Super Cup Football: एफसी गोवाची विजयी सलामी

Super Cup Football Tournament: इंटर काशीवर २-१ फरकाने मात
Super Cup Football
Super Cup FootballDainik Gomantak
Published on
Updated on

Super Cup Football Tournament: एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी देताना संघर्षानंतर इंटर काशीवर २-१ फरकाने मात केली. स्पर्धेच्या ड गटातील सामना शुक्रवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झाला.

सामन्यातील सर्व गोल उत्तरार्धातील खेळात झाले. नोआ सदोई याने ५८व्या मिनिटास एफसी गोवा संघाचे खाते उघडले. नंतर ६५व्या मिनिटास कार्लोस मार्टिनेझ याने आघाडी २-० अशी वाढविली. ७८व्या मिनिटास ग्यामार निकुल याच्या गोलमुळे इंटर काशीला पिछाडी कमी करता आली.

Super Cup Football
'WTT Star Contender Table tennis साठी भारतीयांत शरथ, साथियन प्रमुख खेळाडू

आयएसएल स्पर्धेत सलग दहा सामने अपराजित असलेल्या एफसी गोवा संघाने शुक्रवारच्या लढतीत काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नारायण दास व लिअँडर डिकुन्हा यांना बचावफळीत, तर आयुष छेत्री व पावलो रेट्रे यांना मध्यफळीत संधी मिळाली. गोलरक्षणाची जबाबदारी धीरज सिंग याने सांभाळली.

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास एडमंड लालरिनडिका याने जोरदार चढाई केली होती, मात्र धीरजच्या दक्षतेमुळे एफसी गोवावरील संकट टळले. त्यानंतर एफसी गोवाच्या नोआ सदोईचा प्रयत्न काशी संघाचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने यशस्वी होऊ दिला नाही.

सामन्याच्या ४९व्या मिनिटास इंटर काशीने गोल केला होता, परंतु तो अमान्य ठरल्याने गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

मात्र नंतर ब्रायसन फर्नांडिसच्या असिस्टवर सदोई याने मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडी मिळवून दिली. नंतर सदोई याने रचलेल्या चालीवर कार्लोस मार्टिनेझ याने काशी संघाला आणखी एक धक्का दिला.

इंटर काशी संघाने पिछाडी कमी केल्यानंतर एफसी गोवा संघाच्या सदोई, बोरिस सिंग, देवेंद्र मुरगावकर, सावियर गामा यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात धोकादायक चढाया केल्या होत्या, परंतु त्या यशस्वी ठरल्या नाहीत.

सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या ‘ड’ गटातील गोव्याचा पुढील सामना १७ जानेवारी रोजी बंगळूर एफसीविरुद्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com