
पाऊस सुरू झाला की नद्यांवर, तळ्यांवर, समुद्रकिनाऱ्यांपाशी नवनवीन लोकांचे पायरव सुरू होतात. हातात गळ किंवा जाळे घेऊन एक प्रकारच्या स्तब्ध-सावध उत्साहाने हे लोक पाण्याच्या काठावर मग्न होऊन आपापल्या कामात गुंतलेले दिसतात.
उंचावलेल्या किंवा उधाणलेल्या पाण्याच्या स्तराने आपल्या पोटात जी मत्स्य समृद्धी भरून आणलेली असते ती आपल्या गळात फसवण्याच्या किंवा जाळ्यात अडकवण्याच्या अहमहमिकेने काठावरचे ते सारेच पछाडलेले असतात. ढगाळ वातावरणातील पाण्याच्या काठावरील हे दृश्य पुढील दोन महिने थोड्या फार फरकाने तसेच दिसणार असते.
गोव्यात पावसाळ्याच्या मोसमात खवळलेल्या समुद्रामुळे आणि मुसळधार पावसामुळे मासेमारी करणे आव्हानात्मक असू शकत असले तरी अनुभवी लोकांसाठी ते फायद्याचे असते. पारंपारिक मच्छीमारांसाठी तर हे दिवस भरभराटीचे असतात.
कारण यांत्रिक बोटींना या दिवसात मासेमारीसाठी समुद्रात जाण्याची बंदी असल्याने त्यांच्या जाळ्यात चांगले मासे येऊ शकतात. रापोण, काटाळी, खुटाणी, जाळी (काण्णी), झारी (कोंबले), दिपकावणी, गरी अशा प्रत्येक प्रकारच्या मासेमारी पद्धती पावसाळ्याच्या दिवसात अनुभवायला मिळतात.
पावसाळ्याच्या काळातील मासेमारी हा निव्वळ व्यवसाय रहात नाही तर अनेकांसाठी ती आनंदाची जीवनशैली बनते. पाण्याच्या काठावर तासंतास उभे राहून केलेली ती साधना ठरते. मुड्डोशी, खर्चाणे, ठिगुर, मरळ, पालू, शेवटे, चणक यासारख्या माशांसंबंधी चर्चा त्यांच्यात झडत राहतात. शेवटी बाजारात विकत घेतलेल्या माशांच्या तुलनेने गळाला लागलेल्या किंवा जाळ्यात सापडलेल्या ताज्या माशांचा स्वाद, जरी हे मासे आकाराने छोटे असले तरी, अवर्णनीय वाटतो. आणि मुख्य म्हणजे त्यात परंपरेचे एक आनंदी साजरीकरणही असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.