Goa News: भौगोलिक मानांकन मिळालेल्या खोला मिरचीला राज्यभरातून पसंती दिली जाते. मात्र, दर परवडत नसल्याने या मिरचीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. आता तिची जागा म्हापसा मिरची, गुंटूर, शेपडा, काश्मिरी मिरचीने घेतली आहे. यावर्षी खोला मिरचीचा दर 1,200 ते 1,500 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
सध्या पर्यायी मिरच्यांचा वापर स्वयंपाकघरात केला जात आहे. गेल्या वर्षी खराब हवामानामुळे उत्पादन घटल्याने खोला मिरचीचा दर आठशे रुपयांवरून एक हजार प्रतिकिलोपर्यंत गेला होता. सध्या म्हापसा मिरची प्रतिकिलो सहाशे रुपये दराने विकण्यात येते.
दोन वर्षांपूर्वी या मिरचीचा दर प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपये होता. गुंटूर व शेपडा मिरचीचा दर दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो होता. मात्र, आज बाजारात या मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचप्रमाणे पोरसाच्या मिरचीचाही दर प्रतिकिलो एक हजार रुपये झाला आहे.
यंदा मिरचीला हवामान पोषक ठरल्याने खोला मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, राज्यात मिरची पिकाचे दर ठरविणारी यंत्रणाच नाही. पूर्वी गोवा बागायतदार संस्था खोला मिरचीची खरेदी करत होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून या संस्थेने मिरची खरेदी करणे बंद केले आहे.
......खोला मिरचीची वैशिष्ट्ये
दोन वर्षांपूर्वी खोला मिरचीला भौगोलिक मानांकन मिळाले. खोलाच्या डोंगराळ भागात ही मिरची पावसाळ्यात पिकवली जाते. त्याशिवाय काणकोणमधील गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ या भागात मिरचीचे पीक घेतले जाते. या मिरचीचा रंग लालसर असून त्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते. त्याशिवाय ती मध्यम तिखट असते. या मिरचीची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते. रंग व चवीसाठी ही मिरची प्रसिद्ध आहे.
अशी केली जाते लागवड
एप्रिल-मे महिन्यात मिरचीची रोपवाटिका तयार करण्यात येते. पावसाला सुरुवात झाल्यानंतर त्यांची लागवड केली जाते. त्यानंतर पालापाचोळ्याचे आच्छादन घालणे, मशागत यासारख्या प्रक्रिया कराव्या लागतात. झाडावर मिरची धरू लागल्यानंतर त्या पिकतात. त्यानंतर त्या खुडून उन्हात वाळवाव्या लागतात. शिवाय पिकाचे रक्षण करण्यासाठी २४ तास शेतकऱ्यांना जागरूक राहावे लागते.
कीर्तीराज नाईक गावकर, विभागीय कृषी अधिकारी-
खोला व काणकोण मिरचीची लागवड डोंगराळ भागात पावसाळ्यात करण्यात येत असल्याने त्या पिकाखालील क्षेत्राला वेगवेगळ्या कारणांमुळे मर्यादा पडली आहे. या पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.