कळंगुट गट काँग्रेस (Calangute Group Congress) ही अधिक उत्साहाने काम करत असून, पक्षाची सदस्यसंख्या वाढविण्याबरोबरच या मतदारासंघातील उमेदवाराचे नाव निश्चित करून ते जिल्हा समितीला कळविण्याची जबाबदारी येथील कार्यकर्ते पार पाडतील. कळंगुट नष्ट करण्यास मायकल लोबो (Michael Lobo) यांना कधीही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रतिपादन गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केले.
कळंगुट गट काँग्रेस समितीच्या येथे घेतलेल्या बैठकीत चोडणकर बोलत होते. यावेळी उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भिके (Vijay Bhike) काँग्रेस सरचिटणीस तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, गोवा पंचायत राज संघटना अध्यक्ष जोसेफ सिक्वेरा, गटाध्यक्ष राजन कोरगावकर, जि. पं. उमेदवार लाॕरेन्स सिल्वेरा, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विवेक डिसिल्वा आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चोडणकर पुढे म्हणाले, येथील नागरिक व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष बळकट करा. बुथ समित्या कार्यरत करण्याबरोबरच संघटना वाढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सूचवले. कोविड काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना मदत करणे आणि ज्यांच्या कुटूंबातील कोणाला करोनामुळे मृत्यू आला असेल त्यांना राज्य व केंद्र सरकारने घोषित केलेले अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
करोना काळातील स्थिती अत्यंत बेजबाबदारपणे हाताळलेल्या भाजप सरकारमुळे राज्यातील ३ हजार निरपराध नागरिकांच मृत्यू झाला असे सांगून चोडणकर म्हणाले, या काळात अर्थव्यवस्था कोसळली, नोकऱ्या व व्यवसाय गेल्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. अशाही स्थितीत केंद्र आणि राज्य सरकार जनतेवर महागाई लादत आहे. पेट्रोल, डिझेल, गॕस दरवाढीने सामान्य जनता हैराण झाली आहे.
जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, आमच्याकडे भाजपला हरविण्यास सक्षम नेते असून काँग्रेसनिष्ठांनाच तिकिट मिळाले पाहिजे. लोकसभा व जिल्हा पंचायत निवडणुकीत कळंगुटमध्ये आम्ही ताकदवान असल्याचे सिध्द झाले आहे. यावेळी विवेक डिसिल्वा, लाॕरेन्स सिल्वेरा, बेनाडिक्टा डिसोझा, पंच सदस्य गाब्रियल फर्नांडिस, जयनाथ परुळेकर, सचिन वेंगुर्लेकर, प्रेमानंद दुईकर, लाॕरी फर्नांडिस यांनी महत्वाच्या सूचना केल्या. सुरूवातीला राजन कोरगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले. स्वप्नेश वायंगणकर यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.