गोव्यातील खाणचालक उतरले मैदानात

दिगंबर कामत हेच आपली पहिली पसंती आहे असे खनिज निर्यातदार बिनदिक्कतपणे सांगतात.
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: दिगंबर कामत यांच्यापेक्षा त्यांचे सरकार स्थापन व्हावे, यासाठी पणजीत वास्तव करून असलेले मडगावचे एक प्रमुख खनिज निर्यातदार प्रयत्न करीत असल्याची चर्चा सध्या भाजपात आहे. याच उद्योगपतीने कामत यांना भाजपामधून फोडण्यासाठी हातभार लावला होता. कामत सत्तेवर आले, तरच गोव्यात खाणी सुरू होऊ शकतील असे वाटणारे अनेक खनिज निर्यातदार आहेत. त्यातील एक वरील उद्योगपती असून, कामत हीच आपली पहिली पसंती आहे असे ते बिनदिक्कतपणे सांगतात.

सध्या अनेक संभाव्य अपक्ष तसेच छोटे मोठे पक्ष तीव्र हालचाली करू लागले आहेत. भाजप नेतेही या सर्व उचापतखोरांच्या संपर्कात आहेत. त्या तुलनेने कॉंग्रेस पक्ष सुस्तावलेला असल्याची जाणीव या उद्योगपतीला झाल्याने तेही अनेकांच्या संपर्कात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजप नेते त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

मतदानानंतरचे कवित्व

कॉंग्रेस पक्षाला खरोखरीच अल्पसंख्याक समाजाची विशेषतः ख्रिश्चनांची एकगठ्ठा मते प्राप्त होतील काय? यासंदर्भात बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. भाजपामध्ये तर यासंदर्भात बरीच मोठी उत्कंठा आहे. कारण स्पष्ट आहे, ख्रिस्ती मते फुटली तरच भाजपला संधी मिळणार आहे. ॲड. क्लियोफात कुतिन्हो तर म्हणतात, सासष्टीमध्ये ख्रिश्चन मतांमध्ये फूट पडली आहे. जेव्हा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जातो, तेव्हा तर भाजप नेते कार्यकर्त्यांना स्पष्ट सवाल करतात - ख्रिश्चन मते किती आणि त्यात फूट पडणार आहे का?

रिव्होल्युशनरी गोवन्स ख्रिश्चनांची मते खाणार काय? त्याहून महत्त्वाचा प्रश्न असतो तो ख्रिस्ती चर्च संस्थेने एखादे आवाहन केले होते काय? मतदानाच्या एक दिवस आधी रविवारी किंवा सोमवारी प्रवचनांमध्ये पाद्रींनी कॉंग्रेसला मते देण्याचे आवाहन केले होते काय? असे कोणतेही आवाहन चर्चने केले नव्हते. त्यामुळे ख्रिस्ती मते फुटणार अशी अपेक्षा भाजपा बाळगून आहे.

लोबो हवेत चालतात!

मायकल लोबो हे आता काय करणार याची उत्कंठा भाजप-कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना आहे. बाबूश मोन्सेरात यांच्याप्रमाणेच लोबो यांचीही महत्त्वाकांक्षा या निवडणुकीत उफाळून आली आहे. त्यांनी भाजपा सोडला याचे प्रमुख कारण या भगव्या पक्षात त्यांना फारसे अस्तित्व राहिले नव्हते. त्यांना उपमुख्यमंत्रिपदही मिळण्याची शक्यता नव्हती, परंतु आता बार्देश तालुक्यात कॉंग्रेसचा गड सर करण्याचा मान त्यांना निकाल लागण्यापूर्वीच मिळाला आहे. त्यामुळे सध्या ते आपली कॉलर ताईट करून फिरतात. परिणामी उपमुख्यमंत्रिपदापेक्षाही अधिक काही पदरात पाडून घेण्याचे त्यांचे मनसुबे लपून राहत नाहीत.

त्यांना ‘गोमन्तक’ने काही राजकीय प्रश्न करण्याच्या आधीच ‘‘माझी कॉंग्रेस पक्ष योग्य ती कदर करू शकणार आहे ना?’’ असा सवाल त्यांनी केला. गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याशी संपर्क साधून मला ‘आपले’ म्हटले याचा त्यांना विलक्षण आनंद झालेला दिसतो आहे. एका बाजूला कॉंग्रेसशी वाटाघाटी करताना भाजपचीही दारे खुली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना सध्या दिसतो.

काँग्रेस का हिरमुसली!

एका बाजूला भाजपचे नेते विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे आदी तरबेज खेळाडू विलक्षण मोहीम चालवत असताना कॉंग्रेस पक्ष मात्र विलक्षण गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मतदानानंतर विलक्षण उत्साह संचारलेले कॉग्रेसचे नेते गेले दहा दिवस काहीसे हिरमुसलेले दिसतात. त्यांचा आत्मविश्वास तर डळमळीत झालेला नाही ना? कारण स्वबळावर सत्तेवर येणार असे म्हणणारे कॉंग्रेस नेते सध्या 15 ते 16 या संख्येवरच अडखळलेले आढळतात. त्याउलट 14 ते 16 जागा प्राप्त होणार असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत आमचेच सरकार असे विश्वजीत आणि बाबूश छातीठोकपणे सांगू लागले आहेत. बाबूश तर म्हणतात, ‘सर्व अपक्ष आपल्या संपर्कात आहेत.

