Goa Live News Update 09 Jan 2024
Goa Live News Update 09 Jan 2024Dainik Gomantak

Goa Daily News Wrap: खून प्रकरणातील ठळक घडामोडी, पाऊस, आंदोलन आणि दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा

पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...
Published on

कसा झाला चार वर्षीय मुलाचा मृत्यू, शवविच्छेदन अहवाल काय सांगतो?

उशी किंवा कोणत्या तरी वस्तूच्या मदतीने गळा आवळून मुलाचा खून, गुदमरल्याने चेहरा आणि छाती फुगली होती. नाकातून देखील रक्त येत होते, अशी माहिती चार वर्षीय मुलाचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉ. कुमार नाईक यांनी दिली.

नेसाय खून प्रकरण; संशयिताला 10 दिवसांची पोलीस कोठडी

नेसाय पाद्रीभाट येथे मालमत्तेच्या वादातून फ्लोरेंटिना फर्नांडिस (53) या महिलेचा चाकू भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांकडून संशयित मारिओ ओलिव्‍हेरा (34) याला अटक करण्यात आली.

मडगाव न्यायालयाने संशयिताला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी एकाला अटक

सरकारी वसतिगृहामधील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस कथित फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित अक्षय मनोहर तायडे (21, भोपाळ) यास मुंबईतून ताब्यात घेत अटक केली. अपहरणाच्या चोवीस तासांत पोलिसांनी पीडितेची सुटका केली.

गोव्यात दरवर्षी कोंकणी चित्रपट महोत्सव

गोव्यात होणार कोंकणी चित्रपट महोत्सव, मुख्यमंत्री प्रमोद सावंताची घोषणा. बुलबुल चित्रपट महोत्सवाचे दरवर्षी रवींद्र भवनात होणार आयोजन.

सत्तरी तालुक्यात अवकाळी पाऊस, सुपारी भिजली

सत्तरी तालुक्यात अवकाळी पावसाने झोपडले असून, अंगणात सुखत ठेवलेली सुपारी भिजली. बागायतदारांना फटका बसला आहे.

गेल्या 24 तासांत गोव्यात 6 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Goa Corona Update: गोव्यात गेल्या 24 तासांत 06 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 45 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 98.46 टक्के एवढा आहे.

गोवा माईल्सच्या चालकाला जमावाकडून मारहाण

मोरजी येथे गोवा माईल्सच्या चालकाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 13 अनोळखी जणांविरोधात पेडणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोव्यात यलो अलर्ट, काही भागात मध्यम तथा मुसळधार पावसाची शक्यता

गोव्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, काही भागात मध्यम तथा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गोव्यातील 42 टक्के डॉक्टर नैराश्य आणि चिंताग्रस्त, ताणतणाव कमी करण्यासाठी घेतायेत मद्याचा सहारा

इंडियन मेडिकल असोसिएशन, गोवाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात राज्यातील डॉक्टरांबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मद्यपान करणाऱ्या डॉक्टरांपैकी प्रत्येक पाचवा डॉक्टर ताणतणाव कमी करण्यासाठी दारू पीत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

तसेच, सर्वसामान्यांच्या तुलनेत डॉक्टरांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती अधिक वाढलीय असेही अहवालात म्हटलंय.

सिकेरी हत्याप्रकरण: आरोपी सूचना सेठला 6 दिवसांची पोलीस कोठडी

सिकेरी येथील हॉटेलमध्ये 4 वर्षांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी म्हापसा कोर्टाने मुख्य आरोपी सूचना सेठला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Calangute 4year child murder case
Calangute 4year child murder caseDainik Gomantak

4 वर्षांच्या मुलाचा जीव घेणारी एआय स्टार्टअपची सीईओ!

आपल्याच 4 वर्षांच्या मुलाची गोव्यात हत्या करणारी सूचना सेठ ही मूळ बंगालची रहिवासी पण सध्या बेंगळुरूमध्ये वास्तव्यास. सूचना सेठ उच्चशिक्षित असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती एका AI स्टार्टअपची सीईओ आहे.

धावजे रेल्वे ऑव्हरब्रीज प्रक्रिया सुरू!

धावजे ओल्ड गोवा रेल्वे ओव्हरब्रीजचे प्राथमिक काम सुरू. आमदार राजेश फळदेसाईंनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली पाहणी. लवकरच भूमिपूजन होणार असल्याची माहिती.

नवरा-बायकोच्या नात्यातील तणावाने घेतला बाळाचा जीव!

सिकेरी येथील हॉटेलमध्ये आपल्या 4 वर्षांच्या बाळाची हत्या केलेली सूचना सेठचे पतीसोबत तणावपूर्ण संबंध होते. त्यांची घटस्फोटाची कारवाई सुरू असून मुलाच्या ताब्यासाठी लढाई सुरू होती. यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली.

मांद्रे पंचायत क्षेत्रात जुने मासळी मार्केट मोडून त्या ठिकाणी नवीन मासळी मार्केट उभारण्यासाठी आमदार जित आरोलकर ,मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पुढील प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची दिली माहिती

बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

Health Department: बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा, दोन वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची पायाभरणी झाली होती मात्र अद्याप काडीचेही काम झालेले नाही

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे!

Sanjivani Sugar Factory Protest: पुढच्या वर्षी संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

मयेत गावातून खनिज वाहतूक; स्थानिकांचा विरोध

Goa Mining: मयेत खनिज वाहतूक रोखली. गावातून अंतर्गत रस्त्याने वाहतूक करण्यास स्थानिकांचा विरोध. गावातून वाहतूक करण्यास न्यायालयाची स्थगिती असतानाही बेकायदेशीरपणे वाहतूक. ग्रामस्थांचा आरोप.

जावेद अख्तर यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठी लिहिले गीत... 

Purple Festival Goa 2024 Song: प्रसिद्ध गीतकार आणि कवी, जावेद अख्तर यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टसाठी गीत लिहिले आहे. या गीताचे संगीत दिग्दर्शन मन्नान शाह यांनी केले आहे आणि दिव्यांग व्यक्तींनी ते सादर केले आहे.

अवकाळी पावसाची राज्यात हजेरी! विविध भागात बरसल्‍या सरी

Goa Rain Update: कालपासून (सोमवार) राज्यभरात अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे. राज्‍याच्‍या विविध भागांत आज सोमवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. पेडणे शहरात सुमारे वीस मिनिटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून रस्त्यावर सगळीकडे बरेच पाणी झाले.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com