Goa Rain
Goa Monsoon Dainik Gomantak

Goa Rain: पावसाचे थैमान! देवस्थानची कमान कारवर कोसळली, चिंचेचे झाड उन्मळले; जनजीवन विस्कळीत

Goa Monsoon: डिचोली-साखळी रस्त्यावर काहीठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पावसामुळे डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे.
Published on

डिचोली: गेल्या तीन चार दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाने अचानक जोर धरताना सायंकाळी सर्वत्र झोडपून काढले. (रविवारी) सायंकाळी जोरदार पर्जन्यवृष्टी होताना डिचोलीसह बहुतेक सर्व भागातील जनतेची दाणादाण उडवली. मुसळधार पावसामुळे डिचोलीतील वाळवंटी नदीसह अस्नोड्याच्या पार आदी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली असून गावातील नाले, ओहोळही आता प्रवाहीत झाले आहेत.

डिचोली शहरासह तालुक्यातील बहुतेक भागात जोरदार पाऊस पडला. आजच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी होता. मात्र, सायंकाळी अचानक पावसाने जोर धरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काहीजण अडकून पडले. डिचोली-साखळी रस्त्यावर काहीठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आजच्या पावसामुळे डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे.

आज सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांतील पाणी वाढले आहे. डिचोलीतून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून बहुतेक भागात जलमय चित्र दिसून येत आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी बाहेर फुटण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, आजच्या पावसामुळे सायंकाळपर्यंत आमोणे, कुडचिरेसह चार पाच ठिकाणी झाडांची पडझड झाली. या पडझडीत आर्थिक नुकसान वगळता अन्य कोणताही अनर्थ घडला नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

गावणे-बांदोडा येथे संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना

सकाळी पावणेसातच्या दरम्यान येथील श्री पूर्वाचार्य देवालयाजवळील रस्त्यावर भली मोठी संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेवेळी रस्त्यावर कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला.

गावणे येथील पूर्वाचार्य देवालयाजवळ बांधलेली सुमारे सहा मीटर उंचीची ही भिंत अचानक कोसळली. मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवासी धावतच घराबाहेर आले. संबंध रस्त्यावर माती आणि काँक्रिट पसरल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर स्थानिक नागरिक तसेच सरपंच रामचंद्र नाईक, पंच सदस्य मुक्ता नाईक, सागर मुळवी व इतरांनी वाहतुकीला वाट मोकळी करून दिली.

गावसावाडा-म्हापसा येथील पडिक घराची भिंत कोसळली

गावसावाडा - म्हापसा येथील पडीक घराची भिंत कोसळली असून घराचा अन्य भागही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने शेजारील घरे तसेच रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.

शनिवारी सांयकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या पडीक घराच्या आवारातील झाडे कासळून या घराचा काही भाग कोसळला. तसेच पायवाटेच्या बाजूने असलेली या घराची भिंत देखील कोसळण्याच्या स्थितीत असून परिणामी जवळच्या अमरनाथ पुजारी यांच्यासह बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.

Goa Rain
Goa Rain: गोव्यात मान्सूनचा 'धमाका'! एका दिवसात 103.8 मि.मी. पावसाची नोंद; 16 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

जुनाट चिंचेचे झाड मुळासकट कोसळले

मेस्तवाडा येथील उदय च्यारी यांच्या सुतार कार्यशाळेच्या बाजूकडील बराच जुना चिंचेचा वृक्ष शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुळासकट कोसळला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने बाजूच्या घरातील गणेश च्यारी यांना जाग आली व त्यांनी घराबाहेर येऊन पाहिल्यानंतर मोठे चिंचेचे झाड वीज तारांवर कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती त्यांनी त्वरित सरपंच सागर पडते यांना दिली. सरपंच लागलीच घटनास्थळी दाखल झाले व तेथील वीजतारा लोंबकळत होत्या ते पाहून त्यांनी वीज खात्याला व अग्निशमन दलाला पाचारण केले. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वीज प्रवाह खंडित केला. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून मोकळे केले.

Goa Rain
Goa Monsoon: गोवेकरांनो काळजी घ्या! 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; वादळी वाऱ्याचा इशारा

देवस्थानची कमान कारवर कोसळली

घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील दामोदर देवस्थानच्या बाहेरील कमान कोसळून पार्क केलेल्या एका कारवर पडली. सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. सुरक्षिततेबाबत पाहणी करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मडगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयात संपर्क साधला असता या घटनेत कुठलेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे सासष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या असून मोठी हानी झाली नसल्याची माहितीही देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com