गोव्यातील मंत्र्यांना झाली 'वीजखरेदी' घोटाळ्याची आठवण

उद्योगांना पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याची सबब केली पुढे
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: नवे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोव्यातील वीज समस्येवर तोडगा शोधताना खुल्या बाजारातून वीज खरेदीचा जो पर्याय सुचविला आहे, त्यामुळे अनेकांना यापूर्वीच्या वीजखरेदी घोटाळ्याची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळीही अशाच प्रकारे उद्योगांना पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याची सबब पुढे केली गेली होती. प्रत्यक्षात मात्र घडले वेगळेच. त्यासाठी गोव्यातील सद्याच्या वीजस्थितीचा आढावा घेऊन नंतर असे पाऊल उचलावे, असे जाणकार सांगू लागले आहेत.

Sudin Dhavalikar
बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या: प्रतिमा कुतिन्हो

कॅप्टनचा दुणावलेला आत्मविश्‍वास

विधानसभा निवडणुकीमुळे चर्चेत आलेले कॉंग्रेसचे कॅप्टन विरीयेतो फर्नांडिस आता लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याची चर्चा दक्षिण गोव्यात रंगली आहे. कॅप्टननी देशसेवा करून राजकारण आणि समाजसेवेत सुरवातीला खूप धडपड केली. त्यामुळेच कॉंग्रेसने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना तितकेसे यश मिळाले नसले, तरी भाजपच्या उमेदवाराचा त्यांनी अक्षरश: घाम काढला होता. त्याच जोरावर आता त्यांना लोकसभेची स्वप्ने पडू लागली आहेत. दक्षिण गोव्यात अपवाद वगळता कॉंग्रेसने नेहमीच बाजी मारली आहे. त्यामुळे विधानसभेत यश आले नाही, म्हणून काय झाले? लोकसभेसाठी तरी प्रयत्न करायला हरकत काय, असे कॅप्टननी ठरवले असावे. ∙∙∙

खाण भागात शिक्षितांची उपेक्षा!

राज्यातील सर्वांत मोठा उद्योग असलेला खाण व्यवसाय सध्या बंदच आहे. जी काही खनिज मालाची वाहतूक सुरू आहे ती लिलावाची असल्याचे दाखवले जाते; पण त्यातून कितीजणांनी माया जमवली, ते काही कळायला मार्ग नाही. पण सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अर्थातच खाण व्यवसाय गेली साठ-सत्तर वर्षे राज्यात कार्यरत राहिला; पण खाणव्याप्त भागातील लोकांची उपेक्षाच करणारा ठरला. विशेषतः खाण अवलंबितांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलांना उच्च शिक्षण दिले; पण खाणभागातील मुलांना आता रोजगार मिळणे कठीण झाले आहे. सरकारने खरे म्हणजे खाण भागातील उच्च शिक्षितांना आधी रोजगार द्यायला हवा होता; पण मागच्या सरकारी नोकरीच्या मेगा भरतीत नेत्यांनी आपल्याच सग्यासोयऱ्यांना नोकऱ्या दिल्या. खाण भागात धूळ खाल्ली; पण उच्चशिक्षण घेतले तर आता सरकारकडून ही उपेक्षा. काय म्हणावे याला...खाण अवलंबित कपाळावर हात मारून विचारताहेत हा सवाल. ∙∙∙

महिना शिल्लक नाही, तरीही निवड

राज्यातील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ आता संपायला पुरा महिनाही शिल्लक नाही, तरीही रिक्त झालेल्या विविध पंचायतींच्या निवडणुका होऊन सरपंच आणि उपसरपंचांची निवड केली जात आहे. वास्तविक येत्या दीड महिन्यात पंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात; पण इकडे सरपंच आणि उपसरपंच निवड करून प्रशासकीय यंत्रणा वेळ वाया घालवत आहे. खरे म्हणजे आता वेळच शिल्लक नसल्याने सरपंच नसलेल्या अशा पंचायतींवर सरकारने प्रशासक नको का नेमायला? ∙∙∙

कलंडलेली गाडी सुभाष वर काढतात तेव्हा!

सांगेचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची प्रतिमा त्यांचे विरोधक काळ्या रंगात रंगवत असले तरी त्यांच्या एका गोष्टीचे मात्र त्यांचे विरोधकही कौतुक करतात, ती म्हणजे कुणीही अडचणीत असलेले दिसले की त्यांच्या मदतीला धावून जायची त्यांची वृत्ती. मंगळवारी याचा पुन्हा प्रत्यय आला. सुभाष हे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासह मळकर्णे येथे क्रीडा मैदानाची पाहणी करण्यास जात असताना वाटेत कुणाची तरी गाडी गटारात कलंडलेली त्यांना दिसली. वास्तविक सुभाष आता मंत्री झाले आहेत. या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ते पुढे गेले असते तरी त्यांना कुणी काही म्हटले नसते. पण सुभाष यांनी आपली गाडी थांबवून ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ती गाडी वर काढण्यासाठी स्वतः हात घातला. त्यावेळी ते आपले मंत्रिपदही विसरून पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेत केव्हा शिरले ते त्यांनाही कळले नाही.

