Goa Crime Case प्रेमसंबंध तोडले आणि बोलणे बंद केल्याने रागाच्या भरात 22 वर्षीय युवकाने आपल्या 30 वर्षीय मैत्रिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना पर्वरीत शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर 24 तासांत पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
कामाक्षी उड्डापनोवा असे मृत तरुणीचे नाव. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला अटक केली. कामाक्षीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी अथक प्रयत्नांनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातून काढून तो रात्री उशिरा गोव्यात आणला.
शवविच्छेदनानंतरच कामाक्षीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. कामाक्षीच्या शरीरावर चाकूचे अनेक वार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
संशयित प्रकाशने 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9च्या सुमारास कामाक्षीचा तिच्याच फ्लॅटवर जाऊन खून केला. तिचा मृतदेह चारचाकीतून आंबोली घाटातील घनदाट जंगलात फेकला. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकाशला त्याचा मित्र निरुपदी कडाकक्ल याने मदत केली. पोलिसांनी या खूनप्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.
दरम्यान, कामाक्षीच्या भावाने पर्वरी पोलिस स्थानकात कामाक्षीचे अपहरण तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीत कामाक्षीच्या कुटुंबीयांनी प्रकाश चुंचवाड या कामाक्षीच्या पूर्वाश्रमीचा मित्राचे नाव नमूद केले होते.
दोन दिवसांपूर्वी, म्हणजे मंगळवारी उत्तररात्री कामाक्षीने प्रकाशला समज देण्यासाठी म्हापशात बोलावले होते. कारण प्रकाशने प्रेमाचे नाते तोडू नको म्हणून तिच्याकडे तगादा लावलेला होता. त्यावेळी कामाक्षीसोबत तिचे इतर दोन मित्रही होते.
यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद उफाळला. हा राग अनावर झाल्याने प्रकाशने कामाक्षीच्या कानशिलात लगावली. तेव्हा कामाक्षीने प्रकाशचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला.
त्या दोघांमधील बाचाबाचीचा संपूर्ण प्रकार म्हापसा पोलिस स्थानकाजवळच घडला. त्यानंतर तिने पोलिस स्थानकात जाऊन प्रकाशने आपणास मारहाण केल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी हे प्रकरण अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविले आणि पोलिसांनी प्रकाशला कडक शब्दांत समज देत त्याच्याकडून कामाक्षीला यापुढे त्रास देणार नाही असे लिहूनही घेतले.
या प्रकारानंतर म्हापसा पोलिसांनी तिला पोलिस गाडीतून पर्वरीला घरी सोडतो, असे सांगितले. मात्र, तिने नकार देत आपण हणजूणला जाणार असल्याचे सांगितले.
गोवा ‘मर्डर डेस्टिनेशन’!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या (कु)शासनामुळे गोवा हे आता ‘मर्डर डेस्टिनेशन’ झाले आहे. गोव्यात दररोज खुनाच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आता कोणतीही आशा नसल्याने मी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करतो. राज्यपालांनी नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
आंबोली घाटातून काढला मृतदेह
कामाक्षी कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून कामाला होती.
प्रकाश हा कामाक्षीच्या इतर नातेवाईकांशी परिचित होता.
कामाक्षी पर्वरीत फ्लॅटमध्ये राहात होती, तर प्रकाश सुकूरमधील वीस कलमी वसाहतीमध्ये राहतो.
प्रकाश व कामाक्षी यांच्यात आठ वर्षांचे अंतर होते. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते.
मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे.
कामाक्षीने प्रेमसंबंध संपवल्याने व ती टाळत असल्याने प्रकाश हा नैराश्यात गेला होता.
आंबोलीत कामाक्षीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला मात्र तिच्या उजव्या हात आणि पायाचा काही भाग मिळाला नाही.
मृतदेह काढण्यास पोलिसांना पाच तास लागले.
खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटल्यावर गुंडाची हत्या
तीन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी आज (शुक्रवारी) रुमडामळ - हाऊसिंग बोर्ड येथे भरवस्तीत दिवसाढवळ्या घरात घुसून जामिनावर सुटलेला गुंड सादिक बेळ्ळारी ऊर्फ लॉली (23) याचा धारदार चाॅपरने सपासप वार केले.
कर्नाटकमधून दोघांना अटक
सादिक बेळ्ळारी खून प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी सौनूर (कर्नाटक) येथून दोघांना अटक केल्याची माहिती मिळाली. तौसिफ कडमणी आणि कादर खान अशी या संशयितांची नावे असून आज (शुक्रवारी) सकाळी रुमडामळ येथे सादिकचा खून करून ते कर्नाटकात पळून गेले होते, अशी माहिती मिळाली.
2020 सालच्या घटनेचा वचपा
सादिक हा २०२० मधील खून प्रकरणात तुरुंगात होता. जून महिन्यात तो जामिनावर बाहेर आला होता. २८ मे २०२० मध्ये इस्माईल मुल्ला ऊर्फ छोटू आणि सादिक बेळ्ळारी याने मुजाहिद खान याला मारहाण करत सुरा भोकसून त्याचा खून केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.