Mapusa Idol Desecration Case म्हापसा करासवाडा-म्हापसा येथे समाजकंटकांकडून झालेल्या शिवपुतळ्याच्या विटंबनेनंतर पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे. अशा कृत्यांना आळा घालण्याच्या हेतूने पोलिसांनी धार्मिकस्थळांवर रात्रंदिवस पहारा ठेवला आहे. तसे तोंडी आदेश उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या सोमवारी उत्तररात्री करासवाडा येथील सिंहासनाधिष्ठ शिवपुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आता खबरदारी म्हणून अशा स्थळांवर पहारा तसेच गस्त ठेवली आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे.
त्यासाठी पोलिस खाकी वर्दीत नागरिकांना दिसणे आवश्यक आहे. स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी व्हिजिबल पोलिसिंगवर भर दिला आहे. त्याद्वारे गुन्हेगार तसेच समाजकंटक यांच्यावर वचक निर्माण करण्याचा पोलिसांचा भर असेल.
करासवाडा येथील प्रकारामुळे प्रार्थनास्थळे व धार्मिकस्थळांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने खबरदारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिवपुतळे, मंदिरे, चर्च, क्रॉस आदी ठिकाणी दोन पोलिस रात्रंदिवस नियुक्त करण्यात आलेले आहेत. कारण अशा धार्मिकस्थळांवर काही अप्रिय घटना घडल्यास नंतर पोलिसांनाच जबाबदार धरले जाते.
म्हापसा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असून खबरदारी म्हणून आम्ही या सर्व ठिकाणी पोलिस गस्त ठेवली आहे. यामुळे धार्मिकस्थळांना सुरक्षा मिळेलच, शिवाय नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण होईल. कारण लोकांच्या तक्रारी असतात की पोलिस गस्त नसते. अशा गस्तींसाठी वरिष्ठांकडून अतिरिक्त आयआरबी स्टाफ पुरविण्यात आलाय.
- जीवबा दळवी, पोलिस उपअधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.