‘दाल में कुछ काला है’

गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई हे विद्वान तसेच कायदेतज्ज्ञ आहेत. ते बहुतांशवेळा भाषण करताना कायदा, भारतीय परंपरा, संस्कृती, अध्यात्म, भारतीय इतिहास, महात्मा गांधी, स्वातंत्र्य चळवळ आदी विषयांवर भाष्य करतात. गोव्यातील विविध भागांत जाऊन नागरिकांशी संवाद साधतात, तसेच गोव्याच्या शिरपेचात कोणी मानाचा तुरा रोवला तर त्यांना राजभवनावर आमंत्रित करून त्यांचा सत्कार करतात. मात्र, कधी नव्हे ते सोमवारी गोवा लोकसेवा आयोगाच्या तिसऱ्या मजल्याच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या. राज्यपाल जेव्हा गोवा लोकसेवा आयोगामध्ये राजकीय हस्तक्षेप नको, असे म्हणतात त्यावेळी ‘दाल में कुछ काला है’ अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली. त्याचबरोबर या राज्यपालांनाही माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे खरे बोलण्याचे वारे लागले आहे, अशीही चर्चा रंगली होती. ∙∙∙

उशिरा सुचलेले शहाणपण

कोणतेही निर्णय घेण्याबाबत कॉंग्रेस कमालीचा विलंब करते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. याचे परिणाम सत्ता सोडण्यापासून आमदार, नेते, कार्यकर्ते दुरावण्यापर्यंत झाला आहे. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन नव्या पिढीच्या कॉंग्रेसने आता कोणत्याही मोहिमेच्या तयारीला अगोदरच सुरवात करण्याचे ठरविल्याचे दिसून येते. २१ तारखेपासून राज्यभर कॉंग्रेसतर्फे चेतना यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा उद्देश पक्षाला बळकटी आणण्याबरोबर लोकसभेची तयारी करणे, हा असल्याचे कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे. अर्थात, लोकसभेला अद्यापही दोन वर्षांचा अवधी आहे. कॉंग्रेसची ही रणनीती अशीच राहावी. अन्यथा ही तयारी ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखी झाली नाही, म्हणजे मिळवले. ∙∙∙

Sudin Dhavalikar
'समाजकल्याण खात्याच्या योजनांचा फेरआढावा घेणार'

अखेर प्रतिमाबाई अवतरल्या

विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रतिमा कुतिन्हो नावेलीतून पराभूत झाल्यानंतर बराच काळ अज्ञातवासात गेल्या होत्या. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवताना झालेला निसटता पराभव प्रतिमा यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत होेते. अखेर राज्यात वाढणाऱ्या अत्याचाराचा विषय घेऊन प्रतिमाबाई पुन्हा रणांगणात अवतरल्या असून पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर तोफ डागत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढविला. प्रतिमा यांचे हे ‘फायटिंग स्पिरिट’ यापुढेही कायम राहावे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू राहावे. ∙∙∙

कचऱ्याचे न उलगडणारे कोडे

मडगाव नगरपालिका दरमहा कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही शहरात कचरा समस्या कायम आहे. मात्र, त्यामागील कारण शोधण्यात कुणालाच स्वारस्य नाही. तिकडे शॅडो कौन्सिल याच मुद्द्यावर कंठशोष करते आहे. पालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाते, तरीही काही विशेष जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पालिका तो शेजारील पंचायत भागातील असल्याचा आरोप करते, तर पंचायती त्याचा इन्कार करतात. मग हा कचरा येतो कुठून? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ∙∙∙

पंचायतींची पंचाईत

नवे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी नगरनियोजन खात्याला नवा ‘लूक’ देण्याचा जो संकल्प सोडला आहे, तो वरकरणी साधा वाटत असला तरी प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी तो कसा ठरेल, ते नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यावर कळणार आहे. ५०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी टीसीपीऐवजी सरकारमान्य आर्किटेक्टकडून मान्यता घेण्याच्या तरतुदीमुळे पंचायती, पालिका वगैरेंची पंचाईत होणार आहे. आजवर या संस्थांमधील मंडळींची अशा बांधकामांमुळे चंगळ झाली होती, अशी वदंता आहे. ∙∙∙

Sudin Dhavalikar
तरुण तेजपालच्या सुटकेविरोधात हायकोर्टाने राखून ठेवला आदेश

भीत्यापाठी ब्रह्मराक्षस

गोव्याशेजारील राज्यांनी उदा. महाराष्ट्रात कोरोनाविषयक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे गोवा राज्यही खासकरून मास्क फ्री करावे, अशी मागणी गेली दोन वर्षे मास्कला कंटाळलेले लोक करू लागले आहेत. यासंदर्भात अधूनमधून समाज माध्यमांवरही सूर उमटत असतात. तोच आता देशातील काही भागांत उदा. उत्तर प्रदेशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता कुठे तोंडाच्या मुसक्या सोडून मुक्त श्‍वास घेण्याची संधी मिळणार होती. तेवढ्यातच कोरोनाचा कहर वाढू लागल्याने अनेकांना नुसत्या कल्पनेनेच घेरी येऊ लागली आहे. पुन्हा ती मास्क, सॅनिटायझरची कटकट नको, असेही लोक म्हणत आहेत. परंतु कोरोनाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. तूर्तास सर्वांनीच काळजी घेणे हिताचे ठरणार आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com