मान्सूनचा मौसम सुरू झाला असून पावसाळी पर्यटनासाठी विविध ठिकाणी स्थानिक आणि पर्यटक गर्दी करत आहेत. गोव्यात मागील 12 दिवसांत विविध घटनांमध्ये आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अलिकडेच मैनापी धबधबा येथे दोघांचा तर, कासावली येथील चेरेखाणीत एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
पावासाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या लोकांसोबत घडलेल्या दुर्घटनांमुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थानिक, पर्यटकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात धबधब्याची खोली समजत नाही. त्यामुळे युवकांनी दारू पिऊन धबधब्यांवर जाऊ नये. तसेच, पाण्यात उतरू नये असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. समुदकिनाऱ्यावर देखील आंघोळीसाठी जाऊ नये असेही सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, समुद्रावर दृष्टीचे जीवरक्षकही तैनात आहेत. सरकार सुरक्षात्मक सर्व प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी धोकादायक जलाशयात जाऊ नये. असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
मैनापी धबधबा दुर्घटनेनंतर आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधब्यांवर पर्यटकांना ‘गाईड’ पुरवण्याची शिफारस वन खात्याला करण्यात आली आहे.
शनिवार, रविवारी धबधब्यांवर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी जीवरक्षक व पोलिसही तैनात करण्याची शिफारस समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली.
सध्या पर्यटकांसाठी बंद केलेले धबधबे पुन्हा कधी सुरू करणार, याचा निर्णय गोव्याचे मुख्य वनपाल घेणार असल्याची माहिती वन खात्याकडून मिळाली आहे. शिवाय धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक असलेले सूचना फलक लावावेत, तसेच त्यांना लाईफ जॅकेटही पुरविण्याची सूचना केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.