Goa Live Updates 10 November 2023
Goa Live Updates 10 November 2023Dainik Gomantak

Goa News Wrap: धारबांदोड्यात ब्लॅक पँथर, ED ची कारवाई, अपघात; राज्यातील दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

Goa Breaking News 10 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच गोव्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज

धारबांदोड्यात ब्लॅक पँथर, 15 पाळीव प्राण्यांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये घबराट

सांकोर्डा येथे काही दिवसांपूर्वी दिसलेला ब्लॅक पँथर शुक्रवारी धारबांदोरा येथे cctv कॅमेऱ्यात कैद झालाय. धक्कादायक म्हणजे तेथे त्याने गावातील पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याचेही बोलले जातेय. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

धारबांदोडा येथील अतुल नाईक यांच्याघराच्या सीसीटीव्हीमध्ये हा ब्लॅक पँथर मांजर तोंडात पकडून पळत असल्याचे कैद झाले आहे. नंतर या बिबट्याने एका पाळीव कुत्र्यालाही ठार मारल्याची माहिती समोर येतेय.

सावर्डे येथे काँग्रेसकडून मनोज परब यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

मनोज परब यांनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यावर आरोप केले होते. या आरोपाचा निषेध म्हणून सावर्डे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी परब यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

यावेळी प्रतिकात्मक पुतळ्यावर तुकाराम सावंत असे लिहून तसेच, पुतळ्याला परब यांचा चेहरा लावून पुतळा जाण्यात आला. शिवाय परब यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.

पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधले 51 मोबाईल फोन; कळंगुट PI नी केलंय 'हे' आवाहन

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या साहित्यांची, मोबाईल, लॅपटॉप सारख्या गॅझेटची चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत असून मानवी सहकार्याने पोलिसांना काही प्रकरणांचा छडा लावण्यात यश आलंय.

मात्र आता पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीच्या घटनांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून त्यात त्यांना पुरेपूर यश देखील आलंय.

नुकतंच कळंगुट पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान CEIR पोर्टलचा वापर करून गेल्या 3 महिन्यांत उच्च दर्जाचे 51 मोबाईल फोन ट्रॅक केल्याची बातमी हाती येतेय.

नरकासूर स्पर्धा रोखण्यासाठी ढवळीकरांना देवाने दिली चांगली संधी; पर्वरीतील स्पर्धेवरुन काँग्रेसचा खोचक टोला

पर्वरी येथील गृहनिर्माण मंडळाच्या भूखंडावर नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा गृहनिर्माण मंडळाने पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना आवश्यक परवानगी दिल्याचे गृहनिर्माण मंत्री रामकृष्ण उर्फ ​​सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट करावे तसेच गृहनिर्माण मंडळाचे एमडी सुधीर केसरकर यांची अचानक बदली करण्याचे कारण काय? यावर उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

गोव्यात ED ची मोठी कारवाई; जमीन हडप प्रकरणी तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर जमीन बळकावण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिघांविरोधात कारवाई केली आहे. ईडीने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या 11.82 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत.

म्हापसा येथे पे-पार्किंग मुद्द्यावरुन झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर, एक गंभीर

म्हापसा येथील आंतरराज्य बसस्थानकावरील पे-पार्किंग जागेमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पे-पार्किंग अटेंडंट रोहित तलवार याची डॉमनिक लीटाओ आणि त्याच्या पत्नीसोबत गाडी पार्क करण्यावरून बाचाबाची झाली. डॉमनिक यांच्या म्हणण्यानुसार त्यांना पार्किंग झोनमध्ये फक्त 2-3 तास गाडी पार्क करायची होती.

कुडतरीत 3 गरजूंना घरे बांधून देणार; गरीबी काय असते हे मी अनुभवलीय...

गरिबी काय असते हे मी अनुभवलेली आहे. आम्ही बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने काणकोणात अवघ्या तीन महिन्यात २० घरे गरिब गरजवंताना प्रदान केलेली आहेत. यापुढे गरजवंताना १०० घरे बांधून देण्यात येणार आहेत.

जानेवारी २०२४ पासून या कामाला सुरुवात केली जाणार आहे. एस्. टी. मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा यांच्या विनंतीनुसार कुडतरी मतदारसंघात तीन घरांचे बांधकाम सुरू करण्याचा विचार आहे, असे आश्वासन गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिले.

Farrey Premiere In IFFI: सलमानच्या भाचीचा 'फर्रे' इफ्फीत होणार प्रदर्शित, भाईजानने दिल्या खास शुभेच्छा

भारताचा 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणार आहे. इंडियन पॅनोरमामध्ये समाविष्ट 25 फीचर आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे.

या महोत्सवात सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा पहिला चित्रपट 'फर्रे' प्रदर्शित केला जाणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अभिषेक यादव आणि पाधी यांनी चित्रपटाचे लिखाण केले आहे.