’ दिगंबर कामत यांनी म्हणे 2-3 संभाव्य अपक्षांशी संपर्क साधला होता. गरज लागली तर तुमची आम्हाला मदत लागेल, असे म्हणे त्यांनी सांगितले. परंतु आवश्यकता भासली तर या सदस्यांना ‘उचलून’ नेण्याचे धारिष्ट्य दिगंबर दाखवतील का? हाच प्रश्न सध्या विश्वजीत आणि बाबूश विचारतात. त्यामुळे या मंडळींना भाजप सत्तेवर आला, असेच भास होऊ लागले आहेत.

एसटी मतांचे दावेदार

आपली राज्यघटना जरी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करत असली, तरी निवडणुकीवेळी मात्र एकजात सगळे पक्ष ती तत्त्वे व ते नीती नियम बासनात गुंडाळून ठेवत असतात. गेल्या म्हणजे 2017 मधील निवडणुकीत भाजपने रमेश तवडकरांना उमेदवारी नाकारली व त्यामुळे सांगे, सावर्डे व काणकोण मतदारसंघात पक्षाला पराभव पत्करावा लागला असा युक्तिवाद केला जात होता.

तो उचित की अनुचित हा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी वरील तत्त्वाच्या आधारे यावेळी हे तिन्ही मतदारसंघ भाजप जिंकू शकेल. कारण यावेळी तवडकरांना उमेदवारी दिली आहे, पण विजयासाठी गरज आहे ती एकगठ्ठा एसटी मतांची. ती आजवर मिळाली नव्हती, आता तरी पडली की काय ते दहा मार्चला कळणार आहे.

ढवळीकरांच्या भेटीला पक्षश्रेष्ठी

गोव्यात भाजपला सत्तेवर आणण्याचा चंग दिल्लीतील नेत्यांनी बांधला आहे. दुसऱ्या बाजूला सोमवारी पक्षाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत. अनेक संभाव्य अपक्ष व मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी प्राथमिक बोलणी करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. स्वतः ढवळीकर यांची अलीकडची काही वक्तव्ये पाहिली तर त्यांनी आपले मन बदललेले दिसते. सुरवातीला त्यांनी विश्वजीत राणे हेच योग्य मुख्यमंत्री बनू शकतील, असे विधान केले होते.

आता त्यांनी भाजपच योग्य सरकार देऊ शकेल, असे मत व्यक्त केले आहे. यावरून तेही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसशी वाटाघाटी करतानाही त्यांनी एक कठीण अट पुढे केली आहे. महाराष्ट्राच्या नमुन्यानुसार मुख्यमंत्री बनण्याची पहिली संधी मगोपला मिळावी, ही त्यांची अट आहे. त्यावरूनच ढवळीकर यांच्या बदललेल्या मानसिकतेची कल्पना येऊ शकेल.

आयआरबीच्या खस्ता

गोव्यातील आयआरबी म्हणजे सर्व बाजूंनी वाजवायचे ढोलके ठरले आहे. यातील ४०० जवानांना इलेक्शन ड्युटीवर उत्तर प्रदेशात पाठविले होते. त्यांना आता टपाली मतदान करण्यासाठी पुन्हा गोव्यात आणले जात असून त्यांच्या बदली आणखी ४०० नवीन जवान उत्तर प्रदेशमध्ये जायला रवानाही झाले. वास्तविक अशा ड्युटीवर कोण जाते, त्यांना ड्युटीवरच मतदान करण्याची सोय केली जाते. पण गोव्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्याचे ध्यानच ठेवले नाही. त्यामुळे आता बदली जवान पाठवावे लागत आहेत. मात्र, या बदली जवानांना जाण्यासाठी खास रेल्वेची सोयही केली गेली नाही. पर्यायी त्यांना कदंब बसमध्ये बसून उत्तरप्रदेशसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. गोवा सरकारने त्यांची आधीच जर काळजी घेतली असती, तर त्यांना या खस्ता खाव्या लागल्याच नसत्या ना!

Digambar Kamat
गोव्यात काँग्रेसच्या विविध समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू

हम पाँच

गोव्याच्या निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार असून जे अंदाज लावले जातात, त्यावरून गोव्यात नक्कीच खिचडी सरकार येणार अशी चिन्हे दिसतात. यावेळी किमान 5 ठिकाणी अपक्ष निवडून येतील अशी चिन्हे आहेत. त्यात लक्ष्मीकांत पार्सेकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, विजय पै खोत, दीपक पाऊसकर व सावित्री कवळेकर यांचा समावेश असू शकतो. त्यासाठीच हे पाचहीजण एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. या पाचही जणांनी आपला स्वतःचा एक गट केला असून उद्या असा तसा निकाल लागला, तर या पाच जणांचा भाव एकदम वधारणार आहे. यातील काहीजणांनी म्हणे आपल्याला मंत्रिपद कुठले घ्यायचे हे मनोमन ठरवून देखील ठेवले आहे. होतील का त्यांचे मनसुबे सफल?

