LLB Admission Scam बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची नवी गुणवत्ता यादी आज उच्च शिक्षण संचालनालयाने जाहीर केली असून आपल्या ज्या सुपुत्रासाठी कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्वा यांनी हा घोळ घातला, तो जायम कार्ल दा सिल्वा हा तिसऱ्या क्रमांकावरून थेट 63व्या क्रमांकावर घसरल्याचे दिसून आले आहे.
या नव्या गुणवत्ता यादीप्रमाणे पूर्वीच्या यादीत समावेश नसलेल्या किमान ११ जणांना या अभ्यासक्रमात प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. बारावीत पडलेल्या गुणांची आणि प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांची सरासरी काढून ही नवीन यादी तयार केली आहे.
आपल्या पुत्राला बारावीत फक्त 61 टक्के गुण मिळाल्याने त्याला या अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार नाही हे कळून चुकल्यामुळे कारेचे प्राचार्य साबा दा सिल्वा यांनी यावेळी बारावीचे गुण विचारात न घेता फक्त प्रवेश परीक्षेत मिळालेले गुणच गृहीत धरण्याचा निर्णय प्रवेश प्रक्रियेत घेतला होता.
त्यासाठी सगळी प्रवेश प्रक्रियाच वेठीस धरली होती. हा प्रकार दै. ‘गोमन्तक’ने उघडकीस आणल्यानंतर गोवा विद्यापीठाने सखोल चौकशी केली होती.
दरम्यान, नव्या यादीत पूर्वीच्या यादीत पहिल्या स्थानी असलेला ज्योसुआ डिसोझा हा नव्या यादीतही पहिलाच आहे.
मात्र पूर्वीच्या यादीत दुसरा असलेला अर्णव देसाई नवीन यादीत 10 व्या स्थानावर फेकला गेला आहे. बारावीत 94 टक्के गुण मिळवूनही या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवू न शकलेला सोहम हळबे नवीन यादीत चक्क 45 व्या स्थानावर पोहोचला आहे.
दा सिल्वांचा मुलगा अखेर कला शाखेत
प्रवेश प्रक्रियेत घोळ घातल्यामुळे गोवा विद्यापीठाने केलेल्या चौकशीत कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य साबा दा सिल्वा हे दोषी आढळल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले, तर त्यांच्या चिरंजीवांनी आपला कारेतील प्रवेश रद्द करून चौगुले महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.