Goa Liberation : बार्देश, तिसवाडी सासष्टी हे पूर्वीचे तीन तालुके. त्यातील सासष्टी तालुक्याचे विभाजन होऊन मुरगाव हा नवीन तालुका. या चार तालुक्यांचा समावेश जुन्या काबिजादीत होतो. गोव्यातील उरलेले आठ तालुके हे नवीन काबिजाद म्हणून ओळखले जातात. वरील तालुक्यांना जुनी काबिजाद व नवीन काबिजाद, असे का म्हटले जाते हे आपण मागील भागात पाहिले. पोर्तुगिजांनी जुन्या काबिजादीचे तालुके सन 1510 ते 1543 च्या दरम्यान विजापुरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतले. सुरुवातीची दोन दक्षके शांतपणे राज्य करणाऱ्या पोर्तुगिजांनी दोन दशकांनंतर हळूहळू आपल्या ख्रिश्चन पंथाचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली आणि सोळाव्या शतकाच्या शेवटच्या अर्ध शतकात जगातील मानवी इतिहासात अत्यंत क्रूर अत्याचार, प्रेम व शांततेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाखाली पोर्तुगिजांनी गोव्यातील जुन्या काबिजादीत केले.
पोर्तुगिजांनी एवढे भयंकर अत्याचार का केले? त्यामागची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेतलेच पाहिजे. पोर्तुगाल हे राष्ट्र युरोपमधील दक्षिण, पश्चिम सीमेवर वसलेले राष्ट्र. दक्षिणेकडे. भूमध्य सागराचे अत्यंत अरुंद मार्ग. नंतर लगेच दक्षिणेकडे आफ्रिका खंडाचे उत्तर टोक. या आफ्रिका खंडाच्या उत्तर सीमेवर अल्जेरीया, मोरोक्को, सौदी अरेबिया ही ओळीने वसलेली मुस्लीम राष्ट्रे होती. या भौगोलिक सीमांवर वसलेल्या पोर्तुगाल व स्पेन या राष्ट्रांना प्रचंड सामाजिक, पांथिक उखाळ्यापाखाळ्यांना तोंड द्यावे लागले.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात आजच्या सौदी अरब देशात हजरत मुहम्मद पैगंबरांनी इस्लाम ऊर्फ मुसलमान पंथाची स्थापना केली. मुहम्मद पैगबरांनंतर एका हातात तलवार व दुसऱ्या हातात कुराण घेऊन खलीफा अबु बकर, खलीफा उमर, खलीफा उस्मान व खलीफा अली यांनी इस्लामचा प्रचार तलवारीच्या जोरावर अरबस्थानाच्या बाहेर उत्तर आफ्रिका, दक्षिण युरोप ते पूर्वेला अफगाणिस्थानपर्यंत पसरवला. खलीफा उस्मान व खलीफा अली यांच्या काळात पोर्तुगाल व स्पेनमध्ये प्रवेश केलेल्या इस्लामने तलवारीच्या जोरावर विलक्षण वेगाने हे प्रदेश व्यापून टाकले. याच काळात आगोदरच्या शतकात पोर्तुगाल व स्पेनमध्ये ख्रिस्त पंथाचा प्रचार झाला होता. त्यात आता तलवारीच्या धाकावर इस्लाम पंथ स्वीकारावा लागत होता. अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या पांथिक उलथापालथीमध्ये पोर्तुगाल व स्पेन ही राष्ट्रे पुढील चार शतके भरडली गेली. पुढे बाराव्या शतकात युरोपमध्ये सामाजिक क्रांती होऊन पुनश्च ख्रिस्ती पंथाची स्थापना होऊन युरोपीयन राष्ट्रांमधून इस्लामचे अस्तित्व मिटवले गेले. या पाच शतकांत इतिहासाने मुस्लीम-ख्रिश्चनांची भयंकर पांथिक-युद्धे पाहिली. इतिहासात ‘क्रूसेड वॉर’ या नावाने ती प्रसिद्ध आहेत. या प्रचंड पांथिक संघर्षामुळे स्पेन व पोर्तुगाल राष्ट्रे अत्यंत कडवट रोमन कॅथलिक बनत गेली.
अरब मुस्लीम व्यापाऱ्यांकडून भारतातील मसाले व कापड या रोजच्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा युरोपला होत असे. तेव्हा अरबांच्या मनमानीला कंटाळून, ख्रिश्चन पंथाचे सर्वोच्च गुरू पोप यांनी पोर्तुगीज दर्यावर्दींना भारताशी प्रत्यक्ष संपर्क होणारा नवीन सागरी मार्ग शोधण्याची प्रेरणा दिली. सोबत आशीर्वाद आणि आर्थिक पाठबळही दिले. त्यामुळे ज्या ठिकाणी पोर्तुगीज राजाचे राज्य निर्माण होईल, तेथे फक्त आणि फक्त रोमन कॅथलिक पंथाचेच राज्य असेल, हा पहिला आणि शेवटचा नियम ठरला.
सोळाव्या शतकात गोव्यात जुन्या काबिजादीत पोर्तुगीज सत्तेची पाळेमुळे घट्ट झाल्यावर 1515 साली प्रथम पोर्तुगीजांनी दिवाडी बेटावरील हिंदूंचे मंदिर तोडले. ते बहुधा सप्तकोटेश्वराचे असावे. पूर्वी हे मंदिर बहामनी सुलतानाने मोडले होते. ते परत विजयनगरच्या राजांनी बांधले. श्रीसप्तकोटेश्वराचे शिवलिंग पोर्तुगीजांनी विहीरीच्या कठड्यावर आडवे घातले. असे एखाददुसरे हिंदू मंदिर इतर पंथीयांकडून तोडले जाणे, हे त्या काळच्या हिंदूंच्या अंगवळणी पडले होते. कारण त्या काळात अनेकदा भारतभर पसरलेले इस्लामी शासक अधूनमधून हिंदू मंदिरांचा नाश करत व जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावत. त्यामुळे, हेही असेच एक चक्र असेल, असे कदाचित त्यावेळच्या हिंदूंना वाटले असेल. परंतु या काळात पोर्तुगालमध्ये ज्युआंव तिसरा हा राजा कट्टर ख्रिश्चन होता. पूर्णपणे रोमन कॅथलिक पंथगुरु पोपच्या प्रभावाखाली राज्य करत होता. त्याने अनेक पंथप्रचारकांना ख्रिस्तप्रचारासाठी गोव्यात पाठवले. येथील लोकांची स्वत:च्या धर्मावरील निष्ठा अढळ होती. ते सहजासहजी ख्रिश्चन होत नसत. तेव्हा पोपच्या प्रेरणेने हिंदूंसाठी अनेक सरकारी हुकूम काढले गेले जे हिंदूंना त्रासदायक ठरू लागले.
गोवा बेटातील काही सरकारी कर्मचारी पोर्तुगीजांच्या अमिषाला बळी पडून ख्रिश्चन झाले. तेव्हा या सरकारी कर्मचाऱ्यांची ख्रिश्चन पंथगुरूंना वाजत गाजत मिरवणूक काढली. त्याचा परिणाम उलटा झाला. ख्रिश्चन झालेल्या इसमांविरुद्ध लोकांमध्ये राग निर्माण झाला. पादरी मिगेल वाज यांच्या प्रेरणेने निघालेल्या सरकारी हुकमानुसार 1540 साली तिसवाडी बेटातील सर्व हिंदू मंदिरे पाडण्यात आली. हिंदूंच्या समारंभांवर, सणांवर बंदी आणली.गेली. नवीन मूर्ती बनवणे, नवीन मंदिर बांधणे यावरही बंदी आणली. याशिवाय जमीन विषयक कायदे करतानाही हिंदूधर्मीय अडचणीत येऊन त्यांनी ख्रिश्चन व्हावे, असे कायदे केले. याच काळात पुढे 1543 साली बार्देश व सासष्टी महालही पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. त्यामुळे, मुख्य गोवा बेट ऊर्फ तिसवाडी येथील राजधानीला आता शत्रूचे भय उरले नव्हते. येथून पुढे पोर्तुगीजांच्या ख्रिश्चनीकरणाला उधाण आले. 1567 साली राशोल किल्ल्याचा कॅप्टन दियोगू रुद्रामोश याने सरकारी हुकुमानुसार सासष्टी महालातील सर्व मंदिरे पाडली. असाच प्रकार बार्देशमध्येही सुरू झाला. तेव्हा हिंदू लोकांसमोर दोन पर्याय उरले. एक ख्रिश्चन होणे किंवा आपले घरदार सोडून परागंदा होणे. जबरदस्तीने ख्रिश्चन झालेले लोक मनाने हिंदूच होते. घरात गपचूप हिंदू धर्माचे पालन करत. अशा नवख्रिश्चनांसाठी फ्रान्सिस झेवियरच्या प्रेरणेने इन्क्विझिशनचा कायदा करून, जगातील भयंकर मानवी अत्याचार गोव्यात घडले.
पोर्तुगीजांच्या विध्वंसापासून वाचवण्यासाठी काही मंदिरांतील देवतांना लोकांनी गपचुप पळवून शेजारील आदीलशहाच्या राज्यात, जेथे स्थानिक हिंदू वतनाचे राज्य नियंत्रण होते तेथे नेऊन ठेवल्या. पोर्तुगीजांना फक्त हिंदूंना ख्रिश्चन करायचे नव्हते, तर हिंदू वेशभूषा, आहार, सण समारंभ हे पूर्णपणे बदलायचे होते. यात काही अंशी ते यशस्वी झाले. त्यामुळे गोव्याच्या जुन्या काबिजादीला पूर्वेकडचे रोम असेही म्हटले जाऊ लागले. सोळाव्या सतराव्या शतकात येथून हिंदू संस्कृतीचे पूर्णपणे उच्चाटन झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.