सरकारी ऑफिसमध्ये आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच आर्थिक व्यवहार होणार

भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली डिजिटल इंडिया ही एक मोठी मोहीम असून याच्या अंमलबजावणीमुळे देशातील विविध क्षेत्रांमध्ये सरकारी सेवा सहजतेने उपलब्ध होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर गोव्यातील सरकारी ऑफिसमधील सर्व कॅश काउंटर आता बंद होणार असून इथून पुढे केवळ ऑनलाईन मोड पद्धतीनेच आर्थिक व्यवहार करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

कुंडई येथे दोन कारची धडक; अपघातात युवती जखमी

गोव्यातील कुंडई येथे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास दोन कारची धडक झाली. वर्सा आणि वॅगनआर अशा दोन कारमध्ये ही धडक झाली. या अपघातात युवती जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात धडकेनंतर एक कार रस्त्यावर एका बाजूला कलंडली होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत करून या कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. बराचवेळ ही कार अशाच अवस्थेत रस्त्यावर असतात.

दारू पिऊन बस चालवणारा 'तो' कदंब बसचालक निलंबित; परवानाही रद्द

दारू पिऊन वाहन चालवण्याचा प्रकार कदंब चालकाबाबत घडला होता. याप्रकरणी चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. तर सदर चालकाला निलंबित करण्यात आले असून त्याचा परवानाही रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

...तर SOPO कर देणार नाही - मच्छिमारांचा इशारा; बैठकीला SGPDA सदस्य गैरहजर

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज, शुक्रवारी मडगाव पालिकेत मच्छिमार, घाऊन मासे विक्रेते संघटना, SGPDA, उपजिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी मच्छिमारांनी SGPDA ने नियुक्त केलेली व्यक्ती खंडणी मागत असल्याचा आरोप केला. तसेच सोपो कर न देण्याचा इशारा दिला.

पालिकेचे चीफ ऑफिसर गौरीश सांखवाळकर म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैठक घेतली आहे. मासे विक्रेते आणि मच्छिमार यांना हायकोर्टाने दिलेले दिशानिर्देश पालन करण्याबाबत सांगितले आहे.

खाण कंपन्याकडील थकीत 271 कोटी रुपये वसुलीच्या मागणीला सेझा कामगार संघटनेचा पाठिंबा. थकबाकीदार सेझा (वेदांता) कंपनीला खाण ब्लॉक लिलावात भाग घेण्यास मान्यता दिलीच कशी? सरकारला प्रश्न.

म्हापसा पालिकेची सर्वसाधारण बैठक रद्द

म्हापसा पालिकेची आज शुक्रवारी बोलावलेली सर्वसाधारण बैठक पालिका अधिनियमास धरून न बोलविल्याने नगराध्यक्षावर बैठक रद्द करण्याची नामुष्की! विरोधी तसेच सत्ताधारी नगरसेवकांकडून प्रशासकीय कामकाजावर टीका.

डिचोलीत स्वच्छता कामगाराकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

डिचोलीत स्वच्छता कामगाराकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न. प्रकरणाची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. गट काँग्रेससह महिला विभागाची डिचोली पालिकेवर धडक. कारवाईची मागणी. निवेदन सादर.

Goa news
Goa newsDainik Gomantak

कला अकादमीचे उद्घाटन!

आज (10 नोव्हेंबर) कला अकादमीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कला अकादमीचे उद्घाटन करण्यात आले.

चोडणचा पूल बांधेपर्यंत फेरीबोट दरवाढ करू नये

तिसवाडी, सरकारने जाहीर केलेले फेरीबोट दरवाढीचे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे. चोडणचा पूल बांधेपर्यंत यात कोणतीही दरवाढ करू नये, असा एकमुखी निर्णय बुधवारी (ता.८) झालेल्या चोडणच्या जाहीर सभेत घेण्यात आला.

‘इफ्फी’ला सेलिब्रिटींची मांदियाळी!

पणजी, गोव्‍याची राजधानी पणजीत २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या ५४व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’त जगभरातील चित्रपट प्रदर्शनाबरोबर सिनेक्षेत्रातील राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांचे मास्टर क्लास आणि संवाद सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

यात सनी देओल, राणी मुखर्जी, विद्या बालन, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्धीकी, मायकेल डग्लस यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा रसिकांना सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीच्‍या उपाध्‍यक्षा आमदार दिलायला लोबो यांनी दिली.

National Games 2023 वर राज्याने खर्च केले 450 कोटी रूपये; गेल्या 15 दिवसांत घेतले 300 कोटीचे कर्ज...

गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्याच्या निधीतून सरकारने 450 कोटी रूपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आर्थिक संकटामुळे गोवा सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या कमाल मर्यादेच्या 40 टक्क्यांहून अधिक कर्ज घेतले आहे. विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत राज्याने बाजारातून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिवसाला 500 किलो कचऱ्याची विल्हेवाट लावणारे बायोडायजेस्टर बसवणार सरकार

बायोडिग्रेडेबल कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना बायोडायजेस्टर्सची स्थापना करण्यास मदत करण्याचा निर्णय गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (GWMC) ने घेतला आहे. यातील काही यंत्रे ही दिवसाला 500 किलोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतात.

GWMC ने उत्पादक, अधिकृत डीलर्स, एजन्सी आणि फर्म यांना विविध क्षमतेच्या बायोडायजेस्टरचा पुरवठा करण्यासाठी तसेच ते स्थापित करण्यासाठी आणि देखरेखीसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

यात प्रतीदिन 25 किलो, प्रतिदिन 75 किलो, प्रतिदिन 150 किलो, प्रतिदिन 300 किलो आणि प्रतिदिन 500 अशा विविध क्षमतांचे बायोडायजेस्टर्सची मागणी केली आहे. दरम्यान, हा करार तीन वर्षांसाठी असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com