37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन 20-21 दिवसांवर येऊन ठेपले तरी या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षात गोव्यात येणार की आभासी पद्धतीने या स्पर्धेचे उद्घाटन कऱणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान करणार याविषयी लेखी स्वरूपात अद्याप राज्य सरकारला कळवण्यातही आलेले नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याआधी या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी 25 किंवा 26 रोजी करतील, असे सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधानांनी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गोव्यात यावे, त्याची तारीख कळवावी अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केलेली विनंती त्यांनी तोंडी स्वरूपात मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून लेखी स्वरूपात काहीही कळवण्यात न आल्याने पंतप्रधान या स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येणार की आभासी पद्धतीने उद्घाटन करणार, याविषयीचे गूढ कायम आहे.
सर्वसाधारणपणे पंतप्रधान कार्यालयातून महिनाभर आधी संबंधित राज्य सरकारांना पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याची कल्पना दिली जाते. त्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप या पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेकडून त्या जागेची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला जातो.
गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस खाते यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही यासंदर्भात घेतली जाते. सध्या अनेक संघटनांच्या नेत्यांवरील विदेशातील कारवायांत भारत सरकारचे नाव घेतले जात असल्याने पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी जरा जास्तच काळजी घेतली जात आहे.
त्यामुळे पंतप्रधान येणार की नाहीत, याविषयीही थेटपणे माहिती देणे टाळले जात असल्याचे जाणवत आहे. सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान करतील, याविषयी काहीही अधिकृतपणे कळवण्यात आलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.