Mauvin Godinho: माविन यांची दमछाक 'खरी कुजबुज'

सरकारातील सर्वच आमदार, मंत्री सरकारचे डॅमेज कंट्रोल मागे लागले आहेत.
Mauvin Godinho | Goa News
Mauvin Godinho | Goa News Dainik Gomantak

केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणीची निगराणी आणि दिशादर्शकाचे काम करणाऱ्या नीती आयोगाने राज्य सरकारबरोबर नुकतीच बैठक घेतली. यावेळी नीती आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देश गोवा फॉरवर्डच्या हाती लागले आणि गोवा फॉरवर्डने हा तोफगोळा सर्वसामान्यांसमोर खुला केला.

आता सरकारातील सर्वच आमदार, मंत्री सरकारचे डॅमेज कंट्रोल मागे लागले आहेत. यासाठी पुढे आलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्होच आता नव्या फेऱ्यात अडकले आहेत अशी चर्चा आहे.

मांद्रेचे आमदार गेले कुठे?

म्हापशाचे शेतकरी संघटनेचे नेते संजय बर्डे यांनी भलताच शोध लावून मांद्रेचे आमदार जीत आरोलकर कुठे गेले? असा प्रश्न केल्याने सध्या ही एकच चर्चा सुरू झाली आहे. त्याचे झाले असे, मांद्रे येथे मोपा विमानतळ प्रकल्पाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू होते.

मागच्यावेळी मगो पक्षाने ठराव घेऊन तो मंजुरीसाठी पाठवला होता. मगोचे आमदार जीत आरोलकर यांनाही या धरणे आंदोलनाला आमंत्रण दिले होते. त्यांनी येण्याचे कबूल केले. मात्र, अचानक एक व्यक्ती आजारी असल्याने आमदार हॉस्पिटलमध्ये गेले व तसा निरोपही दिला होता.

मात्र, याची माहिती संजय बर्डे यांना नव्हती का? किंवा आमदाराला डिवचण्यासाठी मुद्दाम आमदार कुठे बिळात गेले काय असा प्रश्न केला. त्यावेळी आमदाराच्या मदतीला पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर धावून आले. त्यांनी कुणावर विनाकारण टीका करू नका, त्यांच्या अडचणी समजावून घ्या असे जाणकार म्हणून सांगितले. मांद्रेत सध्या हाच विषय चर्चेत आहे.

सांगे ईको सेन्सिटिव्ह झोन?

सांगे तालुका ईको सेन्सिटिव्ह झोन होणार? की केवळ अफवा? या प्रश्नावरून सध्या सांगेत चर्चा रंगत आहे. तालुक्यातील ग्रामसभांनी या निर्णयाला विरोध केला आहे. स्थानिक आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही ईको झोनला विरोध केला आहे.

आता सांगे ईको सेन्सेटिव्ह झोन झाला, तर आयआयटीचे भवितव्य काय? काहीजण असाही दावा करतात की आयआयटी विरोधाची धार कमी करण्यासाठी हे नाटक रचले आहे. आयआयटी हवी का ईको सेन्सिटिव्ह झोन? तुम्ही निर्णय घ्या असाच अप्रत्यक्ष इशारा यातून देण्यात आला आहे का?

नीती आयोगाचा सल्ला

नीती आयोगाने गोव्यातील बेरोजगारी व आर्थिक स्थितीबाबत सादर केलेल्या अहवालावरून सध्या राज्यात राजकारण चांगलेच रंगले आहे. काही मंडळींनी तर सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

मात्र, या राजकीय गदारोळात आयोगाने दिलेल्या सल्ल्याकडे सत्ताधारी व विरोधकांचेही लक्ष गेलेले दिसत नाही. आयोगाने राज्य सरकारला गोव्याच्या भावी गरजा ओळखून त्या भागविण्यासाठी कृषी तसेच मासळी उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुचविताना गेल्या पाच वर्षांत घटत चाललेल्या उत्पादनाकडे लक्ष वेधले आहे, पण रोजगार आकडेवारीचे राजकारण करण्यात गुंग झालेल्यांचे या सल्ल्याकडे लक्ष गेलेले नसावे.

परशुराम कोटकरांचा जोश

मांद्रे येथे भाऊसाहेब बांदोडकर उद्यानात मोपा विमानतळ नामकरण समितीमार्फत ६ रोजी धरणे आंदोलन झाले.

त्यावेळी आजारी असतानाही काठीचा आधार घेत पेडणेचे माजी आमदार परशुराम कोटकर सहभागी झाले आणि त्यांनी सरकारने मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव दिले नाही, तर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सहकारातून बाहेर पडावे अशी मागणी केली होती. तिथंच ते थांबले नाहीत, तर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हे दोघे सायकलीची दोन चाके आहेत.

मांद्रेचे चाक पंचर झाले, तर सायकल हातात धरून पुढे जाता येईल. मात्र, मडकईचे चाक पंचर झाले, तर सायकल टाकून द्यावी लागेल असा शोध लावला. याविषयी सर्वत्र चर्चा चालू होती. पेडणे तालुक्यातील मगो पक्ष हा ढवळीकर बंधूंचा पक्ष नाही, तो पेडणेकरांचा आहे असे कोटकर म्हणाले. कोटकर यांचा जोश पाहिल्यास तो युवकांनाही लाजवणारा होता.

शेवटी संतोष दिसला!

‘ट्राय ट्राय ट्राय टील यू सक्सिड’ असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना नऊ वेळा पराभवाचे तोंड बघावे लागले होते. मात्र, प्रयत्न करीत राहिल्याने ते यशस्वी ठरले.

पण आपले राजकारणी निवडणुकीत पराभूत झाल्यावर समाज कार्यातूनच गायब होतात. कुंकळ्ळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले संतोष फळदेसाई विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघात बरेच सक्रिय होते.

मात्र, पराभूत झाल्यावर गायब झाले होते. आता निवडणुकांनंतर अनेक दिवसांनी संतोष एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिसले. संतोषबाब ‘एका कापडान बायल म्हातारी जायना’ ही म्हण माहीत आहे ना? मग सोडू नका, प्रयत्न करीत रहा असा संदेश त्यांचे समर्थक द्यायला लागले आहेत.

Mauvin Godinho | Goa News
Sankalp Amonkar: एमपीटीत कोळसा प्रदूषण होऊ न देण्यावर आपली भूमिका ठाम

‘मोपा’च्या नामकरणात ‘आरपीआय’ची उडी

मोपा विमानतळाच्या नामकरणात आता रिपब्लिकन पार्टीनेही उडी टाकली आहे. मोपा विमानतळाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी जोरदार मागणी या पार्टीच्या नेत्यांनी केली आहे.

सुरवातीला भाजप सरकारने मोपा विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचे जाहीर केले, त्यानंतर मगोने भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे यासाठी खटपट चालवली. ही खटपट सुरू असतानाच कुठून तरी चर्चिल आलेमाव यांनी जॅक सिक्वेरांचे नाव पुढे केले, तर आता रिपाईंकडून बाबासाहेब आंबेडकर.

यापुढे आणखीही काही नवीन नावे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अखेर नाव कुणाचे हे गुलदस्त्यातच राहणार आहे. कारण निर्णय तर केंद्र सरकारच घेणार ना..!

पश्चिम बगल रस्त्याचे कवित्व

मडगावचा पश्चिम बगल रस्ता हे उच्च न्यायालयालाही न सुटणारे कोडे ठरलेले आहे. 2015 मध्ये त्याचे काम सुरू झाले, पण अजून 2.75 कि. मी. भागातील काम पूर्ण होत नाही. या कामावर वास्तविक उच्च न्यायालयाची देखरेख आहे व तरीही हा गुंता राहावा हे लोकांसाठी कुतूहलाचे ठरले आहे.

हा टप्पा बाणावलीमधील आहे व तेथील रस्त्याच्या स्वरूपाबाबत स्थानिक रहिवासी व सरकार यांच्यातील मतभिन्नता हे अडथळ्याचे मुख्य कारण असून या स्थितीत न्यायालयाने ठरवून दिलेल्या मुदतीत रस्ता पूर्ण कसा केला जातो हे सर्वांसाठीच कुतूहलाचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com