
डिचोली : सर्वत्र लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असतानाच, मंगळवारी सायंकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसावेळी मयेसह डिचोलीच्या काही भागांना चक्रीवादळाचा तडाखा बसला.
या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. या पडझडीची चार घरांसह एका गोठ्याला झळ बसली. मयेसह डिचोली भागात वीजवाहिन्या तुटून वीज खांबांचीही मोडतोड झाली. मये भागातील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली.
यात जीवितहानी टळली असली तरी वीज खात्याचे सुमारे दहा लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चक्रीवादळामुळे वीज खांब मोडल्याने मयेतील केळबायवाडा तसेच जवळपासच्या परिसरात वीज प्रवाह बंद झाला. रात्री उशिरापर्यंत या भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते.चक्रीवादळामुळे विविध भागांत झाडे पडल्याने डिचोली अग्निशमन दलाला धावपळ करावी लागली.
वीज खात्याचे मोठे नुकसान
चक्रीवादळाचा डिचोली शहरातही काही प्रमाणात प्रभाव दिसून आला. सुधा कॉलनी येथे एका घरावर माड कोसळला. तसेच हरिजनवाडा येथेही एका घरावर झाडाची फांदी कोसळली. श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ वीजवाहिन्या तोडून एक झाड रस्त्यावर कोसळले. म्हावळींगे भागातही घरावर झाड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. चक्रीवादळामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना धावपळ करावी लागली. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
वाहतुकीवर परिणाम
मयेतील केळबायवाडा, तीर्थबाग, अर्धवाडा आदी भागांना चक्रीवादळाचा रस्त्यांवर दहाहून अधिक झाडांची पडझड झाली. दोन घरांची काही प्रमाणात पडझड झाली. केळबायवाडा येथे तर वीज खांब मोडून भला मोठा आम्रवृक्ष रस्त्यावर कोसळला. झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही विपरित परिणाम झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.