेऊ शकतो त्याशिवाय रात्रीच्या वेळी केलेली जंगलातील भ्रमंती, पठारांवरील भ्रमंती यातूनही वेगळ्या गोव्याचे दर्शन घडते.
विशेष म्हणजे आशा भ्रमंतीमध्ये निसर्गप्रेमींच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्रत्येक पायवाटेवरच्या वनस्पती, दिसणारे वन्यजीव यांच्याबद्दल माहितीही मिळत असते. गजानन शेट्ये सारखे तरुण मार्गदर्शक अशा भ्रमंतीमध्ये आपल्याला वेगळ्या विश्वाची ओळख करून देतात.
सागरी जीवशास्त्रज्ञ, पक्षी तज्ज्ञ, खाजन क्षेत्राचे तज्ज्ञ, नदी पर्यावरण तज्ज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रा़तील तज्ज्ञांचा समावेश व्यावसायिक टूर ऑपरेटर्सनी आपल्या टीममध्ये केला असल्याने अशा प्रकारच्या भ्रमंती अधिक रोचक होण्यास मदत होते. या भ्रमंती निसर्गपूरक असतील अशातऱ्हेने त्यांचे नियोजन केले जाते.
भ्रमंती करत असताना त्यात सामील झालेले कोणीही प्लास्टिकचा कचरा वाटेवर फेकणार नाहीत याची काळजी घेण्यात येते. प्रत्येकाला स्वतःची पाण्याची बाटली घेऊन येण्याची सूचना दिलेली असते. लिव्ह नो ट्रेस' (आपल्या खुणा मागे ठेवू नका) हे धोरण गांभीर्याने घेतले जाते.
खरी शाश्वतता ही 'समुदाय चलित' असते याचे भान अशा भ्रमंतीत ठेवले जाते. व्यावसायिक ऑपरेटर्स बरोबरच अनेक स्थानिक संस्थाही अशा प्रकारच्या भ्रमंती पावसाळ्यात आयोजित करत असतात. पावसाळ्याच्या हंगामात जर एखादा अर्थपूर्ण अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर अशा भ्रमंतीमध्ये अवश्य सहभागी व्हा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.