पणजी: गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवाचे (60th Goa Liberation Day) औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 19 डिसेंबरला गोवा मुक्तिदिनी गोव्यात येत आहेत. तेथे ज्या ठिकाणी भेट देणार आहेत, तेथील कामांचा आढावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी घेऊन काही सूचनाही केल्या. मोदींचे गोव्यात आगमन झाल्यावर ते पणजीतील (Panaji) आझाद मैदानावरील स्मारकाला भेट देणार आहेत. तेथील कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे 19 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर ते पणजीतील आझाद मैदानावरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकावर पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहतील.
त्यानंतर मोदी मिरामार येथील फ्लायपास व शिप सॅलूट या नौदलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर मुख्य कार्यक्रमाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर जातील. या ठिकाणी वेगवेगळे चार कार्यक्रम होणार असून सुमारे 50 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या संरक्षण विभागातील एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कमांडो गोव्यात आले असून, सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच देखरेख करण्याचे काम ते करत असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
चोख बंदोबस्त, वाहतूक मार्गांत बदल
येत्या रविवार दि. 19 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, तेथे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक मार्गांतही बदल करण्यात येणार आहेत. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळाकडून दोनापावला येथे जाणारा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.