पर्वरी : डॉ. अमोल तिळवे हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित मिनेश नार्वेकर (minesh shirodkar) आज पर्वरी पोलिस ठाण्यात शरण आला. (Surrender) पोलिसांनी (police) त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली.
डॉ. तिळवे हल्ला प्रकरणानंतर संशयित नार्वेकर गायब होता. या प्रकरणातील तिघे संशयित रोहीश साळगावकर (२७), कृष्णा नाईक (३२) व रोहिल साळगावकर (२७) यांना पोलिसांनी काल अटक केली होती. संशयित नार्वेकर याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज जामीन अर्जावर सुनावणी होती. न्यायालय जामीन अर्ज फेटाळणार असल्याची कुणकुण लागल्याने संशयित नार्वेकर आज संध्याकाळी पर्वरी पोलिसांत शरण आला. उद्या त्याला म्हापसा येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असल्याची माहिती निरीक्षक देऊलकर यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक अनिल पोलेकर पुढील तपास करीत आहेत.
डॉक्टरांविरोधात तक्रार करणार : नार्वेकर
संशयित मिनेश नार्वेकर याने आपण डॉ. अमोल तिळवे यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. माझे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या बहिणीच्या मुलाचा मृत्यू डॉ. तिळवे यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. डॉक्टरांनी आम्हांला अगोदर कल्पना दिली असती तर तो वाचला असता, असे संशयित नार्वेकर यांनी सांगितले.
रोहन खंवटेंनी घेतली
पोलिस अधीक्षकांची भेट
डॉ.अमोल तिळवे यांच्यावर (amol tilave) हल्ला प्रकरणी संशयित मिनेश नार्वेकर याला अजून का अटक झाली नाही याची चौकशी करण्यासाठी आमदार रोहन खंवटे यांनी पोलिस अधीक्षक सोबित सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच संशयितांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली. कोविड महामारी काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी लोकांची सेवा केली आहे आणि आजही करीत आहेत. अशा डॉक्टरावर हात उचलणे, ही निंदनीय बाब आहे. याचे कोणीच समर्थन करणार नाही, असेही आमदार खंवटे म्हणाले. सध्या या प्रकरणी ज्या पद्धतीने तपास सुरू आहे यावरून असे दिसते, की पोलिस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.