गोमेकॉ : सर्वसामान्‍यांचा आधार!

आशियातील सर्वांत जुने इस्पितळ म्हणून नावारुपास आलेले व गोव्‍याच्‍या आरोग्याचा कणा बनलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे.
Goa Medical College
Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

विलास महाडिक

आशियातील सर्वांत जुने इस्पितळ म्हणून नावारुपास आलेले व गोव्‍याच्‍या आरोग्याचा कणा बनलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळाचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे.

उपचारपद्धती, अत्याधुनिक उपकरणे तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समावेशामुळे दर्जेदार आरोग्य सेवा व उपचार या इस्पितळात मिळण्यात आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज कोणत्याही प्रकारच्या आजारांवर गोमेकॉत उपचार उपलब्ध आहेत.

Goa Medical College
Cancer Treatment in GMC: सज्जता कर्करोगाशी लढण्‍याची

त्‍यामुळे आता गोमंतकीयांना गोव्‍याबाहेर जाण्‍याची गरज राहिलेली नाही. गोमेकॉतच सर्व उपचार मोफत मिळतात. गेल्‍या दशकभरात गोव्यातील आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यात राणेंचा सिंहाचा वाटा आहे.

दर्जेदार उपचार व सोयीसुविधांमुळे गोमेकॉ हे देशातील नामांकित इस्पितळांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. एकेकाळी ६७ असलेला क्रमांक आता २३ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील नामांकित इस्पितळांनाही गोमेकॉने मागे टाकले आहे.

प्रत्येक रुग्णाला जीवदान देणे हाच मुख्य उद्देश असल्याने गोमंतकीयांबरोबरच शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्‍यातील रुग्णही गोमेकॉकडे धाव घेत आहेत. येथे मिळणारे उपचार व सोयीसुविधा इतर राज्यांत मिळत नसल्याने रुग्णांचा लोंढा गोव्यात येत आहे. हे आव्‍हान पेलत गोमेकॉ इस्पितळ पुढील वाटचाल करत आहे.

दरदिवशी अडीच हजार रुग्‍णांवर डायलिसीस

  • राज्यात गोमेकॉ तसेच सरकारच्या आरोग्य योजनेखालीली खासगी इस्पितळांत दरदिवशी सुमारे २५०० हून अधिक रुग्ण डायलिसीसचे उपचार घेतात. सुमारे १७ खासगी केंद्रांत दीनदयाळ स्वास्थ्य योजनेअंतर्गत (डीडीएसएसवाय) रुग्णांना मोफत सेवा दिली जातेय. डायलिसीस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

  • सध्या १४ सरकारी इस्पितळांत तर १७ खासगी इस्पितळांत सरकारच्या योजनेखाली ही सेवा दिली जात आहे. डायलिसिस रुग्णांना ते राहत असलेल्या ठिकाणी जवळच्या इस्पितळात जाणे शक्य व्हावे यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

  • गोमेकॉत डायलिसीस केंद्र असून तेथे एकाचवेळी २७ रुग्णांना ही सेवा दिली जाते. हे केंद्र २४ तास सुरू असले तरी रुग्णांचे डायलिसिस करण्यासाठी व्यवस्थापनाला कसरत करावी लागते. इस्पितळात दाखल असलेले रुग्ण व दरदिवशी येणारे रुग्ण यामुळे अधिक ताण येत असल्याने हे उपचार तालुकावारही उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

४० कोटी रुपये खर्चून साकारणार नवे प्रकल्‍प

गोमेकॉचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी नव्या प्रकल्पांचा विचार सुरू आहे. सुमारे ४० कोटी खर्चून हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम साधनसुविधा विकास महामंडळामार्फत केले जाईल. काही कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

त्यात नवीन तीन लेक्चर सभागृह सध्याच्या कॉलेज इमारतीत असतील. तसेच तीन मजली इमारतीत असलेले हे तीन लेक्चर सभागृह जुन्या कॉलेज इमारतीला जोडण्यात येतील. एका लेक्चर सभागृहाची क्षमता सुमारे ३५० विद्यार्थी सामावून घेण्याइतकी आहे तर इतर दोन लेक्चर सभागृहात प्रत्येकी १८० विद्यार्थ्यांना समावेश करता येईल.

हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून त्यावर सुमारे १६ कोटी खर्च होणार आहेत. गोमेकॉसाठी नवीन दोन परीक्षासभागृहांच्या बांधकामाची योजना आहे. सुमारे १२०० चौ. मी. क्षेत्रफळातील या बाधकामासाठी १२ कोटींचा अंदाजित खर्च आहे. सध्या शवागार आहे, त्या ठिकाणी हे बांधकाम येणार आहे.

सुपर स्पेशालिटी विभागात नवीन दोन कॅथलॅब

गोमेकॉत एकच कॅथलॅब आहे. त्यामुळे बराच ताण पडत आहे. मात्र आता सुपर स्पेशालिटी विभागात नवीन दोन कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा ताण कमी होणार आहे. जी कॅथलॅब गोमेकॉत आहे, त्याचा वापर इंटरव्हेनुलर रेडिओलॉजीसाठी करण्यात येणार आहे.

नवीन दोन कॅथलॅब सुरू झाल्यानंतर रुग्णांना झटपट उपचार करण्यात मदत होणार आहे. या कॅथलॅबमुळे कराव्या लागणाऱ्या सर्जरीचे प्रमाण कमी होणार आहे. या कॅथलॅबची मशिनरी पोहचली असून त्याचे इस्टॉलेशन झाले की ती त्वरित सुरू करण्यात येणार आहे.

देशातील पहिल्‍या दहा इस्‍पितळांत मिळविणार स्‍थान

गोमेकॉ इस्पितळात गेल्या काही वर्षांपासून मोठे बदल झाले आहेत, होत आहेत. उपचारांसाठीची अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात येत आहे. सरकारच्या मदतीने आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्वतः लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा विडा उचलला आहे.

इस्पितळातील कर्मचाऱ्यांमध्येही त्यांनी शिस्त आणली आहे. इस्पितळ परिसर तसेच वॉर्डमधील साफसफाई याकडे मंत्र्यांचे बारीक लक्ष असते. त्‍यामुळे वॉर्डमधील कर्मचारी कामात कुठेही हलगर्जीपणा करत नाहीत. देशातील पहिल्या दहांमध्‍ये गोमेकॉचा क्रमांक यावा यासाठी राणे यांची धडपड सुरू आहे व त्यात ते यशस्वी ठरत आहेत.

डीएम, एमसीएच अभ्यासक्रमांसाठी मान्यता

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) गोव्यासाठी डीएम व एमसीएच हे तीन वर्षांचे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. ते सुपर स्पेशिलिटी ब्लॉकमध्ये सुरू करण्‍यात येणार आहेत. दरवर्षी प्रत्येकी दोन कार्डियाक व न्युरो सर्जन डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाईल.

या सुपर स्पेशिलिटी ब्लॉकमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली असून, त्यात २५० स्लाईस सीटी स्कॅनर, ऑटो अनलायझरसह थ्री टेस्ट एमआरआयचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचा शोध लगेच लागून उपचार सुरू करणे सोपे झाले आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सध्या १८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. गोमेकॉचा विस्तार करण्यात येत असून त्याचे बांधकाम सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्वसुविधायुक्त अशी नवी वसतिगृहे बांधण्यात आली आहेत.

दरदिवशी ३०० रुग्‍ण ॲडमिट : दरदिवशी विविध ओपीडींमध्ये सरासरी १ हजार ते १२०० रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यातील सुमारे ३०० रुग्णांना उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करून घेतले जाते. तसेच सरासरी २७० रुग्णांना डिस्‍चार्ज देऊन घरी पाठविले जाते. मेडिसीन, युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, प्रसूती, ऑर्थोपेडिक विभागात दरदिवशी गर्दी असते. त्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू झालेल्‍या या ओपीडी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवून सर्व रुग्णांची तपासणी केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com