Goa Accident: कृत्रिमरित्या बनविलेला रेस ट्रॅक बेतला जीवावर

Goa Accident: मोटोक्रॉसमध्ये रायडरचा मृत्यू : राज्यातील पहिलीच घटना
Goa Accident | Goa News
Goa Accident | Goa News Dainik Gomantak

Goa Accident: श्रीदेव बोडगेश्‍वर मंदिरासमोरील मैदानावर आयोजित एमआरएफ मोटोग्रीप सुपरक्रॉस ॲक्शन चॅम्पियनशीप स्पर्धेत रायडरचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. अल्ताबआलम हसन लाडजी (20, रा. घोगळ-मडगाव) असे मृताचे नाव आहे. यामुळे आयोजकांवर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्पर्धेदरम्यान रायडरचा मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

अल्ताबआलम हा आपली हिरो इम्प्लस (क्र. जीए 03क्यू 8578) ही दुचाकी घेऊन कृत्रिमरित्या बनविलेल्या रेस ट्रॅकवर दुचाकी जम्प करण्याचा प्रयत्न करीत होता. ट्रॅकवर जम्प मारल्यानंतर त्याचा दुचाकीवरून तोल गेला.

त्यामुळे तो दुचाकीसह रेस ट्रॅकच्या बाजूला खाली जमिनीवर कोसळला. मानेला आणि छातीजवळ जबर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून अगोदर खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी त्यास गोमेकॉत हलविले.

तिथे उपचार सुरू असताना अल्ताबआलमचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची घटना घडली तेव्हा नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर उपस्थित होते.

रितसर परवानगी

  • स्पर्धेसाठी आयोजकांनी म्हापसा पालिकेजवळ अर्ज केला होता, त्यानुसार आम्ही दोन दिवसांपूर्वीच त्यांना परवानगी दिली होती. आयोजकांनी आवश्यक शुल्क भरले होते, अशी माहिती म्हापसा नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

  • स्पर्धेसाठी दोन दिवसांसाठी कोमुनिदाद दि म्हापसाकडून परवानगी मिळाली होती व स्पर्धा संपल्यानंतर कचरा साफ करण्याची आणि मैदान स्वच्छ करण्याची अट त्यात होती. तसेच स्पर्धेसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ध्वनी परवानगी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

सुरक्षा सुविधांबाबत प्रश्‍नचिन्ह

या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, यात मयत तोल गेल्याने रेसट्रॅकवर गाडीसह खाली पडून पाठीमागून येणारी गाडी त्याच्या अंगावर पडते, असे दिसते. दरम्यान, स्पर्धेस्थळी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या स्पर्धेस्थळी आवश्यक आरोग्य सुरक्षा सुविधांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

Goa Accident | Goa News
Goa Accident:वेगाने केला घात; पंचवाडी येथील अपघातात सांगेचा युवक ठार

रायडर प्रशिक्षित होता का?

मोटोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धेत एखाद्या रायडरचा मृत्यू झाल्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. म्हापशातील हा ट्रॅक रेसिंगसाठी योग्य होता का? त्याची चाचणी झाली होती का? तसेच मृत रायडर हा प्रशिक्षित होता का? असे प्रश्न निर्माण होत आहे. गोव्यातील बहुतेक रायडर हे हाैशी असल्याने त्यांचे खास प्रशिक्षणही झालेले नसते.

म्हापशात स्पर्धा; सुरवातीपासूनच आक्षेप

स्पर्धेसाठी मातीच्या सहाय्याने कृत्रिम रेस ट्रॅक बनविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी बोडगेश्वर शेतकरी संघटनेने या रेस ट्रॅकच्या शेजारील शेतजमिनीतील माती अवैधपणे खणून ती या ट्रॅकसाठी वापरली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून केला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.

आयोजकांची होणार चौकशी :

स्पर्धेच्या आयोजकांना सोमवारी पोलिस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आयोजकांतर्फे आवश्‍यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली होती का? याची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे म्हापसाचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com