Goa Municipality: काही दिवसांपूर्वी म्हापसा पालिकेने येथील बाजारपेठेच्या मार्केट यार्ड बाजूने प्रवेशद्वारावरच अतिक्रमण करून बसणाऱ्या विक्रेत्यांना हटविले होते. मात्र, हे विक्रेते पुन्हा त्याच ठिकाणी व्यापार करताना दिसताहेत. त्यामुळे ही कारवाई नावालाच की पालिका मंडळ व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने या विक्रेत्यांची ही मनमानी सुरू आहे, असा प्रश्न विचारला जातोय.
या प्रवेशद्वारावर पालिकेने वाहने आत जाऊ नयेत म्हणून लोखंडी फाटक लावले आहे. या फाटकाच्या लगत दोन्ही बाजूने हे विक्रेते ठाण मांडून बसतात. त्यामुळे लोकांना बाजारपेठेत ये-जा करण्यास अडथळा निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी म्हापसा व्यापारी संघटनेच्या विनंतीवरून उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर व बाजार समितीचे अध्यक्ष नगरसेवक विराज फडके यांनी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत व सचिव सिद्धेश राऊत यांच्यासमवेत बाजारपेठेची पाहणी केली होती.
यावेळी मार्केट यार्डच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारावर फळविक्रेत्यांनी जागा अडविल्याचे दिसून आले होते. त्यावेळी पालिका कर्मचाऱ्यांमार्फत या विक्रेत्यांचा माल जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली होती.
पालिका कर्मचाऱ्यांची डोळेझाक
तरीही या ठिकाणी दिवसभर फळविक्रेते आपले साहित्य लावून प्रवेशद्वार अडवतात. या विक्रेत्यांवर रोज कारवाई करण्याच्या निर्देशाकडे पालिका कर्मचाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. हा प्रकार नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यांच्या कृपादृष्टीने सुरू असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू असून व्यापारीवर्ग तसेच ग्राहकांनी हे प्रवेशद्वार अडथळामुक्त करण्याची मागणी होत आहे.
विराज फडके, म्हापसा पालिका बाजार समितीचे चेअरमन-
दरवेळी आम्ही पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई करतो. याशिवाय त्यांचे साहित्य जप्त करतो. मात्र, हे विक्रेते दुसऱ्यावेळी नवीन माल आणून तिथे तो थाटतात. यापुढे मुख्याधिकाऱ्यांना सांगून संबंधितांवर पोलिस कारवाई करावी लागेल, असे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.