Goa Miles : ‘गोवा माईल्स’ ही ॲपआधारित टॅक्सी सेवा राज्यभरात सुरूच राहणार आहे. स्थानिक टॅक्सीमालकांना प्राधान्य देणारी ही जगातील एकमेव सेवा आहे. यात गोव्यातील पर्यटक टॅक्सी परवाने असलेल्या टॅक्सीमालकांना विनाशुल्क सहभागी होता येते, अशी माहिती गोवा माईल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष दाभाडे यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये गोवा माईल्स सेवा सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या चार वर्षांत ही सेवा राज्यात कायम आहे. सेवेचा लाभ घेणारे ग्राहक अजूनही आमच्याशी जोडलेले आहेत. राज्यातील नागरिकांना आणि येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली होती, असे दाभाडे यांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर गोवा माईल्सचा काउंटर सुरू करण्यात आला होता, परंतु स्थानिक टॅक्सीचालकांनी विरोध केल्यानंतर तो बंद करण्यात आला. आता सरकारने तो पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. खुद्द वाहतूकमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे भविष्यात विरोध झाल्यास संरक्षण देण्याची जबाबदारी ही पूर्णतः राज्य सरकारची आहे, असे ते म्हणाले.
‘गोवा माईल्स’चे 14 लाख ग्राहक
2018 मध्ये सुरू झाल्यापासून गोवा माईल्सने सुमारे 14 लाख ग्राहकांनी हा ॲप डाऊनलोड करून त्यांचा फोन क्रमांक नोंद केला आहे. त्यामुळे भविष्यात कधीही त्यांना गोव्यात टॅक्सी सेवेची गरज पडल्यास ते थेट ॲप उघडून बुकिंग करू शकतात. एकदा सेवा घेतल्यानंतर क्रमांक नोंद केला जातो, जेणेकरून पुढच्या वेळी सेवा देणे सोपे होते.
‘गोवा माईल्स’ला 12 पुरस्कार
गोवा माईल्स सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याबद्दल ‘गोवा माईल्स’ला 1 आंतरराष्ट्रीय, 1 राष्ट्रीय आणि दहा राज्य पुरस्कार मिळाले आहेत. यावरून गोवा माईल्समार्फत देण्यात येणारी सेवा चांगली असल्याचे शिक्कमोर्तब झाले आहे, असे उत्कर्ष दाभाडे यांनी सांगितले.
स्थानिकांना प्राधान्य
गोवा माईल्स या ॲपआधारित टॅक्सी सेवेमध्ये केवळ स्थानिक टॅक्सीमालकांना आपली टॅक्सी नोंद करता येते. सध्या गोव्यातील सुमारे 2400 टॅक्सी गोवा माईल्समध्ये नोंदणी केल्या असून या राज्यात कार्यरत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.