सध्या कतार येथे चालू असलेली फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अखेर संपली आहे. फुटबॉलप्रेमी गोव्यातही स्पर्धेचा ज्वर चढल्याचं दिसून आलं. गोव्यातील एका विशिष्ट अल्पसंख्याक पंथातील लोकांच्या गाडीत वा घरात फिफा विश्वचषक स्पर्धा वा युरोपियन कप स्पर्धा चालू होताच पोर्तुगीज राष्ट्रध्वज झळकू लागतात. पोर्तुगाल फुटबॉल संघाचा गणवेश घालून त्या संघाच्या सामन्यावेळी जल्लोष करणाऱ्या गोमंतकीय पाठीराख्यांचे फोटो समाजमाध्यमावर झळकू लागतात. ती छायाचित्रे पाहून या मागे राहिलेल्या पोर्तुगिजांच्या वंशजांचे सखेद आश्चर्य वाटते. पोर्तुगीज राजसत्तेच्या जुलमी अत्याचाराच्या वाचलेल्या अनेक आठवणी परत एकदा जाग्या होतात.
1955 सालच्या ऑक्टोबर महिन्यात बेती पोलीस चौकीवर गोवा मुक्ती आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. राजधानी पणजीसमोरील मांडवी नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या या चौकीवर हल्ला चढवून कार्यकर्त्यांनी पोर्तुगीज सत्तेला उघड आव्हान दिले होते. चौकीवरील पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात बाळकृष्ण भोसले हा पोंबुर्पा येथील स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाला. त्याचे पार्थिव म्हापसा येथील रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या पार्थिव देहाची ओळख पटविण्यासाठी भोसले यांचे सहकारी आणि अटक करण्यात आलेले मोहन रानडे यांना पोलिसांनी म्हापसा येथील रुग्णालयात नेले. ’सतीचे वाण ’ या आपल्या आत्मचरित्रात त्या प्रसंगाचे वर्णन करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रानडे यांनी लिहिले आहे ’म्हापशाला रुग्णालयात नेल्यावर त्यांनी ओळखतो का याला? असा समोरच्या अचेतन देहाकडे अंगुलिनिर्देश करीत मला प्रश्न केला. होय, हा बाळकृष्ण भोसले मी उत्तरलो. तसे ‘बंदी दू !’ असे किंचाळत मोंतेरुने चक्क त्या मृताच्या खाडकन् थोबाडीत मारली व आपल्या नीच संस्कृतीचे दर्शन घडवले’. रानडेंनी वर्णिलेला प्रसंग वाचतानाही त्या उद्दाम पोर्तुगिजांच्या मनात गोमंतकीयांबद्दल किती द्वेष आणि घृणा होती याची जाणीव होते.
इंग्लंड, फ्रान्स, डच , पोर्तुगाल या चार युरोपियन देशांनी भारतातील विविध प्रदेशांत आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्या करताना तेथील स्थानिक जनतेचे आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण केले. अर्थात, त्या सोबत त्यांनी आपल्या देशात अनेक साधनसुविधाही उभारल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर प्रचंड राजकीय, सामाजिक उलथापालथ झाली, जगाचा नकाशा बदलून गेला. ‘सूर्य कधीही न मावळणाऱ्या’ ब्रिटिश वसाहतींवर महायुद्धपश्चात सूर्यास्त झाला. ऑगस्ट 1947 मध्ये इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेतला. डच 1825 साली भारत सोडून गेले होते, तर फ्रान्सने 1954 साली भारताला रामराम ठोकला. पोर्तुगीज मात्र आपल्या इस्टाडो दी इंडिया म्हणजे गोवा, दमण आणि दीववरील दावा सोडत नव्हते. तत्कालीन भारत सरकारनेही हा प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता वा उत्सुकता दाखविली नाही. किंबहुना ज्या ज्या वेळी भारतीय नागरिकांनी गोवा मुक्तीसाठी आंदोलने उभारली, त्या त्या वेळी भारत सरकारने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. 1954 सालच्या 15 ऑगस्ट रोजी हेमंत सोमण या तरुणाने पणजी येथील ‘पालाशी’समोरील पोर्तुगीज ध्वज उतरवून भारताचा तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित पोर्तुगीज सैनिकांनी त्यांना अटक करून बेदम मारहाण केली. चार दिवसानंतर तुरुंगात सोमण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी मुंबई विधानसभेत करण्यात आली. तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि विरोधकांना प्रतिप्रश्न केला की ’कुणी सांगितले होते यांना गोव्यात सत्याग्रह करायला?’ गोवा मुक्ती चळवळीप्रति भारत सरकारची एवढी अनास्था होती.
यथावकाश आंतरराष्ट्रीय राजकारणात समीकरणे बदलत गेली. पोर्तुगिजांची गोव्यातील मुजोरी वाढत गेली. गोवा मुक्तीसाठी ठाम पावले उचलण्याचा पंतप्रधान नेहरूंनी निर्णय घेतला. कारवारनजीकच्या अंजदीव बेटावरील पोर्तुगीज सैनिकांनी अकारण भारतीय नौका ’साबरमती’वर हल्ला चढवला आणि भारत सरकारने गोवा मुक्तीसाठी या पोर्तुगीज वसाहतीवर सशस्त्र हल्ला चढविण्याचे निश्चित केले. लेफ्टनंट जनरल जे. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन विजय आखण्यात आले आणि अवघ्या दोन दिवसांत भारतीय सैन्याने कामगिरी फत्ते केली. 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल व्हासाल ई सिल्वा यांनी भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि गोवा मुक्तीची पहाट उगवली.
पोर्तुगीज गोव्यातून गेले तरी ते परत येणार , पुन्हा पोर्तुगीज सैनिक गोवा काबीज करणार अशी आशा बाळगून असणारा किंवा अगदी मनापासून अपेक्षा करणारा एक वर्ग गोव्यात होता. गोवा मुक्तीला आता 63 वर्षे पूर्ण होत आहेत. पण मनातून पोर्तुगीजधार्जिणा असणारा हा वर्ग अजूनही गोव्यात टिकून आहे.
ब्रिटिश राजवट वा गोव्यातील पोर्तुगीज सत्ता, हा आता इतिहास झाला. भारत सरकारनेही इंग्लंड, पोर्तुगाल इत्यादी सर्व देशांशी उत्तम राजनैतिक संबंध स्थापित केले आहेत. पोर्तुगीज साहित्यनिर्मिती, कला उच्च दर्जाची आहे. ‘ग्लोबल व्हिलेज’ बनलेल्या आजच्या जगात पुढे पाहणे संयुक्तिक ठरते. पण, पुढे जाताना इतिहासातून योग्य तो बोध घेणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोर्तुगिजांचा उदो उदो करणाऱ्या आणि ‘जयहिंद’ऐवजी ‘व्हीवा पुर्तगाल’ अशा आरोळ्या ठोकणाऱ्यांना योग्य इतिहास समजवण्याची वेळ आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.