Mopa International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज, गोव्यात चोख बंदोबस्त

Mopa International Airport: आज गोव्यात आयुष हॉस्पिटल आणि दोन संस्‍थांचेही मोदींच्या हस्ते थाटात लोकार्पण होणार..
Mopa International Airport | pm Narendra Modi
Mopa International Airport | pm Narendra ModiDainik Gomantak

Mopa International Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्‍याच्‍या दौऱ्यावर येत आहेत. पणजीत सुरू असलेल्या नवव्या आयुर्वेद काँग्रेस परिषदेचा ते समारोप करतील. याच समारंभात आयुष इस्‍पितळ आणि संशोधन संस्थेसह अन्य दोन संस्थांचे ते उद्‌घाटन करणार आहेत.

त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गणल्या गेलेल्या मोपा आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे उद्‌घाटन होणार आहे. दरम्‍यान, या विमानतळाला माजी संरक्षणमंत्री तथा माजी मुख्‍यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्‍याचे निश्‍चित झाले असून तशी घोषणा मोदी करतील, असे समजते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला मोपा विमानतळ नामकरणाचा वाद आता संपुष्टात येईल.

ऐतिहासिक यश मिळवून केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी सार्वजनिक कामाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गोव्‍यात येत आहेत. सरकारबरोबरच भाजपने त्‍यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज बनली आहे.

Mopa International Airport | pm Narendra Modi
Reservation: गोव्यातही अनुसूचित जमातींना आरक्षण हवे- प्रकाश वेळीप

सकाळच्या सत्रात पंतप्रधान महाराष्ट्रातील कार्यक्रम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास गोव्यात थेट मोपा विमानतळावर दाखल होतील. सुरुवातीला ते पणजीत सुरू असलेला नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये सहभागी होतील. चार दिवस चाललेल्या या काँग्रेस परिषदेचा ते समारोप करतील.

या निमित्ताने उभारलेल्या आरोग्य प्रदर्शनाला पंतप्रधान भेट देणार आहेत. त्यानंतर जगभरातून आलेल्या प्रतिनिधींशी ते संवाद साधतील. याच समारंभामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद धारगळ-गोवा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी दिल्ली आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ युनानी गाझियाबाद या तीन सॅटेलाईट संस्थांचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करतील.

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अतिमहनीय व्यक्ती गोव्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून सुरक्षेत कोणत्याच प्रकारची कसर राहणार नाही यासाठी पोलिस गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी तैनात आहेत. पोलिस दलाची विशेष शाखा, शीघ्र कृतिदल, एलसीबी, विशेष राखीव दल, सीआयएसएफ, एसएजी, विशेष सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र माेदी दुपारी 1.30 वाजता थेट मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. तेथून ते नौदलाच्या हेलिकॉप्टरने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमजवळ उभारलेल्या हेलिपॅडवर येतील.

  • त्यानंतर ते कारने रस्‍तामार्गे कला अकादमीनजीक कांपाल मैदानावर उभारण्यात आलेल्या विशेष शामियानात येतील व 2.15 वाजता नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेसचा समारोप करतील. या कार्यक्रमात अन्य तीन संस्थांचे उद्‌घाटन होईल.

  • हा कार्यक्रम संपल्‍यानंतर संध्‍याकाळी 4.30 वाजता मोदी हेलिकॉप्टरने मोपा विमानतळाकडे प्रयाण करतील. तिथे ते या महत्त्‍वाकांक्षी प्रकल्‍पाचे उद्‌घाटन करतील. तसेच तेथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे. त्यानंतर मोदी दिल्लीकडे रवाना होतील.

Mopa International Airport | pm Narendra Modi
Mopa : इंडिगो नंतर 'ही' एअरलाइन मोपा विमानतळावरुन उड्डाणासाठी सज्ज

स्मृतींना मिळेल कायम उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळाचे उद्‌घाटन करण्‍यात येणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यावेळी मोदींची जाहीर सभा होणार असून मोपा विमानतळाचे नामकरण ते ‘मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना कायम उजाळा मिळत राहणार आहे.

कनेक्टिव्हिटी वाढली

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mopa International Airport) सुरू झाल्यानंतर तो देशाअंतर्गत 20 तर आंतरराष्ट्रीय 12 नव्या स्थळांना जोडणार आहे. यापूर्वी दाबोळी विमानतळ देशाअंतर्गत 15 आणि आंतरराष्ट्रीय 6 स्थळांना जोडत होता. ‘मोपा’वर कार्गोची स्वतंत्र यंत्रणा आहे.

काँग्रेसची नाराजी

मोपा विमानतळाचा उद्‌घाटन सोहळा हा सार्वजनिक आहे. तरीसुद्धा निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेते आणि दक्षिण गोवा खासदारांचे नाव छापले नसल्‍यामुळे काँग्रेसने सरकारवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.

हा रस्ता असेल बंद

पंतप्रधान मोदींच्या गोवा दौऱ्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. दुपारी 1 ते संध्‍याकाळी 4.30 वाजेपर्यंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम ते कांपाल मैदान व्हाया दोनापावला हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्‍यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती गोवा वाहतूक पोलिस दलाने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com