पणजी, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोरील गाड्यांवर तयार केले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नयेत, तेथील पाणी पिऊ नये, अशी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्पष्टीकरणार्थ टिपण (नोट) नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांनी शुक्रवारी काढले आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी ते मागेही घेतले.
गोमेकॉ आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाहेरील गाड्यांवर तयार करण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांसाठी प्रदूषित पाण्याचा वापर केला जात आहे. उद्यानासाठी असलेल्या नळातील पाण्याचा वापर त्यासाठी होत आहे.
त्यामुळे गोमेकॉ आणि सुपरस्पेशालिटीमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बाहेरील गाड्यांवर पाणी पिऊ नये, तसेच खाद्यपदार्थही खाऊ नयेत, असे माहितीसाठीचे सूचित करणारे टिपण डॉ. काकोडकर यांनी शुक्रवारी काढले.
उद्यानातील नळाचे पाणी स्वच्छ नाही, त्याशिवाय पिण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठीही सुरक्षित नाही.
त्या पाण्यात जिवाणू त्याशिवाय रसायनांचे मिश्रणही असू शकते, असे या टिपणामध्ये म्हटले होते. दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांसाठी काढलेले टिपण पणजीतील डॉ. गोविंद कामत यांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या संचालकांना पाठवून दिले होते.
‘रातोरात पाणी सुरक्षित कसे झाले?’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने जीएमसीच्या बाहेरील स्टॉलवर अन्न खाण्याच्या धोक्याबद्दल इशारा देणारी टिपण मागे घेतल्याबद्दल गोमंतकीय जनतेला त्याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. ज्या उद्यानाच्या नळाचे पाणी वापरात आहे, ते प्रामुख्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी आहे.
मग त्याविषयी आज नोट मागे घेत आहे. मग आदल्यादिवशी माहितीसाठी ती नोट का काढली? रातोरात काय बदलले व पाणी सुरक्षित झाले? एसटीपीच्या पाण्यातून शुद्ध पाण्याचा चमत्कार होता का? हे धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी समाज माध्यमावरील वृत्तावर व्यक्त केली आहे.
काँग्रेसचा पंतप्रधानांना ‘टॅग’
काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘टॅग’ करत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या नोडल अधिकाऱ्याने रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या घाण पाण्यावर प्रसिद्ध केलेल्या नोटवर आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण घेण्याची मागणी केली.
सार्वजनिक लोकांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का? एफडीएने कारवाई का केली नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
‘उद्यानातील पाण्याचा वापर नाही’
सुपरस्पेशालिटी आणि गोमेकॉतील जेवणाविषयी ज्या कंपनीला टेंडर दिली आहे, त्या कंपनीचा व्यवसाय वाढविण्यासाठी येथील गाडेधारकांना लक्ष्य केले जात आहे. येथील गाडेधारक उद्यानातील पाण्याचा वापर करीत नाहीत, हे सर्वजण घरातून पाणी घेऊन येतात.
अधिकतर तयार पदार्थ घरातून करून आणतात. या लोकांना त्रास देण्यासाठीच हा प्रकार सुरू आहे, असे आपचे नेते प्रा. रामराव वाघ यांनी सांगितले.
जीएमसी आणि सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या बाहेरील गाड्यांवरील खाद्यपदार्थ न खाण्याबाबतची ती नोट अंतर्गत होती, लोकांसाठी नव्हती. ती अंतर्गत नोट कोणीतरी समाज माध्यमांवर व्हायरल केली. आम्ही तो आदेश मागे घेत आहोत.
- डॉ. उदय काकोडकर, नोडल अधिकारी (नोट)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.