कार्यकर्तेही श्रमपरिहारसाठी दौऱ्यावर

निवडणुकांनंतर अनेक उमेदवार देवदर्शनासाठी कोल्हापूरला, शिर्डीला गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, पण राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही श्रमपरिहारसाठी दौऱ्यावर गेल्याचे सोशल मीडियावरून समजत आहे. अनेकांनी आपल्या पत्नी किंवा कुटुंबासमवेत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड केलेले फोटो पाहायला मिळतात. काही जणांनी काश्मीरमधील, काही जणांनी आग्रा येथील ताजमहाल समोरील, काही जणांनी बेंगळुरू, उटी यासारख्या पर्यटन ठिकाणाचे फोटो टाकलेले आहेत. हे कसे काय जमले बुवा? हे सध्या सर्वांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तोही निवडणुकांच्या वेळी म्हणजे लक्ष्मीच प्रसन्न. मग ही लक्ष्मी अशी मौजमजेत घालवायची होय की नाही?

हवी तेव्हा कारवाईची मोहीम

राज्यात सध्या वजन व मापे खात्याने दुकानदारांविरुद्ध मोहीम उघडली आहे. वास्तविक अशाप्रकारची तपासणी मोहीम ही सुरूच रहायला हवी, पण अधूनमधून याद येते तसे हे काम असते. त्यामुळे बनवेगिरी करणाऱ्या विक्रेत्यांचे फावते. दुकानदारांवर कारवाई करताय ठीक आहे, पण परराज्यातून गोव्यातील बाजारपेठेत येऊन नकली वजनातून नकली माल विकला जातो त्याचे काय? असा सवाल दुकानदार विचारत आहेत.

या ठिकाणी कुणाची भलावण करण्याचा प्रश्‍न नाही, पण दुकानांची आणि वजनांची तपासणी करण्याचे या खात्याचे कामच आहे. अधूनमधून जागे होऊन अशाप्रकारची मोहीम करणे हे बरोबर आहे का, शेवटी ग्राहक पैसे मोजतो त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाचा माल व्यवस्थित वजन करून मिळायलाच हवा. त्यासाठीच तर सातत्याने अशी तपासणी केली, तर अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल. पण खात्याचे अधिकारी जागे होतात, तेव्हाच अशा मोहिमा सुरू करतात, त्याला मग आणखी काय म्हणायचे.

Digambar Kamat
गिरीश चोडणकर: आमदार अपात्रता निवाड्याला देणार आव्हान

काँग्रेसचा शहाजोगपणा

निवडणुकीत प्रचारात सहकार्य न करणाऱ्या सात गट समित्या प्रदेश काँग्रेसने बरखास्त केल्या आहेत. ही कारवाई पक्षात शिस्त व एकजिनसीपणा आणण्यासाठी की कोणावर तरी सूड उगविण्यासाठी अशी विचारणा आता काँग्रेसवालेच करू लागले आहेत. पणजी, कुडतरी, काणकोण यासारख्या मतदारसंघात उमेदवारांबाबतची नाराजी पक्षाला नडली. ती दूर करण्यात नेतृत्व कमी पडले. आपला कमजोरपणा झाकण्यासाठी आता गट समित्यांचा बळी दिल्याची तक्रार होत आहे.

Digambar Kamat
महिला आयोगाने सोडविली 208 प्रकरणे

साईबाबांचा आशीर्वाद कुणाला?

मतदान प्रक्रिया संपली. आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते निकालाचे. मतदान आटोपल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी देवदर्शनासाठी राज्याबाहेर दौरे केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही महाराष्ट्रात जाऊन कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे, शनीदेवाचे आणि त्यानंतर शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले.

योगायोग म्हणजे, विद्यमान आणि माजी मुख्यमंत्र्यांचा दौरा जवळपास एकाचवेळी आला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन नेत्यांपैकी साईबाबांचा आशीर्वाद नक्की कुणाला लाभतोय, याची चर्चा आता प्रसारमाध्यमांत सुरू आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह

गेल्या काही वर्षांत अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकून सत्ताधारी पक्षाला जवळ केले. पक्षनिष्ठेपेक्षा त्यांना सत्तेला चिकटून रहाणे अधिक फायद्याचे वाटले. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये विविध समित्यांवर अनेक जागा मात्र आता रिक्त झाल्या आहेत आणि त्याचा फायदा तळागाळातील कार्यकर्त्यांना होणार आहे. कारण काँग्रेस पक्षाच्या विविध समित्या निवडण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

31 मार्चपर्यंत डिजीटल पद्धतीने सदस्य नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. पक्षाच्या बूथ समितीपासून ते केंद्रीय समितीपर्यंतच्या निवडणुका होणार आहेत असे काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या समित्यांवर आपली वर्णी लागणार असल्याने काँग्रेसमधील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com