Goa Miles App गोवा माईल्सच्या प्रवाशांसाठीच्या बहुपयोगी मॉड्यूल ॲपचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
हे ॲप ग्राहकांना वाहतुकीचे पर्याय, वाहन बुकिंग, बस ट्रॅकिंग, डिजिटल पेमेंट आणि बरेच पर्याय उपलब्ध करून देणार आहे.
गुरुवारी संध्याकाळी पणजी कदंब बसस्थानकावर ॲप लॉन्च केल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सर्व स्थानिक पायलटना विश्वासात घेऊन या ॲप सेवेत त्यांनाही सहभागी करून घेतले जाईल.
या ॲपमुळे पायलटना त्वरित पेमेंट मिळेल. शिवाय ग्राहकांच्या जीएसटीद्वारे सरकारला महसूलही मिळेल. गोवा माईल्स कंपनी पुढील वर्षात गोव्यात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘माझी बस’ योजनेविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेमुळे प्रारंभी सरकारचे काही प्रमाणात नुकसान होणार असले तरी या बससेवेमुळे स्थानिकांना फायदा होईल.
या सेवेसाठी 50 खासगी बसमालकांनी तयारी दर्शविली असून इतर बसमालकांनाही या सेवेत येण्याची विनंती करतो.
या वेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, पणजीतील रिक्षाचालकांना इलेक्ट्रिक रिक्षा देण्याची आणि त्यांना गोवा माईल्स ॲपवर आणण्याची योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी उल्हास तुयेकर, तसेच गोवा माईल्सचे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
विविध पर्याय असलेले ॲप असे...
कदंबची सेवा सध्या अस्तित्वात असलेल्या गोवा माईल्स ॲपवरच मिळणार आहे.
त्यासाठी ‘प्ले स्टोअर’वरून हे ॲप अपडेट करावे लागेल.
ॲप मोबाईलवर उघडल्यावर वरच्या भागात डावीकडे ‘बस’ असा शब्द दिसेल.
‘बस’ या शब्दावर क्लिक केल्यावर ‘कदंब’चे वेळापत्रक उघडण्याचा पर्याय मिळेल.
ॲपवर कुठून कुठे जायचे आहे, हे लिहिल्यावर बसचे पर्याय मिळतात.
त्यापैकी योग्य पर्यायावर क्लिक केल्यावर तिकीट काढण्याचा पर्याय मिळतो.
या ॲपवर अद्याप दुचाकी वा तीनचाकी वाहनांच्या आरक्षणाची सोय नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.