Goa Murder Case: पोलीस अन् डॉक्टरही संशयाच्या घेऱ्यात

किनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या तरुणींच्या मृत्यू प्रकरणात यापूर्वी अनेक पोलिस निलंबित झाले आहेत, हा अनुभव असताना पोलिसांनी या प्रकरणामध्ये केलेला निष्काळजीपणा गंभीर आहे.
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

पणजी: 19 वर्षीय सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाला (Goa Murder Case) रोज वेगवेगळे वळण लागत असून रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तपास आणि न्यायव्यवस्थेसाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींमध्ये अत्यंत महत्त्वाच्या त्रुटी आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत. न्यायवैद्यक विभागाने व्हिसेरा आणि गुप्तांगाचे स्वॅब नमुने घेतलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला सिद्धीच्या शरीरावर कोणतेच व्रण नव्हते, असे म्हणणारे डॉक्टर आता थोडेसे व्रण होते, असे म्हणत आहेत. राज्यात गेल्या  अनेक वर्षांत अनेक तरुणींच्या मृत्यूंचे तपास आणि तपास यंत्रणेतील चुकांच्या अनुभवांतून पोलीस शिकले तरी काय? हाच प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या कासवगतीच्या तपासावर राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातील किनारे हे अनेक अर्थांनी चर्चेत असतात. तिथल्या दारू पार्ट्या, ड्रग्स पार्ट्या तरुणाईला नेहमीच आकर्षित करतात किंवा त्यात त्यांना गुंतवण्यासाठी काही लॉबीज कार्यरत असतात, हे पोलीस तपासात वेळोवेळी सिध्द झाले आहे. समुद्र किनारे आणि गुन्हेगारीचे खूप जुने नाते आहे. किनारे कितीही विलोभनीय असले तरी ते तितकेच गूढ आणि शापितही असतात, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. सिद्धी नाईकचा मृत्यू हा या शापिताचाच भाग बनल्याचे आतापर्यंतच्या तपासाच्या निष्कर्षावरून वाटते. तपास आणि न्याय प्रक्रियेतील जबाबदार घटकांनी गंभीर चुका केल्याचे स्पष्ट होत आहे. यातून नेमके काय बाहेर येणार, हे मात्र स्पष्ट होताना दिसत नाही.

तपास कुठपर्यंत?

याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली आहे. मात्र, याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या चारजणांकडून पोलिसांना कोणती माहिती मिळाली, सिद्धीच्या दोन्ही बहिणींकडून कोणती माहिती मिळाली, याबाबतही पोलीस बोलण्यास तयार नाहीत.

Goa Murder Case
Goa Murder case: पुरावे नसताना चौधरी यांनी केला तरुणीच्या अपहरण झाल्याचा दावा

कपडे कुठे गेले?

या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा दुवा असलेले सिद्धीचे कपडे आणि इतर साहित्य कुठे गेले, याचेही गूढ उलगडलेले नाही. पोलिसांनी जंग जंग पछाडूनही हे साहित्य सापडत नाही. तिने आत्महत्या केली असती तर कपडे काढून का केली, हेही तपासात स्पष्ट झालेले नाही. अर्धनग्नता हे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्नचिन्ह आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुंदर तरुणी कधीही कपडे काढणार नाही, हे कोणीही सांगेल. त्यामुळे सिद्धीविषयी घातपात झाला होता, हे सांगणाऱ्या अनेक पुराव्यांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत, हे सुटणारे कोडे आहे.

तपासातील निष्काळजीपणा

किनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या तरुणींच्या मृत्यू प्रकरणात यापूर्वी अनेक पोलिस निलंबित झाले आहेत, हा अनुभव असताना पोलिसांनी या प्रकरणामध्ये केलेला निष्काळजीपणा गंभीर आहे. सिद्धी बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर तातडीने तपासचक्रे हलवली असती तर ती आज जीवंत असती. तिथेच उशीर का केला? मृत्यूनंतरही वरिष्ठ पोलिसांनी या तपासकामात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी हे प्रकरण खूपच सौम्यपणे घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा तपास नवख्या पोलिसांवर सोपवणे, हे सारेच गंभीर आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा या प्रकरणाविषयी किती गंभीर होत्या, हे स्पष्ट होते. सध्या यात गुन्हे अन्वेषण विभागालाही गुंतवले आहे. मात्र, तपास नक्की कुठेपर्यंत आला, हे मात्र अस्पष्ट आहे. अहवालांची लपवाछपवी होत आहे आणि पोलिसांकडून अधिकृत  माहिती दिली जात नाही, हेही अधोरेखित होते.

Goa Murder Case
Goa Murder Case11th Day: पंचनाम्‍याचा घोळ; आक्रोश, हुंदके, मृत्‍यूचे गूढ कायम!

व्हिसेरा, स्वॅब घेतलेच नाही

पोलिसांच्या तपासकामात गुन्हेगारांना शोधण्यासाठी न्यायवैद्यक किंवा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो. संशयास्पद गुन्ह्यांमध्ये पोस्टमार्टम केले जाते व वैद्यकीय चाचणी केली जाते आणि अनेक बाबींचे नमुने गोळा केले जातात. त्याचे पृथक्करण व रासायनिक विश्लेषण केले जाते. सिद्धी नाईक प्रकरणात डॉक्टरांनी महत्त्वाचे व्हिसेरा आणि गुप्तांगाच्या स्वॅबचे नमुने घेतले नाहीत, हे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. ते का घेतले नाहीत, हे अनाकलनीय आहे. डॉक्टरांना २००८ चे स्कार्लेट प्रकरणात खूप शिकवून गेले होते. तरीही डॉक्टरांनी हा गुन्हा का केला? आता ते पोलिसांकडे बोट दाखवत आहेत. सुरुवातीला मृतदेहावर कोणतेच व्रण नाहीत, असे म्हणणारे डॉक्टर आता काही व्रण होते, असे म्हणत आहेत. हे सरकारदप्तरी नोंद होणार का? हाही प्रश्‍न आहे.

सिद्धीचा अखेरचा प्रवास आणि अंत्यसंस्कारांची घाई

सिद्धी पेडणे येथील नातेवाईकांकडे राहात होती. नंतर किरकोळ वादावादीमुळे ती आपल्या नास्नोळा येथील घरी आली. रविवार, सोमवार, मंगळवार या तीन दिवशी ती पर्वरीतील मॉलमध्ये कामाला गेली. मात्र बुधवार तिच्यासाठी घातवार ठरला. सकाळी दहा वाजता म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ सोडल्यानंतर ती एका बस कंडक्टरला म्हापसा येथे दिसली. त्यानंतर ती नेरूलमध्येही दिसल्याचे पोलिस सांगत आहेत. बुधवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार वडिलांनी नोंदवली. गुरुवारी सकाळी सहा वाजता तिचा मृतदेह स्थानिकांना कळंगुट किनाऱ्यावर दिसला. पोलिसांनी तो मृतदेह गोमेकॉमध्ये नेला. तेथे डॉक्टरांनी मृतदेह त्वरित ताब्यात घेऊन तो ‘मॉर्ग’मध्ये नेलाच नाही. तो शववाहिकेत तसाच तीन तास पडून होता. तसे का केले, हाही प्रश्न कायम आहे. पोलिसांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी घाईगडबडीत शवचिकित्सा केली आणि मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. नातेवाईकांनीही घाईतच अंत्यसंस्कार केले, हे संशयास्पद आहे.

मालिका कायम

मागल्या दशकात महानंद नाईक प्रकरणाने अनेक गरीब तरुणींच्या खुनांची मालिकाच पोलिसांनी समोर आणली होती. मात्र, इतके क्रूर कृत्य करूनही तपासातील त्रुटी आणि न्यायवैद्यक विभागाकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे या प्रकरणातील आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे सिद्धी प्रकरणाच्या निमित्ताने वासंती गावडे, सुनीता गावकर, दीपा जोतकर, केसर नाईक, नयना गावकर, निर्मला घाडी याबरोबरच मोनिका गोर्डे, स्कार्लेट किलिंग, डॅनियल  मॅकलुले